लोकसभा सचिवालय
शौर्य, धैर्य आणि देश रक्षणाचा अढळ दृढनिश्चय, या गुणांसाठी भारताला आपल्या सशस्त्र दलांचा अभिमान आहे: लोकसभा अध्यक्ष
भारतात दहशत पसरवणाऱ्या कोणत्याही देशाला किंवा दहशतवादी संघटनेला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, हे परिणाम ऑपरेशन सिंदूरपेक्षा अधिक तीव्र असतील: लोकसभा अध्यक्ष
लोकसभा अध्यक्षांनी जमशेदपूर येथे सिंघभूम चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या अमृत महोत्सवी समारंभात प्रतिनिधींना केले संबोधित
Posted On:
25 MAY 2025 7:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली/जमशेदपूर 25 मे 2025 : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी भारताच्या सशस्त्र दलांची वचनबद्धता आणि शौर्याचे कौतुक केले आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रीय सुरक्षेसाठी सशस्त्र दलांची अतुट वचनबद्धता आणि दहशतवादाविरुद्धची त्यांची ठाम भूमिका अधोरेखित केली. भारताला आपल्या सशस्त्र दलांच्या शौर्याचा, धाडसाचा आणि अढळ दृढनिश्चयाचा अभिमान आहे, असेही ते म्हणाले. त्यांनी इशारा दिला की जर कोणताही देश किंवा दहशतवादी संघटना भारतात दहशत पसरवत असतील तर त्याचे परिणाम ऑपरेशन सिंदूरपेक्षाही गंभीर असतील. भारताने केवळ आपली अंतर्गत सुरक्षा यंत्रणा मजबूत केली नाही तर या संदर्भात जगाला एक स्पष्ट आणि दृढ संदेशही दिला आहे, असेही ते म्हणाले. राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत सामूहिक हितसंबंधाची भावना आपल्याला मार्गदर्शन करेल असे आवाहन त्यांनी केले.
आज जमशेदपूर येथील सिंघभूम चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या अमृत महोत्सवी समारंभात एका सभेला संबोधित करताना बिर्ला यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
लोकसभा अध्यक्ष म्हणून झारखंडच्या पहिल्या भेटीत बिर्ला यांनी भगवान बिरसा मुंडा आणि झारखंडच्या भूमीला भावपूर्ण आदरांजली वाहिली. त्यांनी रांचीतील बिरसा चौकात भगवान बिरसा मुंडा यांना पुष्पांजली वाहिली आणि देशाच्या विकासात आदिवासी समुदायांच्या योगदानाचे कौतुक करत बिरसा मुंडा संग्रहालयाला भेट दिली.
झारखंड असा प्रदेश आहे ज्याने भारताला भगवान बिरसा मुंडा आणि जमशेदजी टाटा ही दोन महान व्यक्तीमत्वे दिली, असे वर्णन त्यांनी केले. भगवान बिरसा मुंडा यांनी आदिवासींच्या प्रतिष्ठेसाठी आणि स्वाभिमानासाठी दीर्घ आणि धाडसी संघर्ष चेतवला. स्वातंत्र्यापूर्वी भारताच्या औद्योगिक जागृतीचा पाया रचणाऱ्या जमशेदजी टाटा यांच्या दृष्टिकोनावर बिर्ला यांनी प्रकाश टाकला.
एकेकाळी आयातीवर अवलंबून असलेला देश आता संरक्षण उपकरणांची निर्मिती आणि निर्यातीत एक वाढती शक्ती म्हणून उदयास आला आहे, असे संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरता मिळविण्याच्या भारताच्या उल्लेखनीय प्रगतीबद्दल बोलताना बिर्ला यांनी सांगितले. नवोन्मेष आणि मजबूत धोरणात्मक सहकार्यातून झालेल्या या महत्त्वपूर्ण परिवर्तनामुळे भारतीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग तसेच इतर उद्योगांना राष्ट्रीय सुरक्षा मजबूत करण्यात थेट आणि अर्थपूर्ण भूमिका बजावण्यासाठी नवीन संधी उपलब्ध झाल्या आहेत यावर त्यांनी भर दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली, भारताने संरक्षण उत्पादनात आत्मनिर्भरतेचे (स्वावलंबन) स्पष्ट आणि महत्त्वाकांक्षी ध्येय स्वीकारले आहे, असे त्यांनी सांगितले. देशाच्या वाढत्या लष्करी ताकदीचा कणा आपल्या औद्योगिक क्षेत्राचे समर्पण आणि क्षमतांनी मजबूतपणे सहयोगीत आहे, हे बिर्ला यांनी अधोरेखित केले.
सिंघभूम चेंबर ऑफ इंडस्ट्री अँड कॉमर्सच्या दीर्घ इतिहासाचे कौतुक करताना बिर्ला यांनी अभिमानाने नमूद केले की गेल्या काही दशकांपासून, चेंबरने प्रदेश आणि राष्ट्राच्या आर्थिक आणि तांत्रिक परिदृश्याला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. चेंबरने केवळ एक प्रतिनिधी संस्था म्हणून नव्हे तर लोकशाही संवादाचे व्यासपीठ म्हणून काम करावे असे आवाहन त्यांनी केले. हे व्यासपीठ एक अशी जागा असेल जिथे खाजगी क्षेत्र, सरकार आणि नागरी समाज संयुक्तपणे भारताच्या औद्योगिक आणि आर्थिक भविष्याची योजना आखू शकतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
***
S.Patil/S.Mukhedkar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2131227)
Visitor Counter : 4