भूविज्ञान मंत्रालय
जागतिक आव्हानांवर मात करण्यासाठी जग आज भारताकडे आशेने पाहत आहे : डॉ. जितेंद्र सिंह
Posted On:
09 JUN 2025 8:18PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 जून 2025
जागतिक आव्हानांवर मात करण्यासाठी जग आज भारताकडे आशेने पाहत असल्याचे केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे.
इतर देशांच्या भारताकडून किती अपेक्षा आहेत हे गेल्या दोन दिवसांत आपल्याला आणि भारतीय शिष्टमंडळातील इतर सदस्यांना जाणवले आहे, असे डॉ. जितेंद्र सिंह, जगातील 150 हून अधिक देशांचा सहभाग असलेल्या संयुक्त राष्ट्र महासागर परिषदेच्या निमित्ताने प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हाती घेतलेल्या निर्णायक उपाययोजना आणि स्थिर सरकार यामुळे गेल्या 11 वर्षांत भारताच्या क्षमतांबद्दलच्या इतर देशांच्या धारणा बदलल्या आहेत, असे ते म्हणाले.

मोदी सरकारच्या 11 वर्षांच्या कार्यकाळाचा संदर्भ देताना डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की, आज मोदी सरकार आपल्या कारकिर्दीला 11 वर्षे पूर्ण करत असताना, भारताच्या क्षमता आणि सामर्थ्याचा लाभ घेण्यासाठी इतर सदस्य राष्ट्रे आणि देशांच्या प्रतिनिधींमध्ये प्रचंड उत्साहाची लाट दिसून येत आहे.
महासागराशी संबंधित चिंता आणि आव्हानांचा विचार करता, भारताने केवळ या आव्हानांना तोंड देण्यात पुढाकार घेतला नाही तर भारताच्या या प्रयत्नांना बळकटी राजकीय व्यवस्थेच्या दृढनिश्चयातून मिळाली आहे, हे डॉ. जितेंद्र सिंह यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात सलग दोन वर्षे डीप ओशन मिशनच्या केलेल्या उल्लेखातून हे प्रयत्न स्पष्ट होतात, असे ते म्हणाले.
महासागराच्या चिंता प्रामुख्याने दोन प्रकारच्या आहेत, जागतिक तापमानवाढीमुळे महासागराच्या पाण्याचे वाढते तापमान तसेच महासागराच्या पाण्याची वाढती पातळी इत्यादी, आणि महासागराच्या पाण्याच्या प्रदूषणाशी संबंधित, जसे की तेल गळती, प्लास्टिक इत्यादी.

भारत हा एकदा वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकवर अधिकृतपणे बंदी घालणाऱ्या पहिल्या काही देशांपैकी एक आहे, असे डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले. आपले डीप ओशन मिशन अंतराळ संस्था इस्रो तसेच देशातील इतर संशोधन आणि तांत्रिक संस्थांशी घनिष्ठ सहकार्य साधून प्रगती करत आहे, असे ते म्हणाले. अशा प्रकारे, संपूर्ण विज्ञान आणि संपूर्ण सरकारच्या पद्धतीचे अनुसरण करून ही मोहीम इष्टतम परिणाम साध्य करत आहे, असे त्यांनी सांगितले.
* * *
N.Chitale/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2135234)