कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

युवा सक्षमीकरणासाठी प्रशिक्षण महासंचालनालय आणि शेल इंडिया यांनी संयुक्तपणे हरित कौशल्ये -केंद्रित ईव्ही प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला

Posted On: 13 JUN 2025 9:27PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 जून 2025

कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाअंतर्गत असलेल्या प्रशिक्षण महासंचालनालयाने (डीजीटी ) शेल इंडियाच्या सहयोगाने, विद्यार्थी आणि प्राध्यापकांना हरित ऊर्जा आणि ई-गमनशीलता क्षेत्रातआगामी काळात आवश्यक असलेल्या क्षमतांनी सुसज्ज करण्याच्या उद्देशाने ग्रीन स्किल्स अँड इलेक्ट्रिक व्हेइकल्स  प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला आहे. हा उपक्रम शेलची प्रशिक्षण भागीदार संस्था असलेली  एड्युनेट फाउंडेशन, दिल्ली-एनसीआर, गुजरात, महाराष्ट्र, तामिळनाडू आणि कर्नाटकमधील निवडक औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) आणि राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था (एनएसटीआय) मध्ये राबविणार आहे.  याचा प्रारंभ 12 जून  2025 रोजी झाला.

डीजीटी-शेल इंडिया सहयोगाअंतर्गत, निवडक एनएसटीआय  आणि आयटीआयमध्ये संरचित बहु-स्तरीय प्रारूपाद्वारे हरित कौशल्ये  प्रशिक्षण दिले जाईल. पहिल्या टप्प्यात, कार्यक्रमात 4 एनएसटीआयमध्ये 240 तासांचा प्रगत इव्ही तंत्रज्ञ अभ्यासक्रम, शेल-समर्थित प्रयोगशाळांनी सुसज्ज 12 आयटीआय मध्ये 90 तासांचा रोजगाराभिमुख  इव्ही कौशल्य अभ्यासक्रम आणि भौतिक प्रयोगशाळा नसलेल्या  आयटीआयमध्ये 50 तासांचे फाउंडेशनल ग्रीन स्किल्स मॉड्यूल,  यांचा समावेश आहे.

निव्वळ शून्य उत्सर्जन या आपल्या महत्त्वाकांक्षेनुसार भारत सरकार हरित ऊर्जा आणि इलेक्ट्रिक वाहने (इव्ही ) यांच्या अवलंबास प्रोत्साहन देत आहे. हायब्रीड आणि इलेक्ट्रिक वाहने निर्मिती आणि जलद स्वीकार (एफएएमई) योजनेसारख्या प्रमुख उपक्रमांनी इव्हीच्या वापराला गती देण्यात, पायाभूत सुविधा वाढविण्यात आणि लक्ष्यित प्रोत्साहने देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या राष्ट्रीय प्रयत्नांना पूरक म्हणून, दिल्ली, महाराष्ट्र आणि तामिळनाडू सारख्या राज्यांनी इलेक्ट्रिक गमनशीलतेकडे  संक्रमण जलद गतीने करण्यासाठी, स्थानिक परिसंस्थांना चालना देण्यासाठी आणि हरित रोजगार निर्माण करण्यासाठी स्वतःची इव्ही धोरणे सादर केली आहेत. या घडामोडी हरित ऊर्जा आणि इव्ही  क्षेत्रात कुशल कामगारांची वाढती  मागणी अधोरेखित करतात.

कौशल्य विकास आणि उद्योजकता तसेच शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी यांनी या उपक्रमाचे महत्त्व सांगितले.  “शेल इंडियासोबतचा सहयोग  हे शाश्वततेशी कौशल्य जोडण्याच्या  सरकारच्या दृढ वचनबद्धतेचे प्रतिबिंब आहे. हरित ऊर्जा, इलेक्ट्रिक मोबिलिटी  आणि व्यापक हवामान संक्रमण या  पर्यावरणीय अत्यावश्यकता  आहेतच शिवाय भारतासाठी  नवोन्मेष, प्रतिभा आणि उद्यमशीलतेद्वारे नेतृत्व करण्याची सुवर्णसंधी यातून मिळणार आहे.  कार्याभिमुख सज्जतेसोबतच हवामान बदलाविषयी सजग कार्यबल तयार करण्याच्या आमच्या व्यापक  दृष्टिकोनाचा एक भाग, हा उपक्रम आहे. आम्ही आपल्या युवा पिढीला  जागतिक हरित अर्थव्यवस्थेत केवळ सहभागी होण्यासाठी नाही तर ती घडवण्यासाठी कौशल्यांनी सुसज्ज करत आहोत.”

डीजीटी आणि शेल इंडियामधील हा सहयोग  भविष्यातील हरित अर्थव्यवस्थेत कारकीर्द घडवण्याकरिता  देशातील युवा पिढीला सुसज्ज  करण्यासाठी एक मोठे पाऊल आहे. एक व्यापक अभ्यासक्रम, विशेष प्रयोगशाळा आणि उद्योग समर्थन देऊन, हा उपक्रम विद्यार्थ्यांना व्यावहारिक कौशल्ये आणि प्रमाणपत्रे प्रदान करेल, त्यांची रोजगारक्षमता वाढवेल आणि त्यांना शाश्वत, नवोन्मेष -चालित भविष्यात नेतृत्व करण्यासाठी स्थान देईल.


S.Tupe/S.Kakade/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2136279)