वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
पीएम गतिशक्ती अंतर्गत नेटवर्क नियोजन गटाच्या 95 व्या बैठकीत महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पांचे मूल्यमापन
एनपीजीने मेट्रो रेल्वे, रस्ते आणि लॉजिस्टिक पार्क प्रकल्पांचे केले मूल्यमापन
Posted On:
12 JUN 2025 9:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 जून 2025
नेटवर्क नियोजन गटाची (एनपीजी) 95 वी बैठक आज झाली. या बैठकीत मेट्रो रेल्वे, रस्ते, परिवहन व महामार्ग आणि लॉजिस्टिक पार्क्समधील पायाभूत प्रकल्पांचे मूल्यमापन करण्यात आले. पीएम गतिशक्ती राष्ट्रीय बृहत् आराखडा - (पीएमजीएस एनएमपीच्या) अनुषंगाने मल्टीमोडल कनेक्टिव्हिटी आणि लॉजिस्टिक कार्यक्षमता वाढविणे हे या बैठकीच्या केंद्रस्थानी होते. एनपीजीने पाच प्रकल्पांचे (1-मेट्रो रेल्वे प्रकल्प आणि 2 रस्ते व 2 लॉजिस्टिक पार्क्स) पीएम गतिशक्तीच्या मल्टीमोडल पायाभूत रचना, आर्थिक आणि सामाजिक केंद्रांशी शेवटच्या टप्प्यापर्यंतची जोडणी आणि इंटरमोडल समन्वय याच्या निकषांवर मूल्यमापन केले. हे उपक्रम लॉजिस्टिक कार्यक्षमता वाढविण्यास, प्रवासाचा वेळ कमी करण्यास आणि विविध भागांमध्ये लक्षणीय सामाजिक-आर्थिक फायदे मिळवून देण्यास मदत करतील.
आजच्या मूल्यमापनात रस्ते, परिवहन व महामार्ग मंत्रालयाच्या, प्रस्तावित वाढवण बंदराशी जोडणीसाठी राष्ट्रीय महामार्ग - एनएच 248 एस वर आठपदरी नियंत्रित वापर व्यवस्थेसहित महामार्गाचे बांधकाम प्रकल्पाचा समावेश होता.
रस्ते, परिवहन व महामार्ग मंत्रालयाने महाराष्ट्रातील प्रस्तावित वाढवण बंदराशी जोडणी सुधारण्यासाठी एनएच 248 एस मार्गावर आठपदरी नियंत्रित वापर व्यवस्थेसहित महामार्गाच्या बांधकामाचा प्रस्ताव सादर केला आहे. ही धोरणात्मक पायाभूत सुविधा मालवाहतूक कार्यक्षमतेने करण्यासाठी आणि बंदराला एक प्रमुख जागतिक व्यापार केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी हातभार लावेल, असे अपेक्षित आहे. सुमारे 20 मीटरच्या नैसर्गिक रुंदीचा लाभ घेत वाढवण बंदर मोठ्या मालवाहू जहाजांना सामावून घेण्यासाठी विकसित केले जात आहे. पहिल्या टप्प्यात बंदर 15 दशलक्ष टीईयू कंटेनर हाताळण्याची क्षमता पुरवेल, दुसऱ्या टप्प्यात ती 23.2 दशलक्ष टीईयूपर्यंत वाढविण्याचे नियोजन आहे. पूर्णत्वानंतर या बंदराचा जागतिक सर्वोत्तम 10 कंटेनर बंदरांमध्ये समावेश होईल अशी अपेक्षा आहे. वाहतूक वाढीच्या आगाऊ अंदाजानुसार, प्रस्तावित बंदराचा प्रवेश मार्ग 2030 पर्यंत सुमारे 57,329 प्रवासी वाहने (पीसीयू) हाताळेल. घाऊक आणि कंटेनरसह मालवाहतुकीसाठी रेल्वे आणि रस्ते कॉरिडॉर विकसित करताना मालाचा कार्यक्षम पद्धतीने विविध मार्गांनी विसर्ग शक्य करणे यावर प्रकल्प प्रामुख्याने लक्ष केंद्रित करेल.
मुख्य अंतर्गत जोडणी वैशिष्ट्यांमध्ये पुढील वाहतूक व्यवस्थांचा समावेश आहे. मुंबई–दिल्ली पश्चिम रेल्वे मार्ग – 12 किमी, दिल्ली–मुंबई द्रुतगती मार्ग (एनई4) – 21 किमी, एनएच-48 – 32 किमी.
खास प्रकल्पासाठी असलेला रस्ता थेट दिल्ली–मुंबई द्रुतगती मार्ग आणि एनएच-48 ला जोडेल. यामुळे लॉजिस्टिक कार्यक्षमता मोठ्या प्रमाणात वाढेल आणि वाढवण बंदराचे जागतिक व्यापारात धोरणात्मक प्रवेशद्वार म्हणून स्थान बळकट होईल.
S.Kakade/R.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2136065)