पंतप्रधान कार्यालय
आंध्र प्रदेशातील अमरावती येथे विविध विकास कामांची पायाभरणी आणि प्रकल्पांचे लोकार्पण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
Posted On:
02 MAY 2025 11:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 मे 2025
तल्लि दुर्गा भवानि कोलुवुन्ना ई पुण्यभूमि पै मी अन्दरिनि कलवडम नाकु आनन्दमुगा उन्नदि॥
आंध्र प्रदेशचे राज्यपाल सैयद अब्दुल नजीर जी, मुख्यमंत्री आणि माझे मित्र चंद्राबाबू नायडू जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहयोगी मंत्री, उत्साही उप-मुख्यमंत्री पवन कल्याण जी, राज्य सरकारचे मंत्री, सर्व खासदार आणि आमदार आणि आंध्र प्रदेशातील माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो!
आज ज्यावेळी मी अमरावतीच्या या पावन भूमीवर उभा आहे, त्यावेळी मला हे केवळ एक शहर दिसत नाही; तर मला एक स्वप्न सत्यामध्ये उतरल्याचे दिसत आहे. एक नवीन अमरावती, एक नवीन आंध्र. अमरावती ही अशी भूमी आहे की, जिथे परंपरा आणि प्रगती दोन्ही हातात हात घालून बरोबरीने वाटचाल करीत आहेत. जिथे बुध्दांकडून वारशाने आलेली शांती आहे आणि विकसित भारताच्या निर्मितीसाठी ऊर्जाही मिळते. आज इथे जवळपास 60 हजार कोटी रूपयांच्या खर्चाच्या प्रकल्पांची पायाभरणी झाली, तसेच काही प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात आले आहे; हे प्रकल्प म्हणजे काही फक्त कॉंक्रिट वापरून केलेले बांधकाम नाही. हे प्रकल्प म्हणजे, आंध्र प्रदेशच्या आकांक्षांची, विकसित भारताच्या आशांची मजबूत पायाभरणी आहे. भगवान वीरभद्र, भगवान अमरलिंगेश्वर आणि तिरूपती बालाजी यांच्या चरणी वंदन करून मी आंध्र प्रदेशच्या सन्मानीय जनतेचे या प्रकल्पांसाठी खूप खूप अभिनंदन करतो. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू गारू आणि पवन कल्याण जी यांनांही मी खूप-खूप शुभेच्छा देतो.
मित्रांनो,
आपल्या सर्वांना माहिती आहे, इंद्रलोकाच्या राजधानीचे नाव अमरावती होते आणि आता अमरावती आंध्र प्रदेशची राजधानी आहे. हा काही फक्त योगायोग नाही, हा ‘स्वर्ण आंध्र‘च्या निर्मितीचाही शुभसंकेत आहे.
‘स्वर्ण आंध्र,‘ विकसित भारताचा मार्ग प्रशस्त करेल आणि अमरावती, ‘स्वर्ण आंध्र’च्या दूरदृष्टीला ऊर्जा देईल.
अमरावती केवलं ओक नगरम कादु अमरावती, ओक शक्ती. आंध्र प्रदेश नू आधुनिक प्रदेश गा मार्चे शक्ति, आंध्र प्रदेश नू अधूनातन प्रदेश गा मार्चे शक्ति.
मित्रांनो,
अमरावती एक असे शहर असेल, जिथे आंध्र प्रदेशातील प्रत्येक युवकाची स्वप्ने साकार होतील. माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम प्रज्ञा, हरित ऊर्जा, स्वच्छ औद्योगिक वसाहती, शिक्षण आणि आरोग्य अशा सर्व क्षेत्रांमध्ये आगामी काही वर्षांमध्ये अमरावती एक आघाडीचे शहर म्हणून उभे राहील. इतक्या सर्व प्रकल्पांसाठी ज्या, ज्या पायाभूत सुविधांची आवश्यकता असेल, त्या त्या सर्व सुविधा पुरवण्याचे काम केंद्र सरकार विक्रमी वेगाने पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारची सर्वतोपरी मदत करीत आहे. आत्ताच आपले चंद्राबाबू नायडू जी तंत्रज्ञानाच्या वापराविषयी माझे खूप कौतुक करीत होते, परंतु मी आज त्याचे एक रहस्य तुम्हाला सांगतो, ज्यावेळी मी गुजरातमध्ये नव्याने मुख्यमंत्री बनलो, त्यावेळी मी चंद्राबाबू हैद्राबादमध्ये बसून कशा कशा प्रकारचे तंत्रज्ञानविषयक उपक्रम राबवतात, त्याचा अगदी बारकाईने अभ्यास करीत होतो, आणि मी त्यातून खूप काही शिकतही होतो. आता या सर्व तांत्रिक गोष्टी लागू करण्याची संधी मला मिळाली आहे; आणि आता मी आपल्या अनुभवातून सांगतो की, भविष्यात येणारे तंत्रज्ञान असो, खूप मोठ्या प्रमाणावर कोणतेही काम करायचे असो, आणि हे काम लवकरात लवकर साकार व्हावे, असे वाटत असेल, तर ते काम चंद्राबाबू उत्तमातील उत्तम प्रकारे करू शकतात.
मित्रांनो,
2015 मध्ये मला प्रजा राजधानीचा शिलान्यास करण्याची संधी मिळाली होती. गेल्या वर्षांमध्ये केंद्र सरकारने सर्वतोपरी अमरावतीसाठी मदत केली आहे. येथे पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यासाठी आवश्यक असणारी पावले उचलली आहेत. आता चंद्राबाबू गारू यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार बनल्यानंतर आता या कामाला लागलेले ग्रहण सुटले आहे. त्यामुळे इथे विकास कामांना वेग आला आहे. उच्च न्यायालय, विधानसभा, सचिवालय, राजभवन अशा आवश्यक असलेल्या अनेक वास्तूंच्या इमारती बनविण्याच्या कामांना प्राधान्य दिले जात आहे.
मित्रांनो,
एनटीआर गारू यांनी विकसित आंध्र प्रदेशचे स्वप्न पाहिले होते. आपण सर्वांनी मिळून अमरावतीला, आंध्र प्रदेशला, विकसित भारताचे 'ग्रोथ इंजिन' बनवायचे आहे. आपल्याला एनटीआर गारू यांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. चंद्राबाबू गारू, बंधू पवन कल्याण, इदि मनमु चेय्याली इदि मनमेू चेय्याली.
मित्रांनो,
गेल्या दहा वर्षांमध्ये भारताने देशामध्ये ‘फिजिकल, डिजिटल’ आणि सामाजिक पायाभूत सुविधांवर विशेष भर दिला आहे. भारत आज जगातल्या अशा देशांमध्ये सहभागी झाला आहे की, जिथे पायाभूत सुविधा वेगाने आधुनिक होत आहेत. याचा फायदा आंध्र प्रदेशालाही मिळत आहे. आजही रेल्वे आणि रस्ते यांच्याशी संबंधित हजारो कोटी रूपयांचे प्रकल्प आंध्र प्रदेशाला मिळत आहेत. येथे आंध्र प्रदेशातील संपर्क सुविधा आणि दळणवळण व्यवस्थेविषयी नवीन अध्याय लिहिला जात आहे. या प्रकल्पांमुळे सर्व जिल्ह्यांना एकमेकांशी संपर्क साधणे आणि दळणवळण करणे सुलभ होणार आहे. तसेच आसपासच्या राज्यांमध्ये दळणवळण सुकर होणार आहे, यामुळे शेतकरी मोठ्या बाजारपेठेमध्ये आपला कृषी माल पोहोचवू शकणार आहेत, आणि उद्योगांनाही चांगली सुविधा उपलब्ध होणार आहे. पर्यटन क्षेत्राला बळ मिळेल, तीर्थयात्रा करणे सोपे जाईल. आता रेणीगुंठा ते नायडूपेटा महामार्गाने तिरूपती बालाजी येथे दर्शनासाठी जाणे अधिक सुलभ होणार आहे. लोकांना खूप कमी अवधीमध्ये व्यंकटेश्वर स्वामींचे दर्शन करणे शक्य होणार आहे.
मित्रांनो,
जगभरातील जे जे देश वेगाने विकसित झाले आहेत, त्यांनी आपल्या रेल्वे वाहतुकीवर खूप जास्त भर दिला आहे. गेल्या दशकामध्ये भारतामध्ये रेल्वे वाहतुकीमध्ये अमुलाग्र परिवर्तन घडवून आणले आहे. भारत सरकारने आंध्र प्रदेशमध्ये रेल्वे विकासासाठी विक्रमी निधी दिला आहे. वर्ष 2009 ते 2014 पर्यंत आंध्र प्रदेश आणि तेलंगणासाठी रेल्वेचे एकूण अंदाजपत्रक 900 कोटी रूपयांपेक्षाही कमी होते. याच्या तुलनेत आज एकट्या आंध्र प्रदेशचे रेल्वे अंदाजपत्रक 9 हजार कोटी रूपयांपेक्षा जास्त आहे. याचा अर्थ जवळपास दहापटीपेक्षा जास्त वाढ निधीमध्ये झाली आहे.
मित्रांनो,
रेल्वेचे वाढलेल्या अंदाजपत्रकामुळे आंध्र प्रदेशातील रेल मार्गांचे शंभर टक्के विद्युतीकरणाचे काम झाले आहे. आता इथे आधुनिक वंदे भारतच्या गाड्या आठ जोड्यांमध्ये धावतात. त्याच बरोबर आधुनिक सुविधा असलेली अमृत भारत गाडीही आंध्र प्रदेशातून धावत आहे. गेल्या 10 वर्षांमध्ये आंध्र प्रदेशमध्ये 750 पेक्षा अधिक रेल्वे उड्डाण पूल आणि भूमिगत रेल मार्ग बनविण्यात आले आहेत.
याशिवाय, अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत आंध्रप्रदेशातील 70 हून अधिक रेल्वे स्थानकांचा विकास करण्यात येत आहे.
मित्रांनो,
पायाभूत सुविधांसाठी जेव्हा इतकी कार्ये करण्यात येतात तेव्हा त्याचा परिणाम अनेक पटीने दिसून येतो. या पायाभूत सुविधांच्या निर्मितीत जो कच्चा माल लागतो त्यातून उत्पादन उद्योगाला चालना मिळते. सिमेंटचे काम असो, पोलादाचे काम असो किंवा वाहतूक असो, अशा प्रत्येक क्षेत्राला त्यातून लाभ होतो. पायाभूत सुविधा विकासाचा थेट लाभ आपल्या तरुणांना मिळतो, त्यांना अधिक रोजगार मिळतो. आंध्रप्रदेशातील हजारो युवकांना देखील या पायाभूत सुविधा विकास प्रकल्पांमध्ये रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत.
मित्रांनो,
मी लाल किल्ल्यावरून सांगितले होते की विकसित भारताची उभारणी गरीब, शेतकरी, तरुण आणि महिलाशक्ती या चार स्तंभांच्या आधाराने होईल. एनडीए सरकारच्या धोरणाचे केंद्रात हे चार स्तंभ सर्वात महत्वाचे आहेत. विशेषतः शेतकऱ्यांच्या हिताला प्रथम प्राधान्य देऊन आम्ही काम करत आहोत. शेतकऱ्यांच्या खिशावर ओझे पडू नये या दृष्टीने गेल्या 10 वर्षात केंद्र सरकारने त्यांना स्वस्त दरात खते उपलब्ध करून देण्यासाठी आतापर्यंत 12 लाख कोटी रुपये खर्च केले आहेत. हजारो नवे आणि आधुनिक बियाणे देखील सरकारने शेतकऱ्यांना दिले आहेत. पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत आंध्रप्रदेशातील शेतकऱ्यांना आतापर्यंत साडेपाच हजार कोटी रुपयांचे दावे मिळाले आहेत. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेतून देखील आंध्रातील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये साडेसतरा हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम पोहोचली आहे.
मित्रांनो,
आज संपूर्ण देशात सिंचन प्रकल्पांचे जाळे उभारण्यात येत आहे. नदी-जोड अभियान देखील सुरु करण्यात आले आहे. प्रत्येक शेताला पाणी मिळावे, शेतकऱ्यांना पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागू नये हे आमचे उद्दिष्ट आहे. येथे नवे सरकार आल्यानंतर पोलवरम प्रकल्पाला देखील नवा वेग मिळाला आहे. आंध्र प्रदेशातील लाखो, कोट्यवधी लोकांचे आयुष्य या प्रकल्पामुळे बदलून जाणार आहे. पोलवरम प्रकल्प लवकर पूर्ण व्हावा यासाठी केंद्रातील एनडीए सरकारतर्फे राज्य सरकारला सर्वतोपरी मदत देण्यात येत आहे.
मित्रांनो,
आंध्राच्या भूमीने गेली अनेक दशके भारताला अंतराळ क्षेत्रात सामर्थ्यवान बनवण्यात फार मोठी भूमिका निभावली आहे. श्रीहरीकोटा येथून जेव्हा जेव्हा एखादी अंतराळ मोहीम सुरु होते तेव्हा ती कोट्यवधी भारतीयांची मने अभिमानाने भरून टाकते. भारतातील कोट्यवधी नवयुवकांना हा प्रदेश अंतराळ क्षेत्राकडे आकर्षित करत राहिला आहे. आज देशाला, आपल्या संरक्षण क्षेत्राला बळकटी देणारी संस्था देखील येथे सुरु झाली आहे. काही वेळापूर्वीच आम्ही डीआरडीओच्या नव्या क्षेपणास्त्र चाचणी यंत्रणेच्या उभारणीची कोनशीला रचली आहे. नागयालंकामध्ये उभारली जात असलेली ही नवदुर्गा चाचणी यंत्रणा दुर्गामातेप्रमाणेच देशाला संरक्षणविषयक सामर्थ्य देईल. यासाठी देखील मी देशातील वैज्ञानिकांचे, आंध्रप्रदेशातील लोकांचे अभिनंदन करतो.
मित्रांनो,
आज केवळ आपली शस्त्रास्त्रेच नव्हे तर आपली एकजूट देखील भारताची ताकद आहे. ऐक्याची ही भावना आपल्या एकता मॉल्सद्वारे बळकट होते. देशातील अनेक शहरांमध्ये एकता मॉल्स उभारण्यात येत आहेत. आता विशाखापट्टणममध्ये देखील एकता मॉल सुरु होणार आहे याचा मला आनंद आहे. या एकता मॉलमध्ये देशभरातील कारागीर, हस्तकलाकारांनी तयार केलेली उत्पादने एकच छताखाली उपलब्ध होतील. भारतातील विविधतेच्या माध्यमातून हा मॉल सर्वांना एकत्र बांधून ठेवेल. एकता मॉलमुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला देखील चालना मिळेल आणि ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ची भावना देखील अधिक सशक्त होईल.
मित्रांनो,
नुकतेच आपण चंद्राबाबूंचे भाषण ऐकले, त्यांनी 21 जूनच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा उल्लेख केला . येत्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सरकारतर्फे आयोजित होणारा मुख्य कार्यक्रम आंध्रप्रदेशात आयोजित करण्यात यावा असे निमंत्रण दिल्याबद्दल मी चंद्राबाबू, आंध्र सरकार आणि आंध्रप्रदेशातील जनतेचे आभार मानतो. जसे तुम्ही आत्ता म्हटलात त्याप्रमाणे मी स्वतःदेखील आंध्रच्या जनतेसोबत योगाभ्यास करीन आणि जगातील एक कार्यक्रम येथे आयोजित करण्यात येईल. या कार्यक्रमाला यावर्षी अशासाठी विशेष महत्त्व आहे की दहाव्या वर्षीचा हा कार्यक्रम गेली 10 वर्ष सुरु राहिला आहे हा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे.संपूर्ण जगभरात योगसाधनेचे प्रचंड आकर्षण आहे, या वर्षी संपूर्ण जगाच्या नजरा 21 जून रोजी आंध्राकडे वळलेल्या असतील आणि येत्या 50 दिवसांमध्ये योगाच्या संदर्भात आंध्र प्रदेशामध्ये एक जबरदस्त वातावरण तयार केले जावे, स्पर्धा घेण्यात याव्या, आणि त्यामध्ये जागतिक विक्रम रचून आंध्र प्रदेशाने संपूर्ण जगाला आश्चर्यचकित करून टाकावे आधी माझी इच्छा आहे. आणि मला असे वाटते की चंद्राबाबू यांच्या नेतृत्वाखाली असे नकीच घडू शकेल.
मित्रांनो,
आंध्रप्रदेशात स्वप्ने पाहणाऱ्यांची कमी नाही आणि स्वप्ने साकार करणाऱ्यांची देखील कमी नाही. विकासाचा हा वेग आपल्याला सतत वाढता ठेवावा लागेल आणि मी असे म्हणू शकतो की चंद्राबाबूंनी जसे तीन वर्षांत अमरावती अमरावतीच्या उभारणीचे स्वप्न पाहिले आहे, याचा अर्थ असा की या तीन वर्षांत केवळ अमरावतीमधील व्यवहार आंध्रप्रदेशाच्या जीडीपीला कुठून कुठे नेऊन ठेवतील ते मला स्पष्ट दिसते आहे. मी आंध्रप्रदेशच्या जनतेला, येथे माझ्यासोबत बसलेल्या सहकार्यांना पुन्हा एकदा हा विश्वास देऊ इच्छितो की आंध्रप्रदेशाच्या प्रगतीसाठी तुम्ही मला तुमच्या खांद्याला खांदा भिडवून काम करताना बघाल. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. मी अन्दरि आशीर्वादमुतो ई कूटमि आन्ध्रप्रदेश अभिवृद्धिकि कट्टूबडि उन्नदि॥
धन्यवाद!
भारत मातेचा विजय असो! भारत मातेचा विजय असो!
भारत मातेचा विजय असो!
वंदे मातरम! वंदे मातरम!
वंदे मातरम! वंदे मातरम!
वंदे मातरम! वंदे मातरम!
वंदे मातरम! वंदे मातरम!
* * *
S.Nilkanth/JPS/Suvarna/Sanjana/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2126431)
Visitor Counter : 9