दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
सी-डॉट आणि सीएसआयआर-एनपीएल यांच्यात पारंपरिक आणि क्वांटम संप्रेषणामध्ये संयुक्त संशोधनासाठी सामंजस्य करार
Posted On:
07 MAY 2025 9:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 मे 2025
पारंपरिक आणि क्वांटम संप्रेषण तंत्रज्ञानातील देशांतर्गत क्षमतांना चालना देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, टेलिमॅटिक्स विकास केंद्र (सी-डॉट) आणि वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद – राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळा (सीएसआयआर-एनपीएल) यांच्यात संयुक्त संशोधन आणि नवोन्मेषासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे.
दूरसंचार विभागाच्या अधिपत्याखालील सी-डॉट ही भारताची आघाडीची दूरसंचार संशोधन संस्था असून, स्विचिंग सिस्टिम्स, नेटवर्क प्रोटोकॉल्स, आयओटी, एम2एम, वायरलेस आणि क्वांटम संप्रेषणामध्ये नावीन्यपूर्ण संशोधन करत आहे. सीएसआयआर-एनपीएल ही भारताची राष्ट्रीय मेट्रोलॉजी संस्था असून, मापनशास्त्र, साहित्य आणि पर्यावरण विज्ञानाच्या क्षेत्रात अत्याधुनिक संशोधनाचा समृद्ध वारसा आहे.
या कराराचा मुख्य उद्देश म्हणजे संशोधन, विकास, मानकीकरण आणि पुढील पिढीच्या कम्युनिकेशन तंत्रज्ञानाची अंमलबजावणी यासाठी दीर्घकालीन सहकार्य विकसित करणे हा आहे. सी-डॉटकडे नेटवर्क प्रोटोकॉल्स, आयओटी, सॉफ्टवेअर अॅप्लिकेशन्स आणि क्वांटम कम्युनिकेशनमध्ये सखोल तांत्रिक ज्ञान असून, सीएसआयआर-एनपीएलकडे अचूक मापन, मानकीकरण आणि एसआय युनिट्सशी ट्रेसिबिलिटी यामधील अद्वितीय कौशल्य आहे, ज्यामुळे एक प्रभावशाली समन्वय साधला जाईल.

संयुक्त संशोधन व विकासाबरोबरच, या सामंजस्य करारामध्ये अतिथी व्याख्याने, कार्यशाळा, परिसंवाद आणि संयुक्त अध्यापन उपक्रमांच्या माध्यमातून शैक्षणिक देवाणघेवाण आणि ज्ञान सामायिकरणाला प्रोत्साहन देण्यात आले आहे. दोन्ही संस्थांचे प्राध्यापक, संशोधक आणि विद्यार्थी परस्पर संस्थांमध्ये सहभाग घेऊन कौशल्यविकास करतील. बौद्धिक संपदा आणि विदा सामायिकरणावरही विशेष भर देण्यात आला असून, मिळालेल्या निष्कर्षांवर न्याय्य आणि पारदर्शक व्यवस्थापन सुनिश्चित करण्यासाठी मालकी, वापर अधिकार आणि प्रकाशन मार्गदर्शक तत्त्वे परिभाषित करणारी एकत्रित चौकट विकसित केली जाणार आहे.
हा करार एका औपचारिक समारंभात झाला. यावेळी सी-डॉटचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजकुमार उपाध्याय, कार्यकारी उपाध्यक्षा शिखा श्रीवास्तव, तसेच सीएसआयआर-एनपीएलचे संचालक प्रा. वेणुगोपाल आचंटा, प्रमुख वैज्ञानिक डॉ. एस. आर. ढाकटे, वरिष्ठ प्रमुख वैज्ञानिक डॉ. पूनम अरोरा, वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. परमिता गुहा आणि सी-डॉटमधील अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
ही भागीदारी देशात उच्च-तंत्रज्ञान संशोधन व विकासाच्या क्षेत्रात आत्मनिर्भरतेच्या दिशेने घेतलेले महत्त्वाचे पाऊल आहे. सी-डॉटचे दूरसंचार नवोन्मेष आणि सीएसआयआर-एनपीएलचे मूलभूत वैज्ञानिक नेतृत्व यांचे संयोग भविष्यातील सुरक्षित, मापनीय आणि मानकीकृत संप्रेषण तंत्रज्ञानासाठी भारताला जागतिक स्तरावर अग्रणी बनविण्याचा मार्ग प्रशस्त करतो.
* * *
S.Patil/G.Deoda/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2127627)