शिक्षण मंत्रालय
केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी एक पेड माँ के नाम 2.0, स्पेशल मॉड्यूल्स, मिशन लाईफ वेब पोर्टलसाठी इको क्लब आणि एक पेड माँ के नाम 2.0 साठी मायक्रोसाइटचे अनावरण केले
Posted On:
05 JUN 2025 6:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 जून 2025
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज नवी दिल्ली येथे एक पेड माँ के नाम 2.0 चे अनावरण केले. त्यांनी या उपक्रमासाठी विशेष मॉड्यूलचे देखील अनावरण केले, यामध्ये मिशन लाईफ वेब पोर्टलसाठी इको क्लब आणि एक पेड माँ के नाम 2.0 साठी मायक्रोसाइटचा समावेश आहे.



पर्यावरणाशी संबंधित आव्हानांना तोंड देण्यासाठी युवावर्गाचा सहभाग अधिकाधिक असावा यादृष्टीने निसर्गाचे संवर्धन आणि पर्यावरण रक्षणासाठी विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने विशेष मॉड्यूल, वेब पोर्टल आणि मायक्रोसाइटचे महत्त्व प्रधान यांनी यावेळी अधोरेखित केले.
पर्यावरण शिक्षणाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग आणि शिक्षण मंत्रालयाने राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अंतर्गत केलेल्या प्रयत्नांची त्यांनी दखल घेतली. शाळांमधील 'इको क्लब फॉर मिशन लाईफ' विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाशी संबंधित समस्या आणि हवामान बदलाच्या धोक्याबाबत जाणीवजागृती निर्माण करतील आणि त्यांच्यात पर्यावरणपूरक वर्तन आणि मूल्ये जोपासतील, असे ते म्हणाले.
जगाशी तुलना करत, भारत कधीच एक प्रदूषणकारी राष्ट्र नव्हते, भारतीय संस्कृती संपूर्ण विश्वाला एक कुटुंब मानते असे प्रधान यांनी सांगितले. वर्ष 2070 पर्यंत निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जनाचे उद्दिष्ट गाठण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पाबद्दल प्रधान यांनी त्यांचे आभार मानले. 2047 त्यातील एक महत्त्वाचा टप्पा असल्याचे ते म्हणाले. तसेच पर्यावरण संरक्षणाच्या या महान प्रयत्नात प्रत्येकाने आपली भूमिका बजावली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
देशातील शैक्षणिक संस्थांनी गेल्या वर्षभरात संपूर्ण देशभरात पाच कोटी झाडे लावली, अशी माहिती प्रधान यांनी दिली. यावेळी, देशभरात 10 कोटी झाडे लावण्याचे उद्दिष्ट आहे तसेच एक पेड माँ के नाम 2.0 मोहिमेला लोकचळवळ बनवण्यासाठी अधिक गती दिली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
2070 पर्यंत निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जनाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी तसेच शाश्वत विकासाचे ध्येय गाठण्यासाठी भावी पिढीला मार्गदर्शन करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. प्रत्येकाने आपल्या आईच्या नावे एक झाड लावून निसर्गाप्रती असलेली जबाबदारी पार पाडावी आणि http://ecoclubs.education.gov.in. या समर्पित पोर्टल वर त्याची सेल्फी अपलोड करावी असे आवाहन त्यांनी केले.
S.Kane/B.Sontakke/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2134283)