संरक्षण मंत्रालय
संरक्षण कूटनीति मजबूत करण्यासाठी तसेच जागतिक लष्करी नेतृत्वाशी संवाद साधण्यासाठी सरसेनाध्यक्ष सिंगापूर येथे शांग्री-ला संवाद 2025 कार्यक्रमामध्ये होणार सहभागी
प्रविष्टि तिथि:
29 MAY 2025 4:36PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 मे 2025
इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्ट्रॅटेजिक स्टडीज यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शांग्री-ला संवादाच्या 22 व्या आवृत्तीत सहभागी होण्यासाठी चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणजेच सरसेनाध्यक्ष जनरल अनिल चौहान 30 मे 2025 ते 1 जून 2025 दरम्यान सिंगापूरला भेट देणार आहेत. जनरल अनिल चौहान या भेटीत ऑस्ट्रेलिया, युरोपियन युनियन, फ्रान्स, जर्मनी, इंडोनेशिया, जपान, नेदरलँड्स, न्यूझीलंड, फिलीपिन्स, सिंगापूर, यूके आणि अमेरिका यासह अनेक देशांच्या संरक्षण दल प्रमुखांशी आणि वरिष्ठ लष्करी नेतृत्वाबरोबर द्विपक्षीय बैठका घेणार आहेत.
जनरल अनिल चौहान शैक्षणिक संस्था, थिंक टँक आणि संशोधकांना संबोधित करतील तसेच 'भविष्यातील युद्धे आणि युद्धकला' या विषयावर भाषण देतील. या कार्यक्रमाचा भाग म्हणून ते या वेळी होणाऱ्या विशेष सत्रांमध्ये देखील सहभागी होतील आणि 'भविष्यातील आव्हानांसाठी संरक्षण नवोन्मेषी उपाय' या विषयावर भाषण देतील.
शांग्री-ला संवाद हा संरक्षण आणि सुरक्षा या विषयावरील आशियातील प्रमुख शिखर परिषद आहे. हा संवाद जगभरातील संरक्षण मंत्री, लष्कर प्रमुख, धोरणकर्ते आणि धोरण तज्ञांना एकत्र आणतो. या कार्यक्रमात 40 राष्ट्रांचे प्रमुख नेते हिंद - प्रशांत क्षेत्रातील सुरक्षा आव्हानांबाबत आपले विचार व्यक्त करतील. या बैठकींमुळे संरक्षण सहकार्य मजबूत करण्यासाठी, परस्पर सुरक्षा हितसंबंधांवर चर्चा करण्यासाठी आणि हिंद - प्रशांत प्रदेशात भारताची धोरणात्मक भागीदारी वाढविण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध होईल.
S.Bedekar/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2132349)
आगंतुक पटल : 14