आयुष मंत्रालय
केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी आंतरराष्ट्रीय योग दिन 2025 साठीच्या तयारीचा घेतला आढावा
आंतरराष्ट्रीय योग दिन 2025 केवळ यशस्वीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी ठरेल: प्रतापराव जाधव
प्रविष्टि तिथि:
08 MAY 2025 6:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 मे 2025
केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली 7 मे रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या एका आढावा बैठकीत जगभरात 21 जून 2025 रोजी साजरा होणाऱ्या आगामी आंतरराष्ट्रीय योग दिन 2025 साठी सुरु असलेल्या तयारीचे मूल्यमापन करण्यात आले.
बैठकीदरम्यान, मंत्र्यांनी या वर्षीचा योग उत्सव खऱ्या अर्थाने असामान्य आणि जागतिक स्तरावर प्रभावी बनवण्याच्या सरकारच्या संकल्पनेचा पुनरुच्चार केला.
अधिकाऱ्यांना संबोधित करताना केंद्रीय आयुष मंत्री म्हणाले की, “आंतरराष्ट्रीय योग दिन 2025 मोठ्या प्रमाणात यशस्वी आणि संपूर्ण जगासाठी प्रेरणास्त्रोत ठरावा यासाठी आम्ही अत्यंत प्रामाणिकपणे आणि दृढ वचनबद्धतेने काम करूया”.

त्यांनी सर्व संबंधितांना उत्साहाने आणि एकजुटीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यास प्रोत्साहित केले आणि सांगितले की या प्रयत्नांमध्ये 'एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग' ही भावना प्रतिबिंबित झाली पाहिजे. ते पुढे म्हणाले की, “योगाच्या माध्यमातून समग्र निरामयतेचा संदेश घेऊन आपण देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात आणि जगाच्या प्रत्येक भागात पोहोचूया.”
या बैठकीत आयुष मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. या आढावा बैठकीत प्रामुख्याने खालील प्रमुख उपक्रमांचे नियोजन आणि अंमलबजावणी यावर लक्ष केंद्रित करण्यात आले:
- योग संगम - शाळा, रुग्णालये आणि कॉर्पोरेट्ससारख्या संस्थांबरोबर योग कार्यक्रमांचे एकत्रीकरण
- हरित योग - योगशी संलग्न वृक्षारोपण मोहिमेद्वारे पर्यावरणाविषयी जागरूकता वाढवणे
- योग कनेक्ट- जोडणे - योग दिनाच्या कार्यक्रमांमध्ये जागतिक आणि अनिवासी भारतीय समुदायांना सहभागी करून घेणे
- योग बंधन - मोठ्या प्रमाणात सहभागाद्वारे सामाजिक एकता आणि सामायिक कल्याणाला चालना देणे
आंतरराष्ट्रीय योग दिन 2025 चा संदेश सर्वदूर पोहचवण्यासाठी आणि यातील सहभाग वाढविण्यासाठी युवक, शैक्षणिक संस्था आणि समुदाय नेत्यांना सहभागी करून घेण्याचे महत्त्व जाधव यांनी अधोरेखित केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारानंतर 2015 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी मान्यता दिल्यापासून दरवर्षी 21 जून रोजी साजरा केला जाणारा आंतरराष्ट्रीय योग दिनाचे रूपांतर जागतिक सांस्कृतिक आणि निरामयता चळवळीत झाले आहे.
* * *
S.Bedekar/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2127756)
आगंतुक पटल : 18