कृषी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केली भारतात विकसित जनुक-संपादित तांदळाच्या दोन वाणांची घोषणा


जनुक संपादित वाणे विकसित करणारा भारत ठरला जगातील पहिला देश

Posted On: 04 MAY 2025 8:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 मे 2025

 

भारतात विकसित केलेल्या जीनोम-एडिटेड म्हणजेच जनुक-संपादित तांदळाच्या दोन वाणांची आज केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नवी दिल्लीतील भारतरत्न सी. सुब्रमण्यम सभागृह, एनएएससी संकुलात घोषणा केली.  यामुळे वैज्ञानिक संशोधन आणि नवोन्मेष क्षेत्रात एका नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शास्त्रज्ञ आणि शेतकरी उपस्थित होते.

उपस्थितांना संबोधित करताना शिवराज सिंह चौहान म्हणाले, "पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकसित राष्ट्राच्या भारताच्या दृष्टिकोनाची पूर्तता करताना शेतकरी समृद्धीकडे वाटचाल करत आहेत. आजच्या कामगिरीची सुवर्णाक्षरात नोंद होईल. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवादरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी शेतकऱ्यांना कृषी आव्हानांवर मात करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या शब्दांनी प्रेरित होऊन, भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (आयसीएआर) शास्त्रज्ञांनी ही नवीन वाणे तयार करून कृषी क्षेत्रात असामान्य यश मिळवले आहे."

ते पुढे म्हणाले की,  या नवीन पिकांच्या विकासामुळे केवळ उत्पादनातच वाढ होणार नाही, तर पर्यावरणाच्या दृष्टीनेही त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील. यामुळे सिंचनासाठी लागणाऱ्या पाण्याची बचत होईल आणि हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी होईल, ज्यामुळे पर्यावरणावरचा दबाव कमी होईल. वाढलेले उत्पादन आणि पर्यावरण संरक्षण असे दोन्ही फायदे मिळवण्याचे हे उत्तम उदाहरण आहे.

  

आगामी काळात अन्नसुरक्षा सुनिश्चित करणे, पौष्टिक उत्पादन वाढवणे आणि भारताला जगाचे अन्न भांडार बनवून भारताबरोबरच जगालाही अन्न पुरवणे आवश्यक आहे, यावर चौहान यांनी भर दिला. ते म्हणाले, " आमच्या प्रयत्नांमुळे वार्षिक 48,000 कोटी रुपयांच्या बासमती तांदळाची निर्यात झाली आहे याचा आम्हाला अभिमान आहे."

सोयाबीन, तूर, मसूर, उडीद, तेलबिया आणि कडधान्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी आणखी पावले उचलण्याची गरज असल्याचेही कृषीमंत्र्यांनी सांगितले.

चौहान यांनी "मायनस 5 आणि प्लस 10" या सूत्राची ओळख करून देत, त्याची वैशिष्ट्ये स्पष्ट करताना सांगितले की, या सूत्रानुसार आहे त्याच क्षेत्रात तांदळाच्या लागवडीचे क्षेत्र 5 दशलक्ष हेक्टरने कमी करून तांदळाचे उत्पादन 10 दशलक्ष टनांनी वाढवण्याचा समावेश आहे. यामुळे कडधान्ये आणि तेलबियांच्या लागवडीसाठी जागा मोकळी होईल.  

कृषिमंत्री शिवराज सिंह यांनी शेतकऱ्यांना, विशेषतः युवा शेतकऱ्यांना प्रगत शेती तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे आवाहन केले. "आपल्याला कृषी संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. जेव्हा कृषी शास्त्रज्ञ आणि शेतकरी एकत्र येतील तेव्हा चमत्कार घडतील," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री भगीरथ चौधरी यांनी शास्त्रज्ञांचे दूरदृश्य प्रणालीद्वारे अभिनंदन केले.

या प्रसंगी, मंत्र्यांनी दोन वाणांच्या संशोधनात योगदान देणाऱ्या शास्त्रज्ञांचा सन्मान केला.

 

पार्श्वभूमीः

भारतीय कृषी संशोधन परिषदेने(आयसीएआर) ‘डीआरआर  राईस 100 (कमला)’ आणि ‘पुसा डीएसटी राईस 1’ ही भारतातील पहिली जनुक संपादित तांदळाची वाणे विकसित केली आहेत.  या वाणांमध्ये उच्च उत्पादन, हवामान अनुकूलता आणि पाणी बचतीच्या दृष्टीने क्रांतिकारी बदल घडवण्याची क्षमता आहे.

ही वाणे महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू, पुद्दुचेरी, केरळ (झोन VII), छत्तीसगड, मध्य प्रदेश (झोन V), ओडिशा, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल (झोन III) या राज्यांसाठी विकसित करण्यात आली आहेत.

या वाणांचा विकास म्हणजे,  भारताच्या विकसित राष्ट्र बनण्याच्या आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन देण्याच्या ध्येयाकडे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. 2023-24 च्या अर्थसंकल्पात, भारत सरकारने कृषी पिकांमध्ये जनुक संपादन कार्यासाठी 500 कोटी रुपयांची तरतूद केली होती.

 

* * *

S.Bedekar/S.Patil/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2126855) Visitor Counter : 13
Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil