गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी जम्मू आणि काश्मीरमधील पूंछ येथे सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना केले संबोधित
'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान, बीएसएफने 118 हून अधिक पाकिस्तानी चौक्या उद्ध्वस्त केल्या आणि त्यांची संपूर्ण देखरेख प्रणाली पूर्णपणे नष्ट केली
दुर्गम सीमांवर अहोरात्र सजग आणि समर्पित राहणाऱ्या बीएसएफ जवानांप्रति देश कृतज्ञता व्यक्त करत आहे
बीएसएफ जवानांच्या सतर्कतेमुळे, कोणताही हल्ला देशाच्या सीमेअंतर्गत थेट नुकसान पोहचवू शकत नाही, कारण त्यांच्यासमोर ढाल बनून बीएसएफ जवानाची निधडी छाती असते
Posted On:
30 MAY 2025 5:08PM by PIB Mumbai
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज जम्मू आणि काश्मीरमधील पूंछ येथे सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांना संबोधित केले.
आपल्या भाषणात केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, ते भारतातील 140 कोटी जनतेच्या वतीने बीएसएफच्या सर्व सीमा रक्षकांचे आभार मानण्यासाठी आले आहेत. ते म्हणाले की, जेव्हा जेव्हा भारताच्या सीमेवर कोणत्याही प्रकारचा हल्ला होतो तेव्हा बीएसएफचे जवानच सर्वप्रथम त्याला सामोरे जातात. कोणत्याही परिस्थितीत, वर्षातील 365 दिवस आणि 24 तास, बीएसएफचे जवान उपलब्ध, सतर्क आणि समर्पित असतात. बीएसएफच्या जवानांमुळे, कोणताही हल्ला भारताच्या सीमेच्या आत थेट नुकसान पोहचवू शकत नाही कारण त्यांच्यासमोर ढाल बनून बीएसएफ जवानाची निधडी छाती असते .
भारतीय सैन्याने पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांवर केलेल्या प्रहाराला उत्तर देण्यासाठी पाकिस्तानने भारताच्या निवासी भागात हल्ले केले तेव्हा जम्मू सीमेवरील बीएसएफ जवानांनी 118 हून अधिक पाकिस्तानी चौक्या उद्ध्वस्त केल्या आणि त्यांचे नुकसान केले, असे शाह यांनी नमूद केले. बीएसएफने पाकिस्तानची संपूर्ण देखरेख प्रणाली देखील उद्ध्वस्त केल्याचे त्यांनी सांगितले.
शांततेच्या काळातही बीएसएफने पाकिस्तानच्या चौक्यांवर बारीक नजर ठेवली आणि ऑपरेशन सिंदूर दरम्यान अचूक गोपनीय माहितीच्या आधारे आणि कमीत कमी वेळेत पाकिस्तानी चौक्यांचे जास्तीत जास्त नुकसान केले असे केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितले . बीएसएफने पाकिस्तानच्या देखरेख उपकरणांची सर्वाधिक क्षती केल्याचे शाह म्हणाले. बीएसएफ जवानांचे समर्पण, शौर्य, पराक्रम आणि बलिदान आज देशातील प्रत्येक मुलाच्या ओठी आहे.
***
N.Chitale/S.Kane/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2132921)