ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
Posted On:
30 MAY 2025 10:32AM by PIB Mumbai
ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अखत्यारीतील केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (CCPA), वॉकी टॉकीसह अन्य रेडिओ उपकरणांच्या बेकायदेशीर सूची आणि विक्री, 2025 प्रतिबंध आणि नियमनासाठी मार्गदर्शक तत्त्वे अधिसूचित केली आहेत.
वायरलेस उपकरणांच्या अनधिकृत विक्रीमुळे ग्राहकांच्या सुरक्षिततेला धोका उद्भवण्याची तसेच ग्राहकांची त्यांच्या कायदेशीर स्थितीबद्दल दिशाभूल होण्याची आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या आणि आपत्कालीन सेवांद्वारे वापरल्या जाणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या संदेशवहन नेटवर्कमध्ये अडथळा निर्माण होण्याची शक्यता असल्याने त्याला पायबंद घालण्यासाठी ही मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत .
ही मार्गदर्शक तत्त्वे विभागाच्या वेबसाइटवर खालील लिंकद्वारे पाहता येऊ शकतील
(https://consumeraffairs.nic.in/sites/default/files/file-uploads/latestnews/Guidelines_27052025.pdf).
दूरसंचार विभाग (DtT) आणि गृह मंत्रालय (MHA) यांच्याशी आंतर-मंत्रालयीन पातळीवर व्यापक सल्लामसलत केल्यानंतर या मार्गदर्शक तत्त्वांना अंतिम रूप देण्यात आले. समन्वित आणि सर्वंकष दृष्टीकोन अवलंबला जाईल हे सुनिश्चित करण्यासाठी दोन्ही विभागांनी मांडलेल्या नियामक आणि सुरक्षाविषयक विचारांचा अंतिम आराखड्यामध्ये समावेश करण्यात आला आहे.
या मार्गदर्शक तत्त्वांतील महत्त्वाचे ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे:
• ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर विक्रीसाठी केवळ अधिकृत आणि निकषात बसणारी वॉकी-टॉकी उपकरणेच परवानगी असलेल्या फ्रिक्वेन्सींवर कार्यान्वित करण्याचे आदेश देण्यात येत आहेत.
• फ्रिक्वेन्सी श्रेणी तसेच इतर तांत्रिक निकष निर्दिष्ट करण्यासाठी नियामक मंजुरीच्या पुराव्यासह (उपकरणे प्रकार मंजूरी) उत्पादन सूचीमध्ये समावेश असावा.
• ई-कॉमर्स संस्थांना योग्य ती काळजी घेऊन, नियमांचे पालन झाले आहे किंवा नाही याची पडताळणी करावी लागेल, ज्यामध्ये नियमानुसार पूर्तता केली असेल तेथे परवाना देणे आणि वापराच्या फ्रिक्वेन्सीबद्दल माहिती किंवा आवश्यक प्रमाणपत्र नसलेल्यांचे नाव यादीतून काढून टाकावे लागेल.
• अशा उपकरणांच्या कायदेशीर वापराविषयी ग्राहकांना चुकीची माहिती देणाऱ्या दिशाभूल करणाऱ्या जाहिराती किंवा उत्पादनांच्या वर्णनांना प्रतिबंध केला जाईल.
• विक्रीसाठी सूचीबद्ध केलेली उपकरणे डीओटीद्वारे न सांगितलेल्या फ्रिक्वेन्सीनुसार चालवली जाणार नाहीत तसेच अधिकृत आवश्यक फ्रिक्वेन्सीवर चालतील आणि उत्पादन वर्णनावरील फ्रिक्वेन्सी बँड स्पष्टपणे दिसेल अशारीतीने लावलेला आहेत याची विक्रेत्यांनी खात्री करावी.
• ग्राहक संरक्षण कायदा, 2019 नुसार उल्लंघन झाल्यास दंड आणि अंमलबजावणी यंत्रणांची रूपरेषा
मार्गदर्शक तत्त्वांसह, विभागाची उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहे:
• अशा उत्पादनांची यादी करण्यापूर्वी प्लॅटफॉर्म्सनी योग्य ती काळजी घ्यावी;
• विक्रेत्यांच्या परवानगी आणि प्रमाणपत्रांची पडताळणी करणे;
• अनधिकृत सूचींसाठी स्वयंचलित पद्धतीने देखरेख ठेवण्याची आणि ती काढून टाकण्याची यंत्रणा सादर करणे;
• योग्य प्रकटीकरणाद्वारे ग्राहक जागरूकता वाढवणे; आणि
• पालन न केल्यास दंड आणि प्लॅटफॉर्मची जबाबदारी लागू करणे
केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (CCPA) यापूर्वी आघाडीच्या डिजिटल बाजारपेठांना योग्य फ्रिक्वेन्सी प्रकटीकरण, परवाना माहिती किंवा उपकरण प्रकार मान्यता (ETA) शिवाय ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर वॉकी-टॉकीजची यादी आणि विक्री न केल्याबद्दल 16, 970 उत्पादनांच्या यादींविरुद्ध एकूण तेरा नोटिसा बजावल्या होत्या, ज्यामधे ग्राहक संरक्षण कायदा, 2019 चे उल्लंघन झाले होते.
मार्गदर्शक तत्त्वांच्या अधिसूचनेव्यतिरिक्त, या प्लॅटफॉर्मवर सतत देखरेख आणि तपासणी केली जात आहे.
***
SuvarnaB/SampadaP/ManjiriG/DY