कोळसा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

हरित ऊर्जा स्थापन करण्यासाठी एनआयआरएल आणि महाप्रित कंपन्यांमध्ये करार


महाराष्ट्रात संयुक्त उपक्रम

Posted On: 29 MAY 2025 8:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 29 मे 2025

भारताच्या नवीकरणीय ऊर्जा महत्त्वाकांक्षांना गती देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, एनएलसी इंडिया लिमिटेडची पूर्ण मालकीची उपकंपनी असलेल्या एनएलसी इंडिया रिन्यूएबल्स लिमिटेडने  (एनआयआरएल)आज मुंबईत महात्मा फुले रिन्यूएबल एनर्जी अँड इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी लिमिटेड (महाप्रित) सोबत संयुक्त उपक्रम करारावर (जेव्हीए) स्वाक्षरी केली. कोळसा मंत्रालयाचे सचिव  विक्रम देव दत्त, एनएलसी इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक  प्रसन्न कुमार मोटुपल्ली, महाप्रितचे व्यवस्थापकीय संचालक  बिपिन शिरमाळी, एनआयआरएल आणि महाप्रितचे संचालक(कार्य) विजयकुमार कलाम पाटील आणि एनआयआरएल आणि महाप्रितचे वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत हा करार झाला. दिनांक 16 एप्रिल 2025 रोजी एनआयआरएल आणि महाप्रित यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराच्या अनुषंगाने  हा करार आहे.

हे सहकार्य एनआयआरएलच्या धोरणात्मक विस्तारात आणि महाराष्ट्राच्या भरभराटीला येत असलेल्या नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात प्रवेश करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचा टप्पा आहे. या करारांतर्गत स्थापन होणारी संयुक्त उपक्रम कंपनी (जेव्हीसी ) सौर, पवन, हायब्रीड , फ्लोटिंग सोलर ,  BESS, पंप्ड स्टोरेज आणि सौर पार्कसह 2000 मेगावॅट पर्यंतच्या नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावेल, ज्यामध्ये महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात 500 मेगावॅटवर सुरुवातीला लक्ष केंद्रित केले जाईल आणि अखेर  ते 5000 मेगावॅटपर्यंत वाढेल. जेव्हीसी मध्ये एनआयआरएल कडे 74 % आणि महाप्रित कडे 26% समभाग हिस्सा असेल.

या कराराअंतर्गत, महाप्रित , प्रकल्पांसाठी जमीनीची निवड  आणि वाटप करण्यास मदत करेल, तसेच ग्रिडमध्ये वीज निर्वासन प्रणालीच्या विकासास मदत करेल. तर दुसरीकडे, एनआयआरएल विस्तृत  प्रकल्प अहवाल तयार करण्यास, वित्तपुरवठ्याची  व्यवस्था करण्यास आणि नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांच्या विकासास मदत करेल.

विद्युत  कायद्याच्या कलम 62 किंवा कलम 63 अंतर्गत, संयुक्त उपक्रम  स्पर्धात्मक आणि नियंत्रित मार्गांनी वीज विक्री करेल, ज्यामध्ये डिस्कॉम्स, सरकारी संस्था आणि व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांवर विशेष भर दिला  जाईल.

कोळसा मंत्रालयाचे सचिव विक्रम देव दत्त म्हणाले की, एनआयआरएल आणि महाप्रित यांच्यात या संयुक्त उपक्रम करारावर स्वाक्षरीमधून   देशाच्या हरित ऊर्जेकडे संक्रमणाला गती देणाऱ्या सहयोगी भागीदारींना चालना देण्याप्रति सरकारची वचनबद्धता दिसून येते. ते म्हणले की, महाराष्ट्राची नवीकरणीय ऊर्जा क्षमता प्रचंड आहे आणि प्रकल्प अंमलबजावणीमध्ये एनआयआरएलचा अनुभव आणि महाप्रितचे प्रादेशिक सामर्थ्य यामुळे, हा संयुक्त उपक्रम शाश्वत विकास  आणि ऊर्जा सुरक्षेसाठी उत्प्रेरक म्हणून काम करेल. कार्बन उत्सर्जन-मुक्त  प्रवासाला कोळसा क्षेत्र सक्रियपणे पाठिंबा देत असून  अशा भागीदारी नवीकरणीय  ऊर्जा वापर आणि हवामान लवचिकतेप्रति  आपली राष्ट्रीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आवश्यक असलेल्या समन्वयाचे प्रतीक आहेत, असे सचिव म्हणाले.

हा संयुक्त उपक्रम करार एनएलसी इंडिया लिमिटेड, त्याची नवीकरणीय ऊर्जा  शाखा एनआयआरएल यांच्या विश्वासार्हतेचा आणि संपूर्ण भारतात जागतिक दर्जाचे हरित ऊर्जा उपाय प्रदान करण्याच्या त्यांच्या तंत्रज्ञान आणि परिचालनात्मक कौशल्यावरील वाढत्या विश्वासाचा दाखला आहे.


S.Kakade/S.Kane/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2132490)
Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil