सांस्कृतिक मंत्रालय
थायलंडच्या बौद्ध धर्मगुरूंच्या नेतृत्वाखालील उच्चस्तरीय शिष्टमंडळ भारत दौऱ्यावर
Posted On:
17 JUN 2025 9:44PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 जून 2025
प्राचीन परंपरा आणि बौद्ध धर्मावर आधारित भारत आणि थायलंड यांच्यातील दृढ ऐतिहासिक संबंध आजही विविध स्तरांवर सातत्यपूर्ण संवादामुळे जिवंत आणि सक्रीय आहेत.

थायलंडचे कार्यवाह सर्वोच्च बौद्ध धर्मगुरू महामहिम सोमदेत फ्रा थेरायानमुनी आणि वाट देबसिरींद्रवासचे उपमठाधीश महामहिम फ्रा कित्तिसारामुनी कुलफोल यांच्या नेतृत्वाखालील उच्चस्तरीय थाई भिक्षू शिष्टमंडळ सहा दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहे. हे शिष्टमंडळ मंत्र्यांसोबत बैठका आणि गुजरातला भेट देणार आहे. या शिष्टमंडळाला ‘राज्य अतिथी ’ दर्जा देण्यात आला आहे.

आज या शिष्टमंडळाने राष्ट्रीय संग्रहालयात जाऊन अवशेष असलेल्या पवित्र स्थळी प्रार्थना केली. यावेळी पाली भाषेत मंत्र पठणाचा छोटेखानी सोहळा आयोजित करण्यात आला होता. आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघाकडून या शिष्टमंडळाचे स्वागत करण्यात आले.
केंद्रीय संसदीय कार्य आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी शिष्टमंडळाशी भेट घेत भारत आणि थायलंड यांच्यातील दृढ ऐतिहासिक आणि समृद्ध सांस्कृतिक वारशाचे महत्व अधोरेखित केले. त्यांनी स्पष्ट केले की, हे संबंध केवळ बौद्ध धर्मापुरते मर्यादित नसून हिंदू धर्मालाही समाविष्ट करतात. तसेच, अयुथ्या आणि नालंदा यांदरम्यान प्राचीन काळात झालेल्या शैक्षणिक देवाणघेवाणीचा त्यांनी यावेळी उल्लेख केला.

या संबंधांचा आधार बौद्ध धर्म असला तरी, भारत आणि थायलंड विविध क्षेत्रांमध्ये परस्पर सहकार्य आणि अनुभवांची देवाणघेवाण करू शकतात, असे मंत्री रिजिजू यावेळी म्हणाले. अधिकाधिक भिक्षू व सामान्य नागरिकांनी भारतातील बौद्ध तीर्थस्थळांना भेट देण्याचे आवाहन रिजिजू यांनी केले. भारतीय नागरिकांनीही थायलंडमधील समृद्ध बौद्ध वारसा अनुभवावा, असेही त्यांनी सुचवले.

या शिष्टमंडळाने केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांची भेट घेत भारताबद्दलचा आपला विशेष जिव्हाळा व्यक्त केला. शाक्यमुनी (भगवान बुद्ध) यांचे जीवनकार्य याच भूमीत घडले आहे, असे त्यांनी नमूद केले.
S.Kane/R.Dalekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2137138)
Visitor Counter : 3