लोकसभा सचिवालय
azadi ka amrit mahotsav

आम्हाला आमच्या सशस्त्र दलांचा - त्यांच्या शौर्याचा, पराक्रमाचा आणि दूरदृष्टीचा अभिमान आहे : लोकसभा अध्यक्ष

प्रविष्टि तिथि: 09 MAY 2025 10:19PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 9 मे 2025

 

'आम्हाला आमच्या सशस्त्र दलांचा - त्यांच्या शौर्याचा, पराक्रमाचा आणि दूरदृष्टीचा अभिमान आहे', असे गौरवोद्गार लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी देशातील सध्याच्या परिस्थितीचा संदर्भ देत काढले. ज्याप्रमाणे भारतीय सैन्याने आपल्या देशाच्या सीमा अजिंक्य आणि मजबूत बनवल्या आहेत, त्याचप्रमाणे भारताच्या पोलादी चौकटीने म्हणजेच भारतीय नागरी सेवेने देशाला आकार देण्यात  महत्त्वाची भूमिका बजावली आहे, असेही ते म्हणाले. तरुण नागरी सेवकांनी भारतीय मूल्ये आणि लोकशाही आदर्शांचा  अवलंब करून सेवेचा वारसा ठेवावा, असे आवाहन त्यांनी केले. यासोबतच, प्रशासन आणि सार्वजनिक प्रशासनातील त्यांच्या स्वतःच्या भूमिकांमध्ये संकल्प, शिस्त आणि सेवेची भावना जागृत ठेवावी, असे आवाहनही ओम बिर्ला यांनी केले. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज संसदेच्या परिसरात 2023 च्या तुकडीतील भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकारी प्रशिक्षणार्थींना संबोधित केले, त्यावेळी ते बोलत होते.

बिर्ला यांनी तरुण अधिकाऱ्यांना ‘विकसित भारत 2047 - एक विकसित भारत जो न्याय्य, समावेशक, नवोन्मेषी आणि जागतिक स्तरावर आदरणीय राष्ट्र’ - या दृष्टिकोनासाठी स्वतःला समर्पित करण्याचे आवाहन केले. अधिकाऱ्यांनी या दृष्टिकोनाला त्यांची दैनंदिन प्रेरणा आणि मार्गदर्शक तत्व बनवावे, असेही ते म्हणाले. मागासलेल्या आणि आदिवासी भागातील लोकांच्या गरजा पूर्ण करणे असो, गरिबांचे जीवन सुधारण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणे असो किंवा तळागाळातील लोकांपर्यंत सेवा पुरवणे असो, भारताचे भविष्य त्याच्या नागरी सेवकांच्या ताकदीवर आणि समर्पणावर अवलंबून आहे, असे ते म्हणाले. बिर्ला यांनी प्रशिक्षणार्थींना दैनंदिन आत्म-मूल्यांकनात सहभागी होण्यास तसेच पारदर्शक, प्रतिसादात्मक प्रशासनाद्वारे नागरिकांच्या जीवनात परिवर्तन  घडवण्यासाठी प्रयत्न करण्यास प्रोत्साहित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत जलद सामाजिक-राजकीय परिवर्तनातून जात असताना, नागरी सेवेतील अधिकाऱ्यांनी पुढे येऊन नेतृत्व केले पाहिजे तसेच नवीन, सक्षम भारताच्या उभारणीत उत्प्रेरक म्हणून काम केले पाहिजे, असे बिर्ला यांनी सांगितले.

प्रशासन कार्यक्षमता, पारदर्शकता आणि सेवा उपलब्धता वाढविण्यासाठी भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांनी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक अवलंब करण्याची गरज लोकसभा अध्यक्षांनी अधोरेखित केली आहे.

बिर्ला यांनी 2023 च्या तुकडीतील महिला अधिकाऱ्यांच्या विक्रमी संख्येबद्दल अभिमान व्यक्त केला. महिला प्रतिनिधित्व हे नागरी सेवांमध्ये वाढती समावेशकता आणि विविधता प्रतिबिंबित करते आणि भारताच्या बदलत्या सामाजिक रचनेचे एक मजबूत सूचक आहे, असे ते म्हणाले. 2023 च्या तुकडीतील 180 आयएएस अधिकारी प्रशिक्षणार्थी कार्यक्रमाला उपस्थित होते, त्यापैकी 73 महिला अधिकारी होत्या.

 

* * *

N.Chitale/S.Mukhedkar/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2128012) आगंतुक पटल : 8
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Punjabi , English , Urdu , हिन्दी , Bengali , Tamil