कृषी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी कृषी विद्यापीठांचे कुलगुरू आणि आयसीएआर संस्थांच्या संचालकांच्या वार्षिक परिषदेचे केले उद्घाटन


"विज्ञानाधिष्ठित कृषी परिवर्तन हे आमचे लक्ष्य आणि पारंपरिक शेतीचे एकात्मिकरण हेही आमचे ध्येय"- शिवराज सिंह चौहान

"विकसित कृषी संकल्प अभियान हे शेती क्षेत्रातील ऐतिहासिक पाऊल असून शेतकऱ्यांच्या सशक्तीकरणासाठी आणि त्यांच्या उपजीविकेच्या उन्नतीसाठी समर्पित"- केंद्रीय कृषी मंत्री


Posted On: 20 MAY 2025 7:29PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 मे 2025

केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण तसेच ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज नवी दिल्लीतील डॉ. सी. सुब्रमणियम प्रेक्षागृह, एनएएससी कॉम्प्लेक्स, पूसा इथे कृषी विद्यापीठांचे कुलगुरू आणि आयसीएआर संस्थांच्या संचालकांच्या वार्षिक परिषदेचे उद्घाटन केले.

आपल्या भाषणात केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की,आयसीएआर अर्थात ‘भारतीय कृषी संशोधन परिषद’ ही संशोधन व विस्ताराच्या दृष्टीने देशाचा अभिमान आहे. ‘विकसित भारता’च्या ध्येयपूर्तीसाठी कृषी क्षेत्राचा विकास आणि शेतकऱ्यांचे सशक्तीकरण अनिवार्य आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांची तुलना देवाशी करून त्यांनी सांगितले की शेतकरी जगाचा पोशिंदा असतो त्यामुळे शेतकऱ्यांप्रती आपली कृतज्ञता आणि आदर व्यक्त करणे आवश्यक आहे.शेतकऱ्यांचे कल्याण आणि त्यांच्या उपजीविकेची सुनिश्चिती करणे ही आपली जबाबदारी आहे, असेही त्यांनी सांगितले.

चौहान यांनी कुलगुरूंना विनंती केली की त्यांनी शैक्षणिक जबाबदाऱ्यांबरोबरच ‘विकसित कृषी संकल्प अभियाना’त सक्रिय सहभाग घ्यावा.‘लॅब टू लँड’ अर्थात प्रयोगशाळेतून शेतापर्यंत उपक्रमाची तात्काळ आणि वास्तवात अंमलबजावणी होणे ही काळाची गरज आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

विकसित भारत साकारण्यासाठी कृषी मंत्रालयाची सहासूत्री रणनीती त्यांनी स्पष्ट केली. त्यामध्ये उत्पादकता वाढवणे,उत्पादन खर्च कमी करणे,उत्पादनास योग्य दर मिळवून देणे, नैसर्गिक आपत्तींमुळे होणारे नुकसान भरून काढणे,शेतीत विविधतेला चालना देणे आणि मूल्यवर्धन व अन्नप्रक्रिया क्षेत्राचा विकास करणे यांचा समावेश आहे. नैसर्गिक व सेंद्रिय शेतीचा प्रसार करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

शेतीवैविध्य जपणे आणि पृथ्वीचे रक्षण ही आपल्या सर्वात महत्त्वाच्या सामूहिक जबाबदाऱ्यांपैकी एक असल्याचे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की विज्ञानाधारित कृषी परिवर्तन हे मंत्रालयाचे प्रमुख ध्येय आहे, आणि पारंपरिक कृषी पद्धतींचे एकात्मिकरण हेही महत्त्वाचे आहे.‘विकसित कृषी संकल्प अभियान’ हे शेतकऱ्यांच्या सशक्तीकरणासाठी, त्यांच्या उपजीविकेच्या उन्नतीसाठी आणि त्यांचे प्रश्न स्थानिक पातळीवर सोडविण्यासाठी समर्पित असलेले एक ऐतिहासिक पाऊल आहे.

चौहान यांनी जाहीर केले की 25-26 मे रोजी ते पदयात्रा करणार असून त्यातून शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांचे प्रश्न समजून घेणार आहेत. भारताचे उद्दिष्ट अन्नसुरक्षा सुनिश्चित करणे, राष्ट्रीय अन्नसाठ्यांचे पुनर्भरण आणि भारताला जगाचा अन्नकोश बनवणे हे आहे, असे कृषी मंत्री म्हणाले.

“आम्ही एक संघ आहोत,” असे सांगत त्यांनी घोषित केले की "एक राष्ट्र, एक कृषी, एक संघ” हा आपला मंत्र आहे.

S.Kakade/R.Bedekar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2130039)
Read this release in: English , Urdu , Tamil