वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारत आणि चिली यांनी व्यापक आर्थिक भागीदारी करारासंदर्भातील वाटाघाटींच्या संदर्भ अटींबाबतच्या मसुद्यावर केली स्वाक्षरी

Posted On: 09 MAY 2025 2:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 9 मे 2025

 

भारत आणि चिली यांनी 8 मे 2025 रोजी दोन्ही देशांमधील व्यापक आर्थिक भागीदारी करारासंदर्भातील (CEPA) वाटाघाटींच्या संदर्भ अटींबाबतच्या मसुद्यावर (ToR) स्वाक्षरी केली. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार संबंधांच्या प्रगतीचा हा एक लक्षणीय टप्पा आहे. 

परस्पर सहमतीने मंजूर केलेल्या ToR वर चिलीचे भारतातील उच्चायुक्त जुआन अँगलो आणि भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाच्या वाणिज्य विभागाचे सहसचिव विमल आनंद यांनी स्वाक्षरी केली. आनंद यांनी भारतातर्फे भारत चिली CEPA साठी प्रमुख मध्यस्थ म्हणून काम केले. 

द्विपक्षीय संबंध दृढ करण्याचे आपले धोरण आहे याचा दोन्ही देशांनी पुनरुच्चार केला तसेच नवी दिल्लीत 26 ते 30 मे 2025 या कालावधीत होणारी चर्चेची पहिली फेरी यशस्वी ठरेल अशी आशादेखील व्यक्त केली.

दोन्ही देशांमधील सध्याचे भागीदारी संबंध आणखी मजबूत करणे आणि या भागीदारीत डिजिटल सेवा, गुंतवणूक प्रोत्साहन व सहकार्य, एमएसएमई, प्रमुख खनिजे इत्यादी व्यापक क्षेत्रांचा समावेश करणे आणि यासाठी आर्थिक समावेशन व सहकार्य वृद्धींगत करणे हा CEPA चा उद्देश आहे.  

भारत आणि चिली धोरणात्मक भागीदार आणि मित्र देश असून त्यांच्यातील परस्परसंबंध आपुलकीचे व सौहार्दाचे आहेत. दोन्ही देशांच्या उच्चस्तरीय दौऱ्यांमुळे गेल्या काही वर्षांत द्विपक्षीय संबंध हळूहळू मजबूत होत गेले. आर्थिक सहकार्याबाबतच्या आराखडा करारावर दोन्ही देशांनी जानेवारी 2005 मध्ये स्वाक्षरी केली होती. मार्च 2006 मध्ये प्राधान्य व्यापार करार (PTA) करण्यात आला. तेव्हापासून भारत आणि चिली यांच्यातील आर्थिक आणि व्यापारी संबंधांना वेग आला व ते सातत्याने विकसित होत गेले. 

सप्टेंबर 2016 मध्ये विस्तारित PTA वर स्वाक्षरी करण्यात आली आणि हा करार 16 मे 2017 पासून अमलात आला. एप्रिल 2019 मध्ये दोन्ही देशांनी PTA आणखी व्यापक करण्यावर सहमती दर्शविली आणि त्यासाठी 2019 ते 2021 या तीन वर्षांमध्ये वाटाघाटींसंदर्भात तीन वेळा चर्चा झाली. आर्थिक संबंध दृढ करण्याच्या दृष्टीने CEPA बाबत वाटाघाटी करण्याची तयारी दोन्ही देशांनी दाखवली. दोन्ही देशांमधील व्यापारी आणि वाणिज्य संबंध पूर्ण क्षमतेने विकसित करण्यासाठी रोजगाराला चालना, गुंतवणूक सुविधा, सहकार्य व निर्यात वाढविणे याबाबत चर्चा करण्यात आली. आराखडा करारानुसार स्थापन केलेल्या संयुक्त अभ्यास गटाने यासाठी शिफारस केली होती. या अभ्यास गटाच्या अहवालावर 30 एप्रिल 2024 रोजी स्वाक्षरी करण्यात आली.   

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणानुसार चिलीचे राष्ट्राध्यक्ष गॅब्रिएल बोरिक नुकतेच 1 ते 5 एप्रिल 2025 दरम्यान भारत भेटीवर आले होते. या भेटीदरम्यान दोन्ही देशांच्या या दृष्टीकोनाला पुन्हा सहमती दर्शविण्यात आली. द्विपक्षीय संबंधांमध्ये व्यापार व वाणिज्य यांचा मोठा वाटा असल्याचे दोन्ही नेत्यांनी नमूद केले. सध्याचा व्यापारी भागीदारी आराखडा मजबूत करुन विकासासाठी नव्या संधींचा शोध घेणे आवश्यक असल्याच्या मुद्द्यावर त्यांनी भर दिला. याच दृष्टीकोनातून दोन्ही नेत्यांनी परस्पर सहमतीने संदर्भ अटींच्या मसुद्यावर स्वाक्षरी करण्याला मान्यता दिली आणि व्यापक आर्थिक समावेशनासाठी संतुलित, महत्त्वाकांक्षी, सर्वसमावेशक आणि दोघांनाही फायदेशीर ठरेल असा करार करण्याच्या हेतूने CEPA वाटाघाटी प्रक्रियेचे स्वागत केले.

 

* * *

JPS/S.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2127864) Visitor Counter : 2
Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil