विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या हस्ते राष्ट्रीय सुरक्षेसाठी स्वैच्छिक रक्तदान अभियानाचे उद्घाटन
विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय अशा शिबिरांचे सर्वप्रथम आयोजन करणाऱ्यांधील एक
“विज्ञान म्हणजे केवळ नवकल्पना नाही, तर कृतीतील करुणा आणि सेवा आहे,” — डॉ. जितेंद्र सिंह यांचे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन शिबिरात प्रतिपादन
“सर्व वैज्ञानिक विभाग व संस्थांमध्ये आगामी आठवड्यांत अशा रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जाईल” — डॉ. जितेंद्र सिंह
Posted On:
11 MAY 2025 6:13PM by PIB Mumbai
भारताच्या संरक्षण दलांप्रती ऐक्य आणि राष्ट्रीय सेवेच्या व्यापक हेतूसाठी, केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी वैज्ञानिक समुदायाला पुढे येऊन स्वेच्छेने रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे. सध्याच्या सुरक्षा परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर `राष्ट्रीय सेवेच्या रक्तपेढी` ची उभारणी करण्यावर त्यांनी यावेळी भर दिला.
भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या वतीने आणि भारतीय रेड क्रॉस सोसायटीच्या सहकार्याने आयोजित स्वेच्छिक रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना डॉ. सिंह यांनी सांगितले की, अशा प्रकारचा उपक्रम सुरू करणाऱ्या पहिल्या मंत्रालयांमध्ये विज्ञान मंत्रालयाचा समावेश होतो. त्यांनी विज्ञान क्षेत्रातील व्यक्तींनी केवळ नवकल्पनांमध्येच नव्हे तर सहृदय आणि समाजहिताचा विचार करणारे नागरिक म्हणूनही आपली भूमिका बजावावी, असे याप्रसंगी नमूद केले.

“आधुनिक युद्ध तंत्रज्ञान हे तंत्रज्ञानावर आधारित आहे. विज्ञान समुदाय म्हणून आपण नाविन्यपूर्ण योगदान देतोच पण त्याचबरोबर मानवतेच्या सादेला प्रतिसाद देणे हे आपले नैतिक कर्तव्य आहे. रक्तदान ही एक प्रतीकात्मक असली तरी सामूहिक ऐक्य आणि राष्ट्रसेवेची शक्तिशाली अभिव्यक्ती आहे,” असे डॉ. सिंह यावेळी म्हणाले.
यावर्षीच्या राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनाच्या संकल्पनेशी — वायएएनटीआरए: युगांतर – नवीन तंत्रज्ञान, संशोधन आणि गतीला चालना देण्यासाठी — सुसंगत राहून, या शिबिरात विज्ञानाची नैतिक आणि मानवीय बाजू अधोरेखित करण्यात आली. वैज्ञानिक प्रगती ही सामाजिक उत्तरदायित्वाची पूर्तता देखील असली पाहिजे, हे या उपक्रमातून स्पष्ट झाले.
या शिबिरात देशभरातील विविध वैज्ञानिक संस्थांमधील शास्त्रज्ञ, संशोधक, विद्यार्थी आणि कर्मचारी अशा 100 हून अधिक स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
डॉ. जितेंद्र सिंह यांनी स्वतः रक्तदात्यांशी संवाद साधला, त्यांच्या नि:स्वार्थ सेवेला दाद दिली आणि आपल्या वैद्यकीय पार्श्वभूमीचा आधार घेत रक्तदानाबाबतच्या रूढ समजुती दूर केल्या.

मंत्री महोदयांनी यावेळी सांगितले की, येत्या काही आठवड्यांत देशभरातील सर्व वैज्ञानिक विभाग व संस्थांमध्ये अशा प्रकारची रक्तदान शिबिरे आयोजित केली जातील. याद्वारे आपत्कालीन परिस्थितीत वापरता येईल अशी एक सशक्त आणि व्यापक राष्ट्रीय रक्तपेढी उभी करता येईल.
“विज्ञानाने केवळ प्रयोगशाळांपुरते मर्यादित न राहता समाजकल्याण आणि राष्ट्रीय सेवेचा अविभाज्य भाग व्हावे, असा आग्रह असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या त्या दूरदृष्टीला अनुसरून हा उपक्रम कार्यान्वित करण्यात आला आहे,” असे डॉ. सिंह यांनी समारोप मध्ये नमूद केले.
विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाने भारतीय रेड क्रॉस सोसायटी, सहभागी संस्थां आणि या राष्ट्रीय हिताच्या पवित्र कार्यात सहभागी झालेल्या प्रत्येक व्यक्तीचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. या पार्श्वभूमीवर आजचा दिवस भारतीय विज्ञानाच्या राष्ट्र निर्माणात असलेल्या बांधिलकीचा गौरव करणारा ठरला आहे.
***
M.Jaybhaye/N.Gaikwad/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2128167)
Visitor Counter : 2