युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने राष्ट्रीय क्रीडा महासंघांना मदत करण्याच्या निकषांमध्ये केली सुधारणा

Posted On: 23 MAY 2025 6:40PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,23 मे 2025

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने राष्ट्रीय क्रीडा महासंघांना (एन एस एफ ) राष्ट्रीय क्रीडा महासंघ सहाय्य योजनेअंतर्गत मदत करण्याच्या निकषांमध्ये सुधारणा केली आहे. निकषांची शेवटची सुधारणा फेब्रुवारी 2022 मध्ये करण्यात आली होती. पॅरिस ऑलिंपिक 2024 नंतर एक नवीन ऑलिंपिक चक्र सुरू झाले आहे, ज्यामुळे बदलत्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर निकषांचा आढावा घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

उदयोन्मुख आव्हानांना तोंड देण्याच्या दृष्टीने तसेच 2036 च्या ऑलिंपिक खेळांचे आयोजन करण्याच्या भारताच्या आकांक्षेला पाठिंबा देण्याच्या दृष्टीने हा व्यापक आढावा घेण्यात आला. नियमांमध्ये सुधारणा करताना मंत्रालयाने प्रशिक्षण, पायाभूत सुविधा विकास, उपकरणे खरेदी आणि खेळाडू कल्याण कार्यक्रमांशी संबंधित खर्चातील महागाईमुळे वाढलेला खर्च विचारात घेतला आहे.

अनेक घटकांसाठी मदतीच्या प्रमाणात वाढ करण्याव्यतिरिक्त, प्रथमच काही नवीन उपाययोजना देखील सुरू करण्यात आल्या आहेत. सुधारित योजनेअंतर्गत एनएसएफना त्यांच्या वार्षिक अर्थसंकल्पाच्या किमान 20% रक्कम त्यांच्या संलग्न युनिट्सद्वारे, विशेषतः कनिष्ठ आणि युवा विकासासाठी, तळागाळातील विकासासाठी राखीव ठेवण्याची खात्री करणे बंधनकारक आहे, जेणेकरून बेंच स्ट्रेंथचा विकास सुनिश्चित होईल.

सुधारित योजनेत क्षमता बांधणीवरही भर देण्यात आला आहे. योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या निधीपैकी किमान 10 % निधी प्रशिक्षक आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या विकासासाठी दिला जाईल. यामध्ये भारतात प्रशिक्षण अभ्यासक्रमांचे आयोजन, परदेशात भारतीय कर्मचाऱ्यांसाठी अभ्यासक्रम, प्रशिक्षण अभ्यासक्रमाचा विकास, परिषदा, चर्चासत्रे आणि कार्यशाळांचे आयोजन तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रमाणन कार्यक्रमांसह अशा कार्यशाळा किंवा अभ्यासक्रमांच्या आयोजनासाठी परदेशी किंवा भारतीय तज्ञांचा सहभाग समाविष्ट आहे.

सर्व एनएसएफना प्रशिक्षण प्रशिक्षकांसाठी समर्पित प्रशिक्षण शिक्षण तज्ज्ञाची नियुक्ती करणे देखील आवश्यक राहील. संबंधित एनएसएफशी सल्लामसलत करून सरकारने ठरवल्यानुसार, प्रशिक्षणाव्यतिरिक्त कालावधीत स्थानिक अधिकारी आणि प्रशिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी तसेच त्यांची क्षमता वाढवण्यासाठी परदेशी तज्ञांना देखील जबाबदार धरले जाईल. ही आवश्यकता मुख्य निकाल क्षेत्राचा (केआरए) भाग असेल.

10 कोटी रुपये आणि त्याहून अधिक वार्षिक अर्थसंकल्प असलेल्या एनएसएफना उच्च-कार्यक्षमता संचालक (एचपीडी) नियुक्त करणे अनिवार्य असेल, जो खेळाच्या एकूण तांत्रिक विकास कार्यक्रमाची रचना आणि देखरेख यासाठी जबाबदार असेल. एनएसएफ एचपीडीसाठी केआरए परिभाषित करतील, जे त्यांच्या नियुक्ती करारांमध्ये समाविष्ट केले जातील.

उच्च प्राधान्य आणि प्राधान्याच्या क्रीडा शाखांच्या एनएसएफ उच्च कामगिरीची क्षमता असलेल्या वरिष्ठ गट आणि कनिष्ठ गट - अशा दोन श्रेणींमध्ये संभाव्य खेळाडूंचा गट  निवडण्यात येईल.  या संभाव्य गट खेळाडूंना प्रशिक्षण देणाऱ्या अकादमींना प्रशिक्षक आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांना पाठिंबा देऊन बळकटी दिली जाईल. क्रीडा विज्ञान सेवा आणि विशेष उपकरणांसाठी अतिरिक्त सहाय्य प्रदान केले जाईल.

संभाव्य गट खेळाडूंच्या प्रशिक्षणासाठी निवडक अकादमींची ओळख पटवून त्यांना मान्यता देणे एनएसएफना आवश्यक असेल. या अकादमींची निवड एनएसएफ द्वारे निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने केली गेली पाहिजे. प्रत्येक खेळासाठी या मान्यताप्राप्त अकादमींमध्ये दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमांचे निरीक्षण संबंधित एचपीडी द्वारे केले जाईल. या प्रत्येक अकादमीचे अंतर विश्लेषण एनएसएफ त्यांच्या निधीच्या प्रस्तावांमध्ये सादर करतील.

शिबिराच्या व्यतिरिक्त असलेल्या अन्य दिवसांसाठी प्रत्येक संभाव्य गट खेळाडूला दरमहा ₹10,000चा आहार भत्ता दिला जाईल, जेणेकरून या काळात त्यांना योग्य पोषणापासून वंचित राहावे लागणार नाही याची खात्री बाळगता येईल.

एनएसएफचे कामकाज व्यावसायिकरित्या व्यवस्थापित करण्यासाठी, प्रशासकीय मनुष्यबळाच्या सहभागासाठी सहकार्य प्रदान केले जाईल. सीईओ किंवा संचालक सारख्या प्रशासकीय कर्मचाऱ्यांसाठी 10 % पर्यंत निधी वाटप केला जाईल. यात त्यांना वित्त आणि लेखा, स्पर्धा, प्रशिक्षक विकास आणि खरेदी, आयटी, कायदेशीर बाबी, कार्यालयीन सहाय्यक, इंटर्न इत्यादींसाठी व्यवस्थापकांकडून सहकार्य दिले जाईल.

सुधारित योजनेअंतर्गत राष्ट्रीय स्पर्धा आयोजित करणे, भारतात आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित करणे, आहार शुल्क आणि प्रशिक्षकांचे वेतन यासाठी आर्थिक मदतीची रक्कम लक्षणीयरीत्या वाढवण्यात आली आहे.

राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा आयोजित करण्यासाठी देण्यात येणारी आर्थिक मदत सध्याच्या 51 लाख रुपयांवरून वाढवून उच्च-प्राधान्य असलेल्या खेळांसाठी 90 लाख रुपये आणि प्राधान्य असलेल्या खेळांसाठी 75 लाख रुपये करण्यात आली आहे.

देशात आंतरराष्ट्रीय कार्यक्रम आयोजित करण्यासाठी आर्थिक मदत दुप्पट करून ₹2 कोटी करण्यात आली आहे.

मुख्य राष्ट्रीय प्रशिक्षकाचे वेतन ₹5 लाखांवरून ₹7.5 लाख प्रति महिना करण्यात आले आहे, तर इतर प्रशिक्षकांचे वेतन ₹2 लाखांवरून ₹3 लाख प्रति महिना करण्यात आले आहे.

वरिष्ठ खेळाडूंसाठी प्रतिदिन आहार भत्ता ₹690 वरून ₹1,000 आणि कनिष्ठ खेळाडूंसाठी ₹480 वरून ₹850 पर्यंत वाढवण्यात आला आहे.


S.Patil/N.Mathure/H.Kulkarni/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 

 

 


(Release ID: 2130811)