लोकसभा सचिवालय
युवाशक्तीच्या जोरावर जागतिक आव्हानांवर उपाय शोधण्यात भारत जगाचे नेतृत्व करत आहे : लोकसभा अध्यक्ष
‘विकसित भारत’च्या स्वप्नपूर्तीच्या मार्गावर देशाच्या प्रवासात भारताचे तरुण सक्रिय भागीदार बनतील: लोकसभा अध्यक्ष
प्रविष्टि तिथि:
09 JUN 2025 9:31PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 जून 2025
भारत आपल्या तरुणांच्या प्रतिभा आणि क्षमतेच्या जोरावर जागतिक आव्हानांवर उपाय शोधण्यात जगाचे नेतृत्व करत आहे, असे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सांगितले. भारताच्या तरुणांनी देशाच्या सामाजिक, आर्थिक आणि तांत्रिक विकासात मोठी भूमिका बजावली आहे, असे ते म्हणाले. देशाच्या भल्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाचा वापर करण्याचे आवाहन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केले. आधुनिक विज्ञान आणि समृद्ध आध्यात्मिक वारसा या दुहेरी सामर्थ्याचा वापर करून भारत जागतिक स्तरावर प्रगती करत आहे, असे भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी), जोधपूर येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना बिर्ला म्हणाले.
भारतातील तरुण आज नोकरी शोधणाऱ्यांपेक्षा नोकरी देणारे बनण्याच्या दिशेने प्रगती करत आहेत आणि या परिवर्तनात आयआयटींनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे, असे निरीक्षण त्यांनी नोंदवले. 'विकसित भारत'च्या उद्दिष्ट साध्य करण्याच्या मार्गावरील प्रवासात भारतातील तरुणांनी सक्रिय भागीदार बनावे असे आवाहन केले. बिर्ला यांनी आज या कार्यक्रमात आयआयटी, जोधपूर येथील अत्याधुनिक व्याख्यान सभागृह संकुल - II चे उद्घाटन केले.
वैज्ञानिक आणि आध्यात्मिक ज्ञानाचा वापर करून, भारत समग्र राष्ट्रीय प्रगतीचा एक अनोखा मार्ग तयार करत आहे, याकडे बिर्ला यांनी सर्वांचे लक्ष वेधले.
खेळण्यांच्या निर्मितीपासून ते संरक्षण उपकरणांपर्यंत विविध क्षेत्रात स्वावलंबी होण्यात भारताच्या यशावरही बिर्ला यांनी प्रकाश टाकला. भारताच्या डिजिटल परिसंस्थेबरोबर एकत्रितपणे केलेल्या अशा प्रयत्नांमुळे आत्मनिर्भर भारताच्या आपल्या संकल्पाला महत्त्वपूर्ण चालना मिळाली आहे, असे बिर्ला यांनी सांगितले.
देशातील प्रत्येक महाविद्यालय आणि विद्यापीठाने नवोन्मेष आणि उत्कृष्टतेचे केंद्र बनण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे लोकसभा अध्यक्षांनी देशात तांत्रिक शिक्षणाच्या प्रगतीमध्ये आयआयटींच्या भूमिकेची प्रशंसा करताना सांगितले.
शैक्षणिक संस्था केवळ घोकंपट्टी करून शिकण्याची जागा नसावी, तर जिथे कल्पनांना चालना मिळेल, प्रतिभा विकसित होतील आणि भविष्यातील नेते घडतील अशी एक गतिमान परिसंस्था असावी यावर त्यांनी भर दिला. भारतीय महाविद्यालये आणि विद्यापीठे जागतिक स्तरावर स्पर्धा करण्यासाठी तसेच राष्ट्रीय प्रगतीमध्ये अर्थपूर्ण योगदान देण्यासाठी सुसज्ज असतील याची खात्री करण्यासाठी दर्जेदार शिक्षण, शिक्षक विकास आणि अत्याधुनिक पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन लोकसभा अध्यक्षांनी केले.
* * *
N.Chitale/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2135265)
आगंतुक पटल : 13