शिक्षण मंत्रालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘युग्म’ नवोन्मेष परिषदेला केले संबोधित
तरुणांना आत्मनिर्भर बनवणाऱ्या कौशल्यांनी सक्षम करून भारताला जागतिक नवोन्मेष केंद्र म्हणून स्थापित करण्याचा आमचा प्रयत्न: पंतप्रधान
आम्ही 21व्या शतकाच्या गरजांनुसार देशाच्या शिक्षण व्यवस्थेचे आधुनिकीकरण करत आहोत: पंतप्रधान
देशात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तयार करताना शिक्षणाच्या जागतिक मानकांचा विचार : पंतप्रधान
एक राष्ट्र, एक सदस्यत्व योजनेद्वारे सरकार आपल्या गरजा जाणून घेत असल्याचा तरुणांना मिळाला विश्वास, आज उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या संशोधन ‘जर्नल्स’मध्ये सहज प्रवेश: पंतप्रधान
भारतातील विद्यापीठ संकुले गतिमान केंद्र म्हणून उदयास येत असून युवाशक्तीला तिथे अभूतपूर्व नवोपक्रम राबवण्यास वाव: पंतप्रधान
टॅलेंट (प्रतिभा), टेम्परामेंट (स्वभाव) आणि टेक्नॉलॉजी (तंत्रज्ञानाची) ही त्रिसूत्री भारताचे भविष्य बदलेल: पंतप्रधान
संकल्पनेपासून ते प्रारूप आणि उत्पादनाचा प्रवास अल्पावधीत पूर्ण करणे अत्यंत महत्त्वाचे: पंतप्रधान
आम्ही मेक एआय इन इंडियाच्या दृष्टिकोनावर काम करत असून मेक एआय वर्क फॉर इंडियासाठी काम करण्याचे आमचे ध्येय: पंतप्रधान
प्रविष्टि तिथि:
29 APR 2025 8:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 एप्रिल 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित युग्म नवोन्मेष परिषदेला संबोधित केले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना, त्यांनी सरकारी अधिकारी, शैक्षणिक संस्था आणि विज्ञान आणि संशोधन व्यावसायिकांच्या महत्त्वपूर्ण मेळाव्यावर प्रकाश टाकला आणि "युग्म" - विकसित भारतासाठी भविष्यातील तंत्रज्ञानाचा विकास करण्याच्या उद्देशाने एक सहकार्य - म्हणून हितधारकांच्या मिलाफावर भर दिला. या कार्यक्रमाद्वारे भारताची नाविन्यपूर्ण क्षमता आणि सखोल तंत्रज्ञानातील त्याची भूमिका वाढविण्याच्या प्रयत्नांना गती मिळेल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. आयआयटी कानपूर आणि आयआयटी मुंबई येथे कृत्रिम प्रज्ञा, सक्षम प्रणाली आणि जैवविज्ञान, जैवतंत्रज्ञान, आरोग्य आणि औषध यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या सुपर हबच्या उदघाटनाचा त्यांनी उल्लेख केला. राष्ट्रीय संशोधन संस्थेच्या सहयोगातून संशोधनाला चालना देण्याच्या बांधिलकीला दुजोरा देणाऱ्या वाधवानी नवोन्मेष नेटवर्कच्या उदघाटनाचाही त्यांनी उल्लेख केला. पंतप्रधानांनी वाधवानी प्रतिष्ठान, आयआयटी आणि या उपक्रमांमध्ये सहभागी असलेल्या सर्व हितधारकांचे अभिनंदन केले. खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रांमधील सहयोगाद्वारे देशाच्या शिक्षण व्यवस्थेत सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल आणि सक्रिय भूमिकेबद्दल त्यांनी रोमेश वाधवानी यांचे विशेष कौतुक केले.
संस्कृतमधील धर्मग्रंथांचा दाखला देऊन खऱ्या जीवनाचे सार हे सेवा आणि निस्वार्थतेने जगण्यात आहे याकडे लक्ष वेधून मोदी म्हणाले की, विज्ञान आणि तंत्रज्ञान हे देखील सेवेचे माध्यम असले पाहिजे. वाधवानी प्रतिष्ठानसारख्या संस्था आणि रोमेश वाधवानी आणि त्यांच्या चमूने भारतात विज्ञान आणि तंत्रज्ञान योग्य मार्गावर नेले आहे याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. फाळणीनंतरचे संघर्ष, त्यांच्या जन्मभूमीतून विस्थापन, बालपणात पोलिओशी झुंजणे आणि या आव्हानांवर मात करून एक मोठे व्यावसायिक साम्राज्य निर्माण करणे यासारख्या संघर्षांनी भरलेल्या वाधवानी यांच्या उल्लेखनीय जीवनकार्य प्रवासावर त्यांनी प्रकाश टाकला. भारताच्या शिक्षण आणि संशोधन क्षेत्रांना त्यांचे यश समर्पित केल्याबद्दल वाधवानी यांची प्रशंसा करताना पंतप्रधान म्हणाले, त्यांनी केलेले कार्य अनुकरणीय आहे. शालेय शिक्षण, अंगणवाडी तंत्रज्ञान आणि कृषी-तंत्रज्ञान उपक्रमांमध्ये प्रतिष्ठानच्या योगदानाचे त्यांनी कौतुक केले. वाधवानी इन्स्टिट्यूट ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या स्थापनेसारख्या कार्यक्रमांमध्ये त्यांनी पूर्वी घेतलेल्या सहभागाची त्यांनी नोंद घेतली आणि भविष्यातही फाउंडेशन असंख्य टप्पे गाठत राहील असा विश्वास व्यक्त केला आणि वाधवानी फाउंडेशनला त्यांच्या प्रयत्नांसाठी शुभेच्छा दिल्या.
कोणत्याही राष्ट्राचे भविष्य त्याच्या तरुणांवर अवलंबून असते आणि भविष्यासाठी त्यांना सज्ज करण्याचे महत्त्व अधोरेखित करून, पंतप्रधानांनी या सज्जतेमध्ये शिक्षण व्यवस्था महत्त्वाची भूमिका बजावते असे नमूद केले आणि 21 व्या शतकातील गरजा पूर्ण करण्यासाठी भारताच्या शिक्षण व्यवस्थेचे आधुनिकीकरण करण्याच्या प्रयत्नांवर भर दिला. जागतिक शिक्षण मानके लक्षात घेऊन तयार केलेल्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या समावेशावर त्यांनी प्रकाश टाकला आणि भारतीय शिक्षण व्यवस्थेत त्यामुळे झालेले महत्त्वपूर्ण बदल निदर्शनास आणले. त्यांनी राष्ट्रीय अभ्यासक्रम चौकट, शैक्षणिक अध्ययन साहित्य आणि इयत्ता पहिली ते सातवीसाठी नवीन पाठ्यपुस्तकांच्या विकासाबाबत माहिती दिली. 30 हून अधिक भारतीय भाषांमध्ये आणि सात परदेशी भाषांमध्ये पाठ्यपुस्तके तयार करणे शक्य झालेल्या पीएम ई-विद्या आणि दीक्षा प्लॅटफॉर्म अंतर्गत एआय-आधारित आणि स्केलेबल डिजिटल शिक्षण पायाभूत सुविधा प्लॅटफॉर्म - 'एक राष्ट्र, एक डिजिटल शिक्षण पायाभूत सुविधा' च्या निर्मितीवर त्यांनी प्रकाश टाकला.
नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्कमुळे विद्यार्थ्यांना एकाच वेळी वेगवेगळ्या शाखांचे आधुनिक शिक्षण घेता येणार आहे. त्यामुळे विविध विषयांचा अभ्यास होत असल्यामुळे त्यांना करिअरसाठी नवे मार्ग स्वीकारणे आता सोपे झाले आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले. राष्ट्रीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी भारताच्या संशोधन परिसंस्थेला बळकटी देण्याच्या महत्त्वावर त्यांनी जोर दिला. अत्याधुनिक संशोधन संस्थांची स्थापना आणि सुमारे 6000 उच्च शिक्षण संस्थांमधून संशोधन आणि विकास केंद्रांची निर्मिती केली जात आहे. यासाठी 2013-14 मध्ये संशोधन आणि विकास (R&D) यावरचा एकूण खर्च 60,000 कोटी रुपयांवरून 1.25 लाख कोटी रुपये इतका वाढविण्यात आल्याचे त्यांनी अधोरेखित केले. बौध्दिक संपदा स्वामित्व मिळवण्यासाठी 2014 मध्ये सुमारे 40,000 अर्ज देशभरातून केले जात होते. आता हे प्रमाण 80,000 पर्यंत वाढल्याचा दाखला देत त्यांनी भारतातील नाविन्यपूर्ण संशोधन संस्कृतीच्या जलद विकासावर भाष्य केले. यामुळे युवा वर्गाने तयार केलेल्या बौद्धिक संपदेला प्रदान केलेले समर्थन प्रतिबिंबित होत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. देशात संशोधन संस्कृती आणि वन नेशन, वन सबस्क्रिप्शन उपक्रमाला चालना देण्यासाठी 50,000 कोटी रुपये खर्च करुन स्थापन केलेल्या राष्ट्रीय संशोधन प्रतिष्ठानवर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला. आता यामुळे उच्च शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी जागतिक दर्जाच्या संशोधन नियतकालिकांमधून प्रवेश सुलभ झाला आहे. प्रतिभावान व्यक्तींना त्यांच्या कारकीर्दीत प्रगती करताना कोणत्याही अडथळ्यांना सामोरे जावे लागणार नाही, यासाठी सुरू केलेल्या पंतप्रधान रिसर्च फेलोशिपवर त्यांनी भर दिला.

भारतातील तरुण पिढीच्या विविध क्षेत्रांतील संशोधनातील परिवर्तनशील योगदानावर भर देत मोदी यांनी अधोरेखित केले, की आजचे तरुण केवळ संशोधन आणि विकासातच अग्रेसर आहेत असे नाही, तर ते प्रचंड उत्साही आणि धाडसी झाले आहेत. आयआयटी मद्रास यांनी भारतीय रेल्वेच्या सहकार्याने विकसित केलेला 422-मीटर जगातील सर्वात लांब हायपरलूप चाचणी ट्रॅक, यासारख्या टप्प्यांचे स्मरण केले. नॅनो-स्केलवर प्रकाश नियंत्रित करण्यासाठी IISc बंगळुरू येथील शास्त्रज्ञांनी विकसित केलेल्या नॅनोटेक्नॉलॉजी आणि 16,000+ वहन अवस्थेतील डेटा संग्रह आणि प्रक्रिया करण्यास सक्षम असलेल्या 'ब्रेन ऑन अ चिप' या तंत्रज्ञानासारख्या महत्त्वपूर्ण कामगिरीवर त्यांनी प्रकाश टाकला. थोड्याच आठवड्यांपूर्वी भारतातील पहिल्या स्वदेशी बनावटीच्या एमआरआय मशीनच्या विकासाचाही त्यांनी यावेळी उल्लेख केला. युवाशक्ती नवनवीन क्षेत्रात शोध लावत आहे, त्यामुळे भारतातील विद्यापीठ परिसर नवनवीन उपक्रमशील केंद्रे म्हणून उदयास येत आहेत”, असे मोदी म्हणाले. जागतिक स्तरावरील 2,000 संस्थांमध्ये भारतातील 90 पेक्षा जास्त विद्यापीठे सूचीबद्ध आहेत जे उच्च शिक्षणाच्या क्रमवारीत भारताचे प्रतिनिधित्व दर्शविते.गेल्या दशकापासून जगातील उत्कृष्ट 500 उच्च शिक्षण संस्थांमध्ये भारतीय संस्थांचे प्रतिनिधित्व वाढत असून जिथे 2014 मधे नऊ भारतीय संस्था होत्या त्यांची संख्या 2025 मध्ये सेहेचाळीसच्यावर गेली आहे आणि जागतिक क्यूएस क्रमवारीत भारताने वाढ नोंदवली आहे. तसेच अबू धाबीमध्ये आयआयटी दिल्ली, टांझानियामधील आयआयटी मद्रास आणि दुबईतील आगामी आयआयएम अहमदाबाद यांसारख्या परदेशात आपल्या शाखा स्थापन करणाऱ्या भारतीय संस्थांची नावेही त्यांनी नमूद केली. आघाडीची जागतिक विद्यापीठे देखील भारतात आपल्या शाखा उघडत आहेत, शैक्षणिक देवाणघेवाण, संशोधन सहयोग आणि भारतीय विद्यार्थ्यांसाठी क्रॉस-कल्चरल शिक्षणाच्या संधींना प्रोत्साहन देत आहेत, असे त्यांनी यावेळी अधोरेखित केले.
अटल टिंकरिंग लॅब्स ज्यापैकी, 10,000 लॅब आधीपासूनच कार्यरत आहेत आणि या वर्षीच्या अर्थसंकल्पात 50,000 अधिक लॅब्ज विद्यार्थ्यांना लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याची घोषणा झाली आहे असे सांगत अनेक उपक्रमांवर त्यांनी प्रकाश टाकत,“प्रतिभा, स्वभाव आणि तंत्रज्ञान या त्रिगुणांमुळे भारताचे भविष्य बदलेल”, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी पीएम विद्या लक्ष्मी योजनेचा शुभारंभ आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे वास्तविक-जगातील अनुभवामध्ये रूपांतर करण्यासाठी 7,000 हून अधिक संस्थांमध्ये इंटर्नशिप सेलची स्थापना केल्याचे त्यांनी नमूद केले. तरुणांमध्ये नवीन कौशल्ये विकसित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत, ज्यांची एकत्रित प्रतिभा, स्वभाव आणि तांत्रिक सामर्थ्य भारताला यशाच्या शिखरावर नेईल, अशी त्यांनी टिपणी केली.
पुढील 25 वर्षात विकसित भारताचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे महत्त्व अधोरेखित करताना पंतप्रधान म्हणाले, "कल्पनेपासून प्रोटोटाइपपर्यंतचा प्रवास शक्य तितक्या कमी वेळात पूर्ण करणे महत्त्वाचे आहे". प्रयोगशाळेपासून बाजारपेठेपर्यंतचे अंतर कमी केल्याने लोकांपर्यंत संशोधनाचे परिणाम जलद पोहोचतात, संशोधकांना प्रेरणा मिळते आणि त्यांच्या कामासाठी प्रत्यक्ष प्रोत्साहन मिळते यावर त्यांनी भर दिला. हे संशोधन, नवकल्पना आणि मूल्यवर्धनाच्या चक्राला गती देते. शैक्षणिक संस्था, गुंतवणूकदार आणि उद्योगांना संशोधकांना पाठिंबा देण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी पंतप्रधानांनी संशोधन परिसंस्थांचे सबलीकरण करण्याचे आवाहन केले. त्यांनी तरुणांना मार्गदर्शन करणे, निधी उपलब्ध करून देणे आणि सहयोगाने नवीन उपाय विकसित करणे या उद्योगातील नेत्यांच्या संभाव्य भूमिकेवर प्रकाश टाकला. या प्रयत्नांना पुढे नेण्यासाठी नियमांचे सुलभीकरण आणि जलदगतीने मान्यता देण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेची त्यांनी पुष्टी केली.
कृत्रिम प्रज्ञा, क्वांटम कॉम्प्युटिंग, अडवान्स्ड अनॅलिटिक्स, अंतराळ तंत्रज्ञान, आरोग्य तंत्रज्ञान आणि कृत्रिम जीवशास्त्र यांना सातत्याने प्रोत्साहन देण्याची गरज अधोरेखित करताना, मोदी यांनी कृत्रिम प्रज्ञा विकास आणि नवीन तंत्रज्ञानासोबत जुळवून घेण्यामध्ये भारत आघाडीवर असल्याचे अधोरेखित केले. जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, उच्च दर्जाचे डेटासेट आणि संशोधन सुविधा निर्माण करण्यासाठी भारत-एआय मिशनची सुरुवात केल्याचा त्यांनी उल्लेख केला. आघाडीच्या संस्था, उद्योग आणि स्टार्टअप्सच्या मदतीने विकसित होत असलेल्या कृत्रिम प्रज्ञा उत्कृष्टता केंद्राच्या (एआय सेंटर्स ऑफ एक्सलन्सच्या) वाढत्या संख्येवर देखील त्यांनी भाष्य केले.

"मेक ए आय इन इंडिया" या दृष्टिकोनाविषयी आणि "मेक एआय वर्क फॉर इंडिया" या ध्येयाविषयी असलेल्या वचनबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला. आयआयटी आणि एम्स यांच्या सहकार्याने आयआयटीच्या उपलब्ध जागांची क्षमता /संख्या वाढवण्याचा आणि वैद्यकीय आणि तंत्रज्ञान शिक्षणाचे संयोजन करणारे मेडिटेक अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत अर्थसंकल्पीय निर्णयाचा उल्लेख त्यांनी केला. भविष्यातील तंत्रज्ञानात भारताला "जगातील सर्वोत्तम" देशांमध्ये स्थान देण्यावर लक्ष केंद्रित करून, हे उपक्रम वेळेवर पूर्ण करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले. आपल्या भाषणाचा समारोप करताना, पंतप्रधानांनी म्हटले की, शिक्षण मंत्रालय आणि वाधवानी प्रतिष्ठान यांच्यातील सहकार्याने सुरू असलेले ‘युग्म’ यासारखे उपक्रम भारताच्या नवोन्मेषी परिदृश्याला पुनरुज्जीवित करू शकतात. त्यांनी वाधवानी प्रतिष्ठानच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि या उद्दिष्टांना पुढे नेण्यात आजच्या कार्यक्रमाची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित केली.
यावेळी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, डॉ जितेंद्र सिंह, जयंत चौधरी, डॉ सुकांता मजुमदार आदी उपस्थित होते.
या बैठकीत उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी विकसित भारताचे लक्ष्य साध्य करण्यासाठी शिक्षण क्षेत्र, उद्योग क्षेत्र आणि नवोन्मेषक यांना एका मंचावर एकत्र आणण्याचे महत्त्व अधोरेखित केले. यातून भारताच्या नवोन्मेष क्षमतेमध्ये वाढ करण्यासाठी तसेच पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली गहन तंत्रज्ञान क्षेत्रात देशाची भूमिका बळकट करण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांना आणखी वेग मिळेल हे त्यांनी ठळकपणे नमूद केले.
राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या अखत्यारीतील राष्ट्रीय संशोधन संस्था संशोधनाचा मजबूत आधारस्तंभ म्हणून कार्य करत आहे याकडे देखील त्यांनी निर्देश केला.
याप्रसंगी बोलताना केंद्रीय मंत्री प्रधान असे देखील म्हणाले की देशाच्या गरजा तसेच प्राधान्यक्रम यांना केंद्रस्थानी ठेवून अभिनव संशोधनात योगदान देणे हे देशातील तरुणांचे उद्दिष्ट असले पाहिजे. संकल्पना ते उत्पादन अशी संपूर्ण साखळी भारतातच विकसित करणे हा आपला निर्धार आहे असे त्यांनी सांगितले. देशातील युवकांमध्ये ‘नवोन्मेषाच्या संस्कृती’ला चालना देण्यात युग्म परिषद महत्त्वाची भूमिका बजावेल अशी आशा देखील त्यांनी व्यक्त केली.
पार्श्वभूमी
वाययूजीएम – युग्म म्हणजे संस्कृतमध्ये "संगम". अशा प्रकारची ही पहिलीच धोरणात्मक परिषद आहे ज्यामध्ये सरकार, शैक्षणिक संस्था, उद्योग आणि नवोन्मेष परिसंस्थेतील आघाडीच्या व्यक्तींना बोलावण्यात आले. वाधवानी प्रतिष्ठान आणि सरकारी संस्थांच्या संयुक्त गुंतवणुकीसह सुमारे १,४०० कोटी रुपयांच्या सहयोगी प्रकल्पाद्वारे चालवल्या जाणाऱ्या भारताच्या नवोन्मेष संबंधी प्रवासात ही परिषद योगदान देईल.
पंतप्रधानांच्या स्वावलंबी आणि नवोन्मेषावर आधारित भारताच्या दृष्टिकोनानुसार, या परिषदेदरम्यान विविध महत्त्वाचे प्रकल्प सुरू केले जातील. त्यामध्ये आयआयटी कानपूर (एआय अँड इंटेलिजेंट सिस्टीम्स) आणि आयआयटी मुंबई (जैवविज्ञान, जैवतंत्रज्ञान, आरोग्य आणि औषधी) येथील सुपरहब्स; संशोधन व्यावसायीकरणाला चालना देण्यासाठी शीर्ष संशोधन संस्थांमध्ये वाधवानी इनोव्हेशन नेटवर्क (डब्ल्यूआयएन) केंद्रे; आणि शेवटच्या टप्प्यातील भाषांतर प्रकल्पांना संयुक्तपणे निधी देण्यासाठी आणि संशोधन आणि नवोपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशन (एएनआरएफ) सोबत भागीदारी यांचा समावेश आहे.
या परिषदेत सरकारी अधिकारी, उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्रातील दिग्गज व्यक्तींसोबत उच्चस्तरीय गोलमेज परिषदा आणि पॅनेल चर्चा; संशोधनाचे वेगवान परिणामात रूपांतर करण्यावर कृती-केंद्रित संवाद; भारतातील अत्याधुनिक नवोपक्रमांचा समावेश असलेले डीप टेक स्टार्टअप सादरीकरण; आणि सहयोग आणि भागीदारीला चालना देण्यासाठी विविध क्षेत्रांमध्ये विशेष नेटवर्किंग संधी यांचा समावेश असेल.
या परिषदेचे उद्दिष्ट भारतातील नवोन्मेष परिसंस्थेत/क्षेत्रात मोठ्या प्रमाणात खाजगी गुंतवणुकीला चालना देणे; आघाडीच्या तंत्रज्ञानात संशोधन ते व्यावसायिकीकरण मार्गक्रमणाला गती देणे; शैक्षणिक संस्था-उद्योग-सरकार यांची भागीदारी मजबूत करणे; एएनआरएफ आणि एआयसीटीई नवोन्मेष सारख्या राष्ट्रीय उपक्रमांना पुढे नेणे; संस्थांमध्ये नवोन्मेषविषयक प्रक्रियांचे लोकशाहीकरण करणे; आणि Viksit Bharat@2047 च्या दिशेने राष्ट्रीय नवोन्मेष संरेखन वाढवणे हे आहे.
* * *
N.Chitale/PM Release+S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2125289)
आगंतुक पटल : 35