वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
लंडनमध्ये इंडिया ग्लोबल फोरम 2025 मध्ये केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्याकडून भारताचा भविष्यकालीन धोरणात्मक आर्थिक आराखडा सादर
Posted On:
19 JUN 2025 9:38PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 जून 2025
केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी लंडनमधील इंडिया ग्लोबल परिषद (आयजीएफ) 2025 मध्ये भारताचा धोरणात्मक जागतिक दृष्टीकोन आणि आर्थिक नेतृत्व याविषयी आज सादरीकरण केले. मे 2025 मध्ये झालेल्या भारत ब्रिटन मुक्त व्यापार करारावरील (एफटीए) स्वाक्षरीच्या ऐतिहासिक घटनेनंतरची गोयल यांची ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.
केंद्रीय मंत्री गोयल यांनी परिषदेच्या उद्घाटन सत्रात ब्रिटन भारत एफटीए - करारातून कृतीकडे याविषयी बीजभाषण केले. एफटीए मधील मुद्द्यांचे आर्थिक भागीदारीत रुपांतर करण्यास भारत वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला. ब्रिटनचे वाणिज्य व उद्योग मंत्री जोनाथन रेनॉल्डस या चर्चासत्रात सहभागी झाले होते आणि आंतरराष्ट्रीय पत्रकार मार्क बार्टन यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
एफटीए म्हणजे दोन प्रमुख लोकशाही देशांच्या एकत्रित महत्त्वाकांक्षेचे प्रतिबिंब आहे असे केंद्रिय मंत्री गोयल म्हणाले. या करारामुळे द्विपक्षीय व्यापार वाढण्यासह राष्ट्रहिताला अनुसरुन संतुलित व भविष्यवेधी व्यापार करारासाठी वाटाघाटी करण्याची भारताची क्षमता सिद्ध झाली असल्याचे त्यांनी नमूद केले.
दुसऱ्या टप्प्याच्या अंमलबजावणीबाबत बोलताना गोयल म्हणाले की संयुक्त प्रशासनासाठी संस्थात्मक यंत्रणा मजबूत करणे, स्टार्ट अप्स व लघु,मध्यम उद्योगांसाठी लवकर फायदेशीर सुविधा सुरू करणे आणि विविध क्षेत्रातील कुशल व्यावसायिकांना येण्याजाण्यासाठी सुरळीत सुविधा पुरविणे या बाबींना यामध्ये प्राधान्य दिले जाईल.
19 जून रोजी लंडनमधील विज्ञान संग्रहालयात आयोजित ब्रिटन भारत विज्ञान, तंत्रज्ञान व नवोन्मेष सहकार्य याविषयीच्या विशेष चर्चासत्रातही केंद्रिय मंत्री गोयल सहभागी झाले. डिजिटल पायाभूत सुविधांमधील भारताची वाढती गुंतवणूक, शाश्वत उत्पादन व पर्यावरणपूरक तंत्रज्ञान या क्षेत्रात ब्रिटन मधल्या गुंतवणूकदारांसाठी असलेल्या संधींबाबत या चर्चासत्रात विचारविनिमय करण्यात आला. मेक इन इंडिया, पीएलआय योजना यासारख्या माध्यमातून भारताला उत्पादन निर्मितीचे जागतिक केंद्र बनविण्याबाबत तसेच अर्थ तंत्रज्ञान, कृत्रिम प्रज्ञा आणि सर्जक उद्योग यासारख्या क्षेत्रांमधील सहकार्य वृद्धींगत करण्याविषयीही यावेळी चर्चा झाली.
गुंतागुंतीचे तंत्रज्ञान, संरक्षण उत्पादन व आधुनिक निर्मिती या क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यामधली मुक्त व्यापार कराराचे योगदान याविषयीही चर्चा करण्यात आली. भारताच्या यूपीआय व कोविन मंच यासारख्या नवोन्मेषांचा द्विपक्षीय सहकार्यातून जागतिक स्तरावर विस्तार करण्याची शक्यता या चर्चासत्रात पडताळून पाहण्यात आली.
आयजीएफ 2025 मधल्या आपल्या शेवटच्या कार्यक्रमात केंद्रिय मंत्री गोयल यांनी एका गोलमेज परिषदेत सहभाग घेतला. करारातून कृतीकडे – भारत ब्रिटन एफटीए याविषयीची ही परिषदही लंडनच्या विज्ञान संग्रहालयात आयोजित करण्यात आली होती. यामध्ये दोन्ही देशांमधल्या आघाडीच्या वरीष्ठ उद्योजकांनी एफटीए अंमलबजावणी आणि क्षेत्रनिहाय संधी याबाबत सखोल चर्चा केली.
केंद्रीय मंत्री गोयल यांच्या चर्चासत्रातील सहभागामुळे ब्रिटनसोबतची आपली धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्याप्रतीची भारताची वचनबद्धता अधोरेखित झाली. भारत ब्रिटन मुक्त व्यापार कराराद्वारे वस्तू, सेवा, तंत्रज्ञान व नवसंशोधन या क्षेत्रातील नवनवीन दालने खुली करुन परस्पर सहकार्यातून एकत्रित समृद्धी साधण्याचा दोन्ही देशांचा उद्देश आहे.
N.Chitale/S.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2137848)