संरक्षण मंत्रालय
आयएमए डेहराडून येथील दीक्षांत संचलनाची पाहणी केल्यावर श्रीलंकन लष्करप्रमुखांनी दिला या संस्थेतील स्वतःच्या लष्करी प्रशिक्षणाच्या आठवणींना उजाळा
Posted On:
14 JUN 2025 2:39PM by PIB Mumbai
श्रीलंकेचे लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल बी.के.जी.एम. लसांथा रॉड्रिगो यांनी 11 ते 14 जून 2025 दरम्यान भारताचा चार दिवसांचा अर्थपूर्ण अधिकृत दौरा पूर्ण केला. या दौऱ्यात भारत आणि श्रीलंकेच्या सैन्यांमधील दृढ आणि ऐतिहासिक संबंधांना नवीन बळ मिळाले.
लेफ्टनंट जनरल रॉड्रिगो यांच्यासाठी हा दौरा एका भावनिक प्रवासाचा भाग होता, कारण त्यांनी डेहराडून मधील भारतीय लष्करी अकादमी (आयएमए) येथे डिसेंबर 1990 मध्ये 87व्या तुकडीत प्रशिक्षण घेतले होते. आता श्रीलंकेच्या लष्कराचे सर्वोच्च पद भूषवणारे अधिकारी म्हणून दीक्षांत संचलनाची पाहणी करणारे अधिकारी म्हणून उपस्थित राहिले, आणि संचलनामध्ये सहभागी झालेल्या नव्या पिढीतील अधिकाऱ्यांसह श्रीलंकेतील कॅडेट्सच्या कमिशनिंगचे साक्षीदार झाले.
या कार्यक्रमाला विशेष महत्त्व होते, कारण ब्रिगेडियर आर. एम. एस. पी. रथनायके यांचे पुत्र आर. एम. एन. एल रथनायके यांच्यासह श्रीलंकेचे दोन अधिकारी कॅडेट्स कमिशन्ड ऑफिसर म्हणून उत्तीर्ण झाले. हे अधिकारी उत्तीर्ण झाल्यानंतर आयएमएमधून प्रशिक्षण घेतलेल्या श्रीलंकेच्या लष्करी अधिकाऱ्यांची एकूण संख्या 296 झाली आहे. यामुळे परदेशी सैन्याच्या नेतृत्वाला आकार देण्यात भारताची सातत्यपूर्ण भूमिका अधोरेखित होते.
या संचलनाची पाहणी करणे ही आपल्या आयुष्यातील अत्यंत सन्मानाची आणि भावनिक बाब असल्याचे लेफ्टनंट जनरल रोड्रीगो यांनी प्रशिक्षणार्थींना संबोधित करताना सांगितले. आपल्या स्वतःच्या जीवन प्रवासाचे स्मरण करत जनरल रोड्रिगो यांनी या नव्या अधिकाऱ्यांना आठवण करून दिली की लष्करात प्रवेश मिळणे केवळ पद मिळवणे नाही तर सेवा जबाबदारी आणि नेतृत्वाचा आजीवन स्वीकार करणे होय. दैनंदिन वर्तनातून सन्मान मिळवण्याचे महत्त्व त्यांनी प्रशिक्षणार्थ्यांना पटवून दिले. त्यांनी आयएमए च्या सिद्धांतांचा उल्लेख केला - राष्ट्र, सैनिक आणि शूरवीरांच्या कुटुंबांप्रति कर्तव्य. शिस्त, प्रामाणिकपणा, निष्ठा आणि सन्मान या अनमोल मूल्यांची आठवण करून देत त्यांनी अधिकाऱ्यांना अभिमानाने आणि उद्देश पूर्णतेने गणवेश धारण करण्याचे आवाहन केले. त्यांनी पुरस्कार विजेत्या प्रशिक्षणार्थींचे अभिनंदन केले तसेच आयएमएची मूल्ये सीमा पार नेणाऱ्या परदेशी प्रशिक्षणार्थींचा आयएमए च्या विचारसरणीचे राजदूत, असा उल्लेख केला. त्यांनी तरुण अधिकाऱ्यांना शहाणपणाने नेतृत्व करण्याचे, न्यायाचे समर्थन करण्याचे आणि आयएमएच्या परंपरेत निर्भयपणे योगदान देण्याचे आवाहन केले. फील्ड मार्शल माणेकशॉ यांच्या "सत्य बोला, प्रामाणिक रहा, निर्भय रहा" या चिरंतन शब्दांचे त्यांनी स्मरण करून दिले.
त्यांच्या भेटीदरम्यान, लेफ्टनंट जनरल रॉड्रिगो यांनी भारतीय लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. यामध्ये उपप्रमुख लेफ्टनंट जनरल एन. एस. राजा सुब्रमण्यी आणि दक्षिण-पश्चिम कमांडचे जीओसी-इन-सी, लेफ्टनंट जनरल मनजिंदर सिंग यांचा समावेश होता. या चर्चांमध्ये व्यावसायिक लष्करी सहकार्य, संयुक्त प्रशिक्षण आणि प्रादेशिक सुरक्षा चौकटी वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले गेले.



***
S.Patil/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2136396)