पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

आदमपूर हवाई तळावर पंतप्रधानांनी शूर हवाई योद्धे आणि सैनिकांशी साधलेला संवाद

Posted On: 13 MAY 2025 10:38PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 मे 2025

भारत माता की जय!

भारत माता की जय!

भारत माता की जय!

या जयघोषाचे  सामर्थ्य नुकतेच जगाने पाहिले आहे. भारत माता की जय हा केवळ जयघोष नव्हे तर भारत मातेची  प्रतिष्ठा राखण्यासाठी प्राणांची बाजी लावणाऱ्या  देशाच्या प्रत्येक सैनिकाची  ही शपथ आहे.देशासाठी काही करू इच्छिणाऱ्या, देशहितासाठी जगणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा हा आवाज आहे. भारता माता की जय हा जयजयकार मैदानातही घुमतो आणि मोहिमांमधेही. भारतीय सैनिक जेव्हा भारत मातेचा जयजयकार करतात तेव्हा शत्रूचाही थरकाप उडतो.जेव्हा आपली ड्रोन्स, शत्रूची तटबंदी ढासळवतात, जेव्हा सणसणत जाणारी आपली क्षेपणास्त्रे अचूक लक्ष्यभेद करतात तेव्हा शत्रूला ऐकू येतो भारत मातेचा जयजयकार ! जेव्हा रात्रीच्या अंधारातही आम्ही सूर्याप्रमाणे लखलखीत उजेड करणारी कामगिरी  करतो तेव्हा शत्रूसमोर तरळतो भारत मातेचा जयजयकार. शत्रूची अण्वस्त्रांची धमकी जेव्हा आपली सैन्यदले पोकळ ठरवितात तेव्हा आकाशापासून पाताळापर्यंत  एकच जयजयकार दुमदुमतो-भारत माता की जय!

मित्रहो,

आपणा सर्वांनी खरोखरच कोट्यवधी भारतीयांची मान अभिमानाने उंचावली आहे, त्यांचा ऊर अभिमानाने भरून आला आहे.आपण इतिहास घडवला आहे. आज आपल्याला भेटण्यासाठी मी सकाळी-सकाळी इथे आलो आहे. जेव्हा शूरवीरांची  पाऊले  जमिनीवर पडतात तेव्हा धरती धन्य होते, शूरवीरांचे दर्शन करण्याची संधी प्राप्त होते तेव्हा जीवन धन्य होते आणि म्हणूनच आज सकाळी-सकाळी आपले दर्शन घेण्यासाठी मी इथे आलो आहे.अनेक दशकांनंतरही जेव्हा भारताच्या या पराक्रमाची चर्चा होईल तेव्हा त्याच्या केंद्रस्थानी आपण आणि आपले सहकारी असतील.सध्याच्या पिढीबरोबरच भावी पिढ्यांसाठीही आपण नवी प्रेरणा बनले आहात.शूरवीरांच्या या धरतीवरून मी आज हवाईदल, नौदल,आणि लष्कराच्या सर्व धाडसी वीरांना, बीएसएफच्या आपल्या शूरवीरांना सलाम करतो. आपल्या पराक्रमाने आज ऑपरेशन सिंदूर देशाच्या कानाकोपऱ्यात निनादत आहे.या संपूर्ण ऑपरेशनच्या काळात प्रत्येक भारतीय आपल्यासमवेत खंबीरपणे उभा राहिला,प्रत्येक भारतीयाची प्रार्थना आपल्यासमवेत राहिली.आज प्रत्येक देशवासीय, आपले सैनिक,त्यांच्या कुटुंबाप्रती कृतज्ञ आहे, त्यांचा ऋणी आहे.

मित्रहो,

ऑपरेशन सिंदूर ही सामान्य लष्करी मोहीम नव्हे तर भारताचे धोरण,हेतू आणि निर्णायक क्षमतेची त्रिवेणी आहे.भारत ही भगवान बुद्धांचीही धरती आहे आणि  गुरु गोविंदसिंह जी यांचीही धरती आहे. गुरु गोविंदसिंह जी यांनी म्हटले होते,- सवा लाख से एक लड़ाऊं, चिड़ियन ते मैं बाज़ तुड़ाऊं, तबै गुरु गोबिंद सिंह नाम कहाऊं।”अधर्माचा नाश आणि धर्म स्थापनेसाठी शस्त्र उचलणे ही आपली परंपरा आहे. म्हणूनच आपल्या भगिनी,कन्या  यांचे कुंकू पुसले गेले तेव्हा आम्ही दहशतवाद्यांच्याच  आश्रयस्थानी घुसून त्यांचा कणा मोडला. ते भेकडाप्रमाणे लपूनछपून आले होते,मात्र ते हे विसरले की त्यांनी ज्यांना आव्हान दिले आहे ते  हिंदुस्तानचे सैन्य आहे. आपण  त्यांच्यावर समोरून हल्ला केला, दहशतवादाचे मोठे अड्डे जमीनदोस्त केले, 9 दहशतवादी तळ उध्वस्त केले, 100 हून अधिक दहशतवाद्यांना मारले,दहशतवादाच्या सूत्रधारांना आता समजले आहे की भारताकडे वाकड्या नजरेने बघण्याचा एकच परिणाम आहे- विनाश! भारताच्या निर्दोष लोकांचे रक्त सांडण्याचा  एकच परिणाम होईल – विनाश आणि सर्वनाश ! ज्या पाकिस्तानी सैन्याच्या भरवश्यावर हे दहशतवादी अवलंबून होते,त्या पाकिस्तानी सैन्यालाही भारताचे हवाईदल,भारताच्या नौदलाने धूळ चारली. आपण पाकिस्तानी सैन्यालाही दाखवून दिले की पाकिस्तानमध्ये असे कोणतेही ठिकाण नाही जिथे दहशतवादी निर्वेधपणे  राहतील.आम्ही त्यांच्या घरात घुसून मारू आणि बचावाची एक संधीही देणार नाही. आमची ड्रोन्स, आमची क्षेपणास्त्रे, यांच्या विचारानेच  पाकिस्तानची झोप उडाली असेल.

कौशल दिखलाया चालों में, उड़ गया भयानक भालों में।

निर्भीक गया वह ढालों में, सरपट दौड़ा करवालों में।

या ओळी महाराणा प्रताप यांच्या चेतक या प्रसिद्ध घोड्याबद्दल  लिहिल्या गेल्या आहेत मात्र आधुनिक  भारतीय शस्त्रांसाठीही त्या चपखल बसतात.

माझ्या शूरवीरांनो,

ऑपरेशन सिंदूरमुळे आपण देशाचे आत्मबल वाढवले आहे,देशाला एकतेच्या धाग्याने घट्ट बांधले आहे आणि आपण भारताच्या सीमांचे रक्षण केले आहे, भारताच्या स्वाभिमानाला नवी उंची दिली आहे.

मित्रहो,

आपण अभूतपूर्व,अकल्पनीय,अप्रतिम कामगिरी केली आहे. आपल्या हवाई दलाने पाकिस्तानमध्ये खोलवर दहशतवादी तळाना लक्ष्य केले. केवळ 20-25 मिनिटात सीमापार लक्ष्याचा वेध घेणे,अचूक वेध घेणे हे केवळ आधुनिक तंत्रज्ञान युक्त आणि कसलेले सैन्यच करू शकते. आपला वेग आणि अचूकता पाहून शत्रू गोंधळून गेला.आपली अवस्था विदीर्ण कधी झाली हे त्याला कळलेही नाही.
मित्रहो,

पाकिस्तानमधील दहशतवादी मुख्यालयावर हल्ला करणे आणि दहशतवाद्यांना यमसदनी पाठवणे हे आमचे उद्दिष्ट होते. पण पाकिस्तानने आपल्या प्रवासी विमानांना अग्रभागी ठेवून जी खेळी केली तेव्हाचा तो क्षण किती कठीण असेल याची मी कल्पना करू शकतो, प्रवासी विमान दिसत असताना अतिशय काळजीपूर्वक आणि सावधगिरीने त्या प्रवासी विमानाला कोणतीही हानी न पोहोचवता तुम्ही हवाई तळ ध्वस्त करून चोख प्रत्युत्तर दिले त्याचा मला अभिमान आहे.मी अभिमानाने सांगू शकतो की तुम्ही सर्वांनी तुमचे ध्येय पूर्णपणे साध्य केले आहे.पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अड्डे आणि त्यांचे हवाई तळ उद्ध्वस्त झालेच, त्याचबरोबर त्यांचे वाईट हेतू आणि दुःसाहस दोन्हीही पराभूत झाले.

मित्रहो,

ऑपरेशन सिंदूरमुळे निराश झालेल्या शत्रूने या हवाईतळावर तसेच आपल्या अनेक हवाईतळांवर हल्ला करण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला. त्यांनी आम्हाला वारंवार लक्ष्य केले, परंतु पाकिस्तानचे निष्फळ, विकृत हेतू प्रत्येक वेळी फोल ठरले. पाकिस्तानचे ड्रोन, त्यांचे यूएव्ही, पाकिस्तानची विमाने आणि त्यांची क्षेपणास्त्रे, हे सर्व आमच्या मजबूत हवाई संरक्षणाने नष्ट केले. देशातील सर्व हवाई तळांच्या नेतृत्वाचे, भारतीय हवाई दलाच्या प्रत्येक हवाई योद्ध्याचे मी मनापासून कौतुक करतो, तुम्ही खरोखरच अद्भुत काम केले आहे.

मित्रहो,

दहशतवादाविरुद्ध भारताची लक्ष्मणरेषा आता अतिशय सुस्पष्ट झाली आहे. आता जर पुन्हा दहशतवादी हल्ला झाला तर भारत त्याला प्रत्युत्तर देईल, निर्णायक उत्तर देईल. आपण हे सर्जिकल स्ट्राईक दरम्यान, एअर स्ट्राईक दरम्यान पाहिले आहे आणि आता ऑपरेशन सिंदूर हे भारताचे नवीन सामान्य स्वरूप आहे. आणि मी कालही म्हटल्याप्रमाणे, भारताने आता तीन तत्वांवर निर्णय घेतला आहे, पहिले - जर भारतावर दहशतवादी हल्ला झाला तर आम्ही आमच्या पद्धतीने, आमच्या अटींवर आणि आमच्या वेळेनुसार प्रत्युत्तर देऊ. दुसरे - भारत कोणताही आण्विक ब्लॅकमेल सहन करणार नाही. तिसरे म्हणजे, दहशतवादाला आश्रय देणारी सरकारे आणि दहशतवादी मास्टरमाईंड यात फरक केला जाणार नाही. जग भारताचे हे नवीन रूप, ही नवीन व्यवस्था समजून घेऊन वाटचाल करत आहे.

मित्रहो,

ऑपरेशन सिंदूरचा प्रत्येक क्षण भारतीय सशस्त्र दलांच्या सामर्थ्याची साक्ष देतो. मी निश्चितपणे सांगतो की या काळात, आमच्या सैन्यांमधील समन्वय उत्कृष्ट होता. सेना असो, नौदल असो किंवा हवाई दल असो, सर्वांमध्ये समन्वय जबरदस्त होता. नौदलाने समुद्रावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. सैन्याने सीमा मजबूत केली. आणि भारतीय हवाई दलाने हल्ला पण केला आणि बचावही केला. बीएसएफ आणि इतर दलांनीही उल्लेखनीय कामगिरी केली. एकात्मिक हवाई आणि स्थल युद्धजन्य प्रणालींनी उत्तम कामगिरी पार पाडली आहे. आणि हीच एकता आता भारतीय सैन्याच्या सामर्थ्याची एक मजबूत ओळख बनली आहे.

मित्रहो,

ऑपरेशन सिंदूरमध्ये, मनुष्यबळ आणि यंत्रांमधील समन्वय देखील आश्चर्यकारक राहिला आहे. अनेक लढाया अनुभवलेल्या भारताच्या पारंपरिक हवाई संरक्षण प्रणाली असोत, किंवा आकाश सारख्या आमच्या मेड इन इंडिया प्लॅटफॉर्म असोत, त्यांना S-400 सारख्या आधुनिक आणि शक्तिशाली संरक्षण प्रणालींनी अभूतपूर्व ताकद दिली आहे. एक मजबूत सुरक्षा कवच ही भारताची ओळख बनली आहे. पाकिस्तानच्या सर्व प्रयत्नांना न जुमानता, आमचे हवाई तळ किंवा आमच्या इतर संरक्षण पायाभूत सुविधांवर कोणताही परिणाम झाला नाही. आणि याचे श्रेय तुम्हा सर्वांना जाते, आणि मला तुम्हा सर्वांचा अभिमान आहे, याचे श्रेय सीमेवर तैनात असलेल्या प्रत्येक सैनिकाला जाते, या ऑपरेशनशी संबंधित प्रत्येक व्यक्तीला जाते.

मित्रहो,

आज आपल्याकडे नवीन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाची इतकी क्षमता आहे की पाकिस्तान त्याच्याशी स्पर्धा करू शकत नाही. गेल्या दशकात, हवाई दलासह आपल्या सर्व दलांकडे जगातील सर्वोत्तम तंत्रज्ञानाची उपलब्धता आहे. पण आपल्या सर्वांना माहित आहे की नवीन तंत्रज्ञानामुळे आव्हानेही तितकीच वाढतात. गुंतागुंतीच्या आणि अत्याधुनिक प्रणालींची देखभाल करणे, त्यांना कार्यक्षमतेने चालवणे, हे एक मोठे कौशल्य आहे. तंत्रज्ञानाला युक्त्यांशी जोडून तुम्ही दाखवून दिले आहे. या खेळात, जगात तुम्ही सर्वोत्तम आहात हे तुम्ही सिद्ध केले आहे. भारतीय हवाई दल आता केवळ शस्त्रांनीच नव्हे तर डेटा आणि ड्रोनच्या मदतीनेही शत्रूचा पराभव करण्यात पारंगत झाले आहे.

मित्रहो,

पाकिस्तानच्या आवाहनानंतर, भारताने केवळ आपली लष्करी कारवाई पुढे ढकलली आहे. जर पाकिस्तानने पुन्हा दहशतवादी कारवाया किंवा लष्करी दुःसाहस दाखवले तर आम्ही त्याला जशास तसे उत्तर देऊ. या प्रश्नाचे उत्तर आमच्या अटीशर्तींवर, आमच्या पद्धतीने देऊ. आणि या निर्णयाचा पाया, त्यामागचा विश्वास, तुम्हा सर्वांचा संयम, धैर्य, शौर्य आणि सतर्कता आहे. तुम्हाला हे धाडस, ही आवड, हा उत्साह असाच टिकवून ठेवावा लागेल. आपल्याला सतत सतर्क राहावे लागेल, सज्ज राहावे लागेल. आपण शत्रूला सतत जाणीव करून देत राहावे की हा एक नवीन भारत आहे. या भारताला शांतता हवी आहे, पण जर मानवतेवर हल्ला झाला तर युद्धाच्या आघाडीवर शत्रूचा नाश कसा करायचा हे देखील या भारताला चांगलेच माहित आहे. हा संकल्प करून, आपण पुन्हा एकदा म्हणूया-

भारत माता की जय। भारत माता की जय।

भारत माता की जय।

वंदे मातरम। वंदे मातरम।

वंदे मातरम। वंदे मातरम।

वंदे मातरम। वंदे मातरम।

वंदे मातरम। वंदे मातरम।

वंदे मातरम।

खूप खूप धन्यवाद.

 
Jaydevi PS/N.Chitale/V.Joshi/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 


(Release ID: 2128570)