रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नागपूर येथील ‘मल्टी मोडल लॉजिस्टिक पार्क’मध्ये व्यावसायिक संचालनास प्रारंभ

Posted On: 30 APR 2025 2:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 एप्रिल 2025

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘पीएम गतिशक्ती’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाअंतर्गत आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली, नागपूर येथील वर्ध्याजवळ सिंदी येथे उभारण्यात आलेल्या ‘मल्टी मोडल लॉजिस्टिक्स पार्क लिमिटेड’  (एमएमएलपी नागपूर), या प्रकल्पाने जलद आणि कार्यक्षम वाहतुकीची साखळी निर्माण करण्याच्या उद्देशाने आपले व्यावसायिक संचालन सुरू केले आहे. ‘पीएम गतिशक्ती’ हा उपक्रम देशभरातील लोक, वस्तू आणि सेवांच्या वाहतुकीसाठी विविध वाहतूक साधनांमधून अखंड आणि कार्यक्षम संपर्क प्रस्थापित करण्याचा उद्देश ठेवतो, त्यातून शेवटच्या टप्प्यापर्यंतची जोडणी सुधारण्यास तसेच प्रवासाचा वेळ कमी करण्यास मदत होते. 

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची (एनएचएआय) 100 टक्के मालकीची कंपनी असलेल्या राष्ट्रीय महामार्ग लॉजिस्टिक्स मॅनेजमेंट लिमिटेड (एनएचएलएमएल) ने स्थापन केलेल्या एमएमएलपी नागपूरला, 28 एप्रिल रोजी फरूखनगर येथून 123 मारुती कार्सचा पहिला रेल्वे रेक प्राप्त झाला, आणि ही गोष्ट या सुविधेसाठी एक महत्त्वपूर्ण उपलब्धी ठरली.

एनएचएलएमएल ने मल्टी मोडल लॉजिस्टिक्स पार्क (एमएमएलपी) साठी एका खासगी विकासकासोबत सार्वजनिक-खाजगी भागीदारी (पीपीपी) तत्वावर करार केला आहे. हा पार्क तीन टप्प्यांमध्ये, 150 एकर क्षेत्रावर, 45 वर्षांच्या सवलत कालावधीसह, अंदाजे 673 कोटी रुपयांच्या खर्चाने विकसित केला जाणार आहे. पहिला टप्पा 137 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीने विकसित केला जाणार आहे.

राष्ट्रीय महामार्ग लॉजिस्टिक्स मॅनेजमेंट लिमिटेड (एनएचएलएमएल) आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण (जेएनपीए) यांच्यात महाराष्ट्र एमएमएलपी प्रायव्हेट लिमिटेड नावाने एक अधिकृत विशेष उद्देश संस्था (एसपीव्ही) स्थापन करण्यात आली आहे. ही संस्था एमएमएलपी च्या विकासासाठी जमीन, बाह्य रेल्वे आणि रस्ते जोडणी, तसेच पाणी आणि वीज पुरवठा उपलब्ध करून देईल.

या एमएमएलपी मध्ये गोदामे, शीतगृह, इंटरमोडल ट्रान्सफर, कंटेनर टर्मिनलसाठी हाताळणी सुविधा, बल्क/ब्रेक-बलक मालवाहतुकीसाठी टर्मिनल्स, तसेच वर्गीकरण/श्रेणीकरण, एकत्रीकरण/विभाजन क्षेत्र, बंधनकारक गोदामे, सीमाशुल्क सुविधा यासारख्या मूल्यवर्धित सेवा आणि मालवाहतूकदार, वाहतूकदारांसाठी कार्यालये आणि  ट्रक टर्मिनल्स यांसारख्या सहाय्यक सुविधा उपलब्ध असतील.

एमएमएलपी नागपूरचा विकास देशातील मालवाहतूक व्यवस्थेत सुधारणा घडवून आणेल. कार्यक्षम इंटरमोडल मालवाहतूक शक्य होईल, मालवाहतुकीचा एकूण खर्च आणि वेळ कमी होईल; कार्यक्षम गोदाम व्यवस्था उपलब्ध होईल, मालाच्या हालचालींचे ट्रॅकिंग आणि  तपशीलवार नोंदी ठेवता येतील, आणि यामुळे भारतीय लॉजिस्टिक्स क्षेत्राची कार्यक्षमता वाढेल. यासोबतच रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि या भागाचा आर्थिक विकास साधला जाईल.

 

* * *

S.Bedekar/G.Deoda/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2125427) Visitor Counter : 19