वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक्स सुट्या भागांच्या उत्पादनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारकडून सेझ सुधारणा अधिसूचित
Posted On:
09 JUN 2025 6:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 जून 2025
सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक्स सुट्या भागांच्या उत्पादन क्षेत्रांच्या विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ) नियमांमध्ये अग्रगण्य सुधारणा केल्या आहेत. या क्षेत्रांमध्ये उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणात भांडवलाची गरज असून ते आयातीवर अवलंबून असते आणि फायदेशीर ठरण्यासाठी दीर्घ कालावधी लागत असल्याने, या उच्च तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये अग्रगण्य गुंतवणूकीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि उत्पादनाला चालना देण्यासाठी नियमांमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत.
सेझ नियम, 2006 च्या नियम 5 मध्ये सुधारणा केल्यानंतर, सेमीकंडक्टर किंवा इलेक्ट्रॉनिक भागांच्या उत्पादनासाठी प्रामुख्याने स्थापन केलेल्या सेझ साठी लगतची केवळ 10 हेक्टर जमिनीची आवश्यकता असेल, यापूर्वी 50 हेक्टर जमिनीची आवश्यकता होती. शिवाय, सेझ नियम, 2006 च्या नियम 7 मध्ये सुधारणा केल्याने, सेझसाठी, मान्यता मंडळाला केंद्र किंवा राज्य सरकार किंवा त्यांच्या अधिकृत संस्थांकडे तारण ठेवलेल्या किंवा भाडेपट्ट्यावर दिलेल्या जमिनींच्या बाबतीत सेझ जमीन बंधन - मुक्त असण्याची अट शिथिल करता येऊ शकते.
सुधारित नियम 53 मुळे मोफत मिळालेल्या आणि पुरवलेल्या वस्तूंचे मूल्य निव्वळ परकीय चलन (NFE) गणनेत समाविष्ट करता येईल आणि त्यासाठी लागू असलेल्या सीमाशुल्क मूल्यांकन नियमांचा वापर करून मूल्यांकन करता येईल. याशिवाय सेमीकंडक्टर तसेच इलेक्ट्रॉनिक्स सुट्या भागांच्या उत्पादन क्षेत्रातील सेझ युनिट्सना लागू असलेले शुल्क भरल्यानंतर देशांतर्गत शुल्क (टॅरिफ) क्षेत्रात देखील देशांतर्गत पुरवठा करण्याची परवानगी देण्यासाठी सेझ नियमांच्या नियम 18 मध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत.
या सुधारणांमुळे देशातील उच्च-तंत्रज्ञान आधारित उत्पादनाला चालना मिळेल, सेमीकंडक्टर उत्पादन परिसंस्थेच्या वाढीला बळ मिळेल आणि देशात अतिकुशल रोजगार निर्माण होतील.
वाणिज्य विभागाने 3 जून 2025 रोजी या सुधारणा अधिसूचित केल्या आहेत. त्यानंतर, सेमिकंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक घटकांच्या निर्मितीसाठी अनुक्रमे सेमिकंडक्टर टेक्नॉलॉजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एमएसटीआय) आणि हुबळी ड्युरेबल गुड्स क्लस्टर प्रायव्हेट लिमिटेड (एक्झ ग्रुप) कडून प्राप्त झालेल्या प्रस्तावांना सेमिकंडक्टर मान्यता मंडळाने मंजुरी दिली आहे.
गुजरातमधील साणंद येथे 37.64 हेक्टर क्षेत्रफळावर 13,000 कोटी रुपयांच्या अंदाजित गुंतवणुकीसह मायक्रोन त्यांची सेझ सुविधा स्थापन करेल, तर कर्नाटकातील धारवाड येथे 100 कोटी रुपयांच्या अंदाजे गुंतवणुकीसह इलेक्ट्रॉनिक भागांचे उत्पादन करण्यासाठी 11.55 हेक्टर क्षेत्रफळावर एक्कस त्यांची सेझ सुविधा उभारेल.
* * *
N.Chitale/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2135187)
Visitor Counter : 2