कृषी मंत्रालय
केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पतियाळा येथील कृषी यंत्रसामुग्रीच्या कारखान्याला दिली भेट
Posted On:
05 JUN 2025 9:42PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 जून 2025
'विकसित कृषी संकल्प अभियाना’चा भाग म्हणून आज केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पंजाबमधील शेतकऱ्यांची भेट घेतली. पिके तसेच शेतकऱ्यांचे उत्पादन यांचा आढावा घेण्यासाठी त्यांनी प्रत्यक्ष शेतीच्या ठिकाणी भेट दिली आणि पतियाळात अमरगड येथील कृषी यंत्रसामग्रीचे उत्पादन करणाऱ्या कारखान्याला भेट देऊन शेतीची विविध अवजारे तसेच उपकरणे यांचे निरीक्षण केले.

याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना केंद्रीय मंत्री चौहान म्हणाले, "शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. गेल्या आर्थिक वर्षांच्या शेवटच्या तिमाहीत देशाने 7.5% वृद्धीदर गाठला ज्यात कृषी क्षेत्राचे योगदान 5.4% आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राचा वाटा अजूनही 18% पेक्षा जास्त आहे आणि हे क्षेत्र आपल्या 50% लोकसंख्येचा उपजीविकेचा स्त्रोत आहे.

“कृषी क्षेत्रात लागणारे श्रम आणि पैसा कमी करून उत्पादन वाढवण्यासाठी आपण शेतीमध्ये अत्याधुनिक तंत्रे आणि पद्धती स्वीकारायला हव्या. केवळ कापणीसाठीच नव्हे तर लागवडीसाठी देखील आता यंत्रे उपलब्ध आहेत. बहुउद्देशीय कापणी यंत्रे शेतकऱ्यांना लक्षणीय प्रमाणात खर्च आणि श्रमविषयक लाभ मिळवून देत आहेत,” असे ते म्हणाले.


भारताने कृषीसंबंधित यंत्रांचा निर्यातदार होण्याच्या गरजेवर अधिक भर देत केंद्रीय मंत्री चौहान यांनी या कामी राज्य सरकारांशी सहयोगी संबंध प्रस्थापित करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले,"आपण निर्यातीसाठी योग्य अशा उपकरणांची आणि यंत्रांची रचना करण्यासोबतच लहान आणि वंचित शेतकऱ्यांसाठी परवडण्याजोग्या दरातील साधनांच्या उत्पादनावर देखील लक्ष केंद्रित केले पाहिजे. या साधनांच्या किमती शेतकऱ्यांना कोणतेही आर्थिक ओझे न वाटता खरेदी करता येतील अशाच असल्या पाहिजेत."
अनुदानांबद्दल बोलताना, चौहान म्हणाले, "जे शेतकरी खऱ्या अर्थाने पात्र आहेत, केवळ अशांनाच अनुदाने दिली गेली पाहिजेत."
भाषणात शेवटी केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की यांत्रिकीकरणाबाबत अधिक सखोल चर्चा करण्यात येईल आणि उद्योग क्षेत्रातील भागधारकांच्या सहयोगाने याला एक नवी दिशा देण्यात मदत होईल."
S.Kane/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2134397)