वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारत-बेल्जियम भागीदारी मजबूत करण्याच्या उद्देशाने केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी बेल्जियमचे परराष्ट्र व्यापार मंत्री थियो फ्रँकन आणि फ्लँडर्सचे मंत्री-अध्यक्ष मॅथियास डायपेंडाइले यांची घेतली भेट

Posted On: 04 MAY 2025 10:01PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 मे 2025

 

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी 2 मे 2025 रोजी ब्रुसेल्समध्ये बेल्जियमचे संरक्षण आणि परराष्ट्र व्यापार मंत्री थियो फ्रँकन आणि फ्लँडर्स प्रदेशाचे मंत्री-अध्यक्ष मॅथियास डायपेंडाइले यांच्याबरोबर  एक फलदायी बैठक घेतली. व्यापार, तंत्रज्ञान, गुंतवणूक आणि नवोन्मेष या क्षेत्रातील भारत-बेल्जियम भागीदारी मजबूत करण्याच्या उद्देशाने ही बैठक घेण्यात आली. मार्च 2025 मध्ये बेल्जियमच्या राजकुमारी अ‍ॅस्ट्रिड यांच्या भारत दौऱ्यानंतर ही भेट झाली. या दौऱ्यात राजकुमारी अ‍ॅस्ट्रिड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या भेटीत व्यापार, तंत्रज्ञान, संरक्षण, कृषी, जीवशास्त्र, नवोन्मेष, कौशल्य आणि शैक्षणिक देवाणघेवाणीमध्ये सहकार्यासाठी नवीन मार्ग खुले करण्याच्या सामायिक महत्त्वाकांक्षेवर भर दिला होता. राजकुमारी अ‍ॅस्ट्रिड यांच्या नेतृत्वाखालील 300 हून अधिक सदस्यांच्या बेल्जियन आर्थिक मिशनने या गतिमान द्विपक्षीय संबंधांना नवीन गती दिली. दोन्ही देशांनी या गतीवर आधारित मजबूत, भविष्य-केंद्रित संबंध निर्माण करण्यासाठी आपल्या वचनबद्धतेची पुष्टी केली. हे संबंध परस्पर विकास वृद्धिंगत करतील तसेच एकात्मिक जागतिक आर्थिक चौकटीत वाढीव योगदान देतील.

या बैठकीत झालेल्या चर्चेत वाढत्या आर्थिक सहकार्यांवर प्रकाश टाकण्यात आला तसेच द्विपक्षीय व्यापार वाढवणे, औद्योगिक सहकार्य वाढवणे आणि सेमीकंडक्टर, स्वच्छ ऊर्जा, संरक्षण उत्पादन आणि औषधनिर्माण यासारख्या धोरणात्मक क्षेत्रांमध्ये गुंतवणूक वाढवणे यावर लक्ष केंद्रित केले गेले. 

सध्या विकसित होत असलेल्या जागतिक आव्हानांमध्ये परस्पर समृद्धी आणि लवचिक आर्थिक सहकार्याच्या आपल्या सामायिक दृष्टिकोनाची दोन्ही देशांनी पुष्टी केली. केंद्रीय मंत्री गोयल यांनी गेल्या दशकातील भारताच्या परिवर्तनकारी आर्थिक प्रवासावर विचार व्यक्त केले. नागरिक आणि नवउद्योजकांना सक्षम करणाऱ्या सुधारणांवर गोयल यांनी भर दिला. "गेली अकरा वर्षे केवळ आर्थिक उन्नतीची नव्हती तर आकांक्षा सक्षम करण्याचीही होती," असे गोयल म्हणाले.

या बैठकीत युरोपियन संघ-भारत मुक्त व्यापार करार (एफटीए) वाटाघाटींमधील प्रगतीचा आढावाही घेण्यात आला. दोन्ही पक्षांनी बाजारपेठेत प्रवेश वाढविण्यासाठी टेरिफ आणि नॉन-टेरिफ अडथळे दूर करण्याची गरज अधोरेखित केली. केंद्रीय मंत्री गोयल यांनी युरोपच्या विकासासाठी एक विश्वासार्ह आणि दीर्घकालीन आर्थिक भागीदार म्हणून भारताची भूमिका पुन्हा एकदा मांडली. "भारत केवळ भविष्यातील बाजारपेठ नाही - तो विश्वासार्ह सहयोगी आहे," असेही ते म्हणाले.

बेल्जियम हा युरोपमधील भारताच्या सर्वात महत्त्वाच्या आर्थिक भागीदारांपैकी एक आहे.

 

* * *

S.Bedekar/S.Mukhedkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2126884) Visitor Counter : 12
Read this release in: English , Urdu , Hindi