माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्री डॉ.एल.मुरुगन यांच्या हस्ते पुदुचेरी विधानसभेसाठीच्या नॅशनल ई-विधान अ‍ॅप्लीकेशन डिजिटल मंचाचे उद्घाटन

Posted On: 09 JUN 2025 10:09PM by PIB Mumbai

चेन्‍नई/नवी दिल्‍ली, 9 जून 2025

 

केंद्रीय माहिती आणि प्रसारण तसेच संसदीय व्यवहार राज्यमंत्री डॉ.एल.मुरुगन यांच्या हस्ते आज दिनांक 09 जून 2025 रोजी पुदुचेरी विधानसभेसाठीच्या नॅशनल ई-विधान अ‍ॅप्लीकेशन (नेवा) या डिजिटल मंचाचे उद्घाटन झाले.पारदर्शक, कार्यक्षम तसेच पर्यावरण-स्नेही प्रशासनाच्या दिशेने घेतलेली ही महत्त्वाची भरारी आहे. पुदुचेरीचे नायब राज्यपाल के.कैलाशनाथन, पुदुचेरीचे मुख्यमंत्री एन.रंगासामी, पुदुचेरी विधानसभेचे अध्यक्ष आर सेल्वम देखील या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित होते.

   

या उद्घाटनामुळे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल भारत संकल्पनेशी सुसंगत पावले उचलत नेवा मंचाचा वापर करणारी पुदुचेरी ही देशातील 19 वी विधानसभा ठरली आहे. विधानसभेचे कागदपत्र रहित कामकाज शक्य करणारा हा उपक्रम केंद्र सरकारच्या 100 टक्के आर्थिक मदतीसह केंद्रीय संसदीय व्यवहार मंत्रालयातर्फे राबवण्यात येत आहे.

याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना केंद्रीय मंत्री डॉ.एल मुरुगन म्हणाले, “नेवा हा परिवर्तनशील उपक्रम विधानसभेतील कामकाजाची माहिती वास्तविक वेळेत उपलब्ध होण्याची  सुनिश्चिती करतो आणि आपल्या लोकशाहीला बळकट करतो. या उपक्रमातून एक देश, एक शिधापत्रिका’, आणि प्रस्तावित ‘एक देश, एक निवडणूक’ यांसारख्या महत्त्वाच्या सुधारणांच्या बरोबरीने ‘एक देश, एक अ‍ॅप्लीकेशन’ या तत्वाचे दर्शन घडते. कायदे कसे तयार केले जातात हे समजून घेण्याचा आणि ते पाहण्याचा  हक्क जनतेला आहे.” 

    

यावेळी बोलताना केंद्रीय मंत्र्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दशकभरात यशस्वी केलेल्या अनेक उपक्रमांचा देखील ठळक उल्लेख केला. त्यामध्ये डिजिटल आर्थिक व्यवहार करणाऱ्या देशांमध्ये भारताचे जगातील दुसरे स्थान, थेट लाभ हस्तांतरणाच्या (डीबीटी) माध्यमातून कल्याणकारी योजनांच्या लाभाचे प्रभावी  वितरण, संरक्षण क्षेत्रासाठी आयात 50% कमी करणे शक्य करणारी आत्मनिर्भर भारत उपक्रमाअंतर्गत साध्य झालेली तंत्रज्ञानातील प्रगती अशा अनेक सफल कामगिरींचा समावेश होता.

पायाभूत सुविधा विकास आणि सामाजिक भांडवल हे भारताच्या विकासाला चालना देणारे दोन मुख्य आधारस्तंभ आहेत ही बाब अधोरेखित करून केंद्रीय मंत्री डॉ.एल.मुरुगन यांनी वर्ष 2047 पर्यंत आपल्या देशाला विकसित भारत म्हणून घडवण्यासाठीच्या भारताच्या वाटचालीवर विश्वास व्यक्त केला.

 

* * *

N.Chitale/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2135271)