संरक्षण मंत्रालय
भारतीय नौदल प्राचीन शिलाई तंत्राचा वापर करून पारंपरिकरित्या बांधणी केलेले जहाज नौदलाच्या सेवेत दाखल करणार
Posted On:
20 MAY 2025 1:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 मे 2025
भारतीय नौदलाच्या वतीने 21 मे 2025 रोजी, कारवार इथल्या नौदल तळावर प्राचीन शिलाई तंत्राचा वापर करून बांधलेल्या जहाजाला (Ancient Stitched Ship) समारंभपूर्वक आपल्या ताफ्यात दाखल केले जाणार आहे. या समारंभातच या जहाजाच्या नावाचेही अनावरण केले जाणार आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत हे या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होणार असून, ते या समारंभाचे अध्यक्षस्थानही भूषवतील. त्यांच्या हस्तेच हे जहाज औपचारिकपणे भारतीय नौदलाच्या ताफ्यात सामील केले जाणार आहे.
प्राचीन शिलाई तंत्राचा वापर करून बांधलेले हे जहाज, अजिंठा लेण्यांमधील एका चित्रावरून प्रेरणा घेत साकारलेली 5 व्या शतकातील एका जहाजाची प्रतिकृती आहे. जुलै 2023 मध्ये सांस्कृतिक मंत्रालय, भारतीय नौदल आणि मेसर्स होडी इनोव्हेशन्स यांच्यात झालेल्या त्रिपक्षीय करारानंतर, या प्रकल्पाची औपचारिक सुरुवात झाली होती. या प्रकल्पासाठी सांस्कृतिक मंत्रालयाने आर्थिक पाठबळ पुरवले होते. या जहाजाच्या प्रत्यक्ष बांधणीची मुहूर्तमेढ 12 सप्टेंबर 2023 रोजी झाली होती. (https://www.pib.gov.in/PressReleaseIframePage.aspx?PRID=1956754).
(2)FYGB.jpeg)
प्राचीन शिलाई तंत्राचा वापर असलेल्या या जहाजाची, संपूर्ण बांधणी पारंपरिक पद्धतीने आणि परंपरागत वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाचा उपयोग करूनच केली गेली आहे. केरळमधील आघाडीचे जहाज बांधणी कारागीर बाबू शंकरन यांच्या नेतृत्वाखालील कारागिरांच्या हजारो हातांनी शिलाई तंत्राचा वापर करून जहाजाच्या सांध्यांची बांधणी केली आहे. जहाजाची बांधणी पूर्ण झाल्यानंतर फेब्रुवारी 2025 मध्ये गोव्यातील मेसर्स होडी शिपयार्डमध्ये या जहाजाचे जलावतरण केले गेले होते. (https://x.com/indiannavy/status/1895045968988643743).
XKYN.jpeg)
हे जहाज नौदलाच्या सेवेत दाखल झाल्यानंतर, या प्रकल्पाच्या दुसऱ्या महत्त्वाच्या टप्प्याचा प्रारंभ होईल. त्याअंतर्गत भारतीय नौदलाच्या वतीने या जहाजाच्या पारंपरिक सागरी व्यापारी मार्गांवरून महत्त्वाकांक्षी आणि आव्हानात्मक सागरी सफरीचा प्रारंभ केला जाईल. या जहाजाच्या सागरी सफरीमुळे भारताच्या प्राचीन सागरी वाहतुकीचे युग पुन्हा जिवंत झाल्याचा अनुभव घेता येणार आहे. या जहाजाच्या पहिल्या वहिल्या सागरी सफरीअंतर्गत गुजरातपासून ते ओमानपर्यंतची आंतरमहासागरीय सफरीची तयारी नौदलाने सुरू केली आहे.
प्राचीन शिलाई तंत्राने बांधलेल्या या जहाजाची बांधणी प्रत्यक्षात पूर्णत्वाला जाण्याच्या या घटनेतून भारताच्या समृद्ध जहाज बांधणीच्या वारशासोबतच, भारताच्या सागरी वारशाच्या जिवंत परंपरांचे जतन करत, त्यांना प्रत्यक्षात कार्यान्वित करण्याची भारतीय नौदलाची वचनबद्धता ठळकपणे अधोरेखित झाली आहे.
(1)4WNM.jpeg)
* * *
S.Kane/T.Pawar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2129812)