संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एअर फोर्स अकादमी (एएफए) येथे संयुक्त पदवीदान परेड (सीजीपी) संपन्न

Posted On: 14 JUN 2025 12:49PM by PIB Mumbai

 

भारतीय हवाई दलाच्या (IAF) फ्लाइंग आणि ग्राउंड ड्युटी शाखांच्या फ्लाइट कॅडेट्सच्या प्री-कमिशनिंग प्रशिक्षणाचा यशस्वी समारोप 14 जून 2025 रोजी दुंडीगल, हैदराबाद येथील एअर फोर्स अकादमी (AFA) येथे संयुक्त पदवीदान परेड (CGP) आयोजित करून साजरा करण्यात आला. एअर चीफ मार्शल एपी सिंग, चीफ ऑफ द एअर स्टाफ (सीएएस) हे परेडचे पुनरावलोकन अधिकारी (Reviewing Officer - RO) होते. त्यांनी पदवीधर फ्लाइट कॅडेट्सना राष्ट्रपती कमिशन प्रदान केले. आज एकूण 254 फ्लाइट कॅडेट्स पदवीधर झाले, ज्यात पुरुष आणि महिलांचा समावेश होता.

सीएएसचे स्वागत एअर मार्शल तेजिंदर सिंग, एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, ट्रेनिंग कमांड आणि एअर मार्शल पीके व्होरा, कमांडंट, एएफए यांनी केले. परेडद्वारे आरओला सलामी देण्यात आली आणि त्यानंतर एक लक्षवेधी संचलन करण्यात आले.

या प्रसंगी, भारतीय नौदलातील 9 अधिकारी, भारतीय तटरक्षक दलातील 7 अधिकारी आणि एका मित्र देशातील एका प्रशिक्षणार्थीला उड्डाण प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल 'विंग्ज' प्रदान करण्यात आले. या समारंभाला मान्यवर तसेच पदवीधर अधिकाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी उपस्थिती लावली.

या परेडचे मुख्य आकर्षण 'कमिशनिंग समारंभ' होते. यात पदवीधर कॅडेट्सना आरओने फ्लाइंग ऑफिसर म्हणून कमिशन केले. पदवीधर अधिकाऱ्यांना अकादमीच्या कमांडंटने शपथ दिली. यामध्ये त्यांनी देशाच्या सार्वभौमत्वाचे आणि सन्मानाचे रक्षण करण्याची शपथ घेतली.

या कार्यक्रमात आकाशगंगा चमू, एअर वॉरियर ड्रिल चमूचे रोमांचक प्रदर्शन आणि सूर्यकिरण एरोबॅटिक चमूचे लयबद्ध एरोबॅटिक्स सादर केले. पदवीदान समारंभात पिलाटस पीसी-7 एमकेII, हॉक, किरण एमके-1 आणि चेतक या प्रशिक्षण विमानांनी सुव्यवस्थित आणि समक्रमित फ्लाय-पास्ट सादर केले.

विविध प्रशिक्षण शाखांमध्ये त्यांच्या अपवादात्मक कामगिरीबद्दल, आरओने पदवीधर अधिकाऱ्यांचा सत्कार केला. फ्लाइंग शाखेतील फ्लाइंग ऑफिसर रोहन कृष्णमूर्ती यांना राष्ट्रपतींचे सन्मानपत्र आणि हवाई दल प्रमुखांची स्वोर्ड ऑफ ऑनर प्रदान करण्यात आले, कारण त्यांनी गुणवत्तेच्या एकूण क्रमवारीत प्रथम स्थान मिळवले होते. ग्राउंड ड्युटी शाखांमध्ये गुणवत्तेच्या एकूण क्रमवारीत प्रथम आल्याबद्दल फ्लाइंग ऑफिसर निष्ठा वैद यांना राष्ट्रपतींचे सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.

परेडला संबोधित करताना, आरओने नवीन नियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांचे त्यांच्या उत्कृष्ट कामगिरी, अचूक संचलन आणि संचलनाच्या सर्वोच्च मानकांचे पालन याबद्दल कौतुक केले. त्यांनी सांगितले, "जेव्हा तुम्ही देशाची सेवा करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा तुम्ही एका अशा करिअरची निवड केली जे केवळ आव्हानात्मकच नाही तर सर्वात फायदेशीर आणि सन्माननीय देखील आहे. भविष्याकडे पाहताना, दोन गोष्टी निश्चित आहेत - युद्धाचे वेगाने विकसित होणारे स्वरूप आणि अवकाश शक्तीची वाढती प्रासंगिकता".

ते पुढे म्हणाले, "ऑपरेशन सिंदूर हे भारतीय हवाई दलाच्या अतुलनीय व्यावसायिक प्रतिभेचे एक ज्वलंत उदाहरण आहे. आम्ही शत्रूला अचूक आणि निर्णायक प्रहार करण्याची आमची क्षमता दाखवली आहे. वायुसेनेचे भविष्य म्हणून, तुम्ही हे समजून घेतले पाहिजे की राष्ट्रीय संकटाच्या काळात भारतीय हवाई दल नेहमीच प्रथम प्रतिसाद देणारे राहिले आहे - आणि राहील."

सीएएसने अधिकाऱ्यांवर सोपवलेल्या सामूहिक जबाबदारीवर भर दिला आणि सांगितले की, "प्रत्येक भारतीय व्यक्ति, हवाई दलावर जो विश्वास ठेवतो तो पूर्ण करणे हे आपले कर्तव्य आहे. आजचा हा समारंभ वर्षानुवर्षे केलेल्या कठोर प्रशिक्षण आणि चिकाटीची फलश्रुति आहे, परंतु ही तुमच्या व्यावसायिक प्रवासाची केवळ सुरुवात आहे. तुम्ही तुमचे क्षितिज विस्तारण्यासाठी आणि नवीन क्षमता शोधण्यासाठी सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे."

शेवटी, त्यांनी सांगितले की, "भविष्यातील युद्धक्षेत्र अधिकाधिक गुंतागुंतीचे होत जाईल. भारतीय हवाई दलाचे खऱ्या अंतराळ दलात रूपांतर होत असताना, तुमच्यापैकी बरेच जण भारताच्या अंतराळ मोहिमेत आघाडीवर असतील. या आव्हानांसाठी संपूर्ण वचनबद्धता, अथक लक्ष, नावीन्य आणि तुमच्या कामासाठी खोल उत्कटतेची आवश्यकता असेल. तुम्ही परिधान केलेला गणवेश हा राष्ट्रीय अभिमानाचे प्रतीक आहे - तो सन्मानाने घाला, धैर्याने नेतृत्व करा आणि भारतीय हवाई दलाच्या मूलभूत मूल्यांचे नेहमीच बळकट करा".

या परेडचा समारोप नवीन कमिशन मिळालेल्या अधिकाऱ्यांनी दोन रांगांमध्ये मार्शल मार्चिंग ट्यूनच्या गजरात संचलन करून झाला. कुठलाही कमिशनिंग सोहळा हवाई दलाच्या अधिकाऱ्यांच्या आयुष्यात कायमचा स्मरणात राहतो कारण त्यांना त्यांच्या पालक आणि कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थितीत राष्ट्रपती कमिशन प्रदान केले जाते. राष्ट्राच्या सेवेत सन्मान, अभिमान आणि प्रतिष्ठेने भरलेल्या जीवनाची सुरुवात करणारा त्यांच्या कारकिर्दीतील हा सर्वात संस्मरणीय दिवस बनतो.

***

Y.Rane/H.Kulkarni/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2136343)