वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
कोविड-19 साथीच्या काळात भारताने करुणाभावाने जगाचे नेतृत्व करत जागतिक स्तरावर 30 कोटी लस मात्रांचे केले वाटप : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी नवी दिल्ली येथे जागतिक आरोग्य शिखर परिषदेच्या प्रादेशिक बैठकीला केले संबोधित
भारताची लस राजनैतिकता आणि आयुष्मान भारत योजना जागतिक आरोग्य समतेसाठी वचनबद्धता दर्शवतात - गोयल
सार्वजनिक आरोग्य सुनिश्चित करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे, आयुष्मान भारत योजनेअंतर्गत 62 कोटींहून अधिक लोक आता मोफत आरोग्यसेवेसाठी पात्र - गोयल
Posted On:
27 APR 2025 9:37PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 एप्रिल 2025
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित जागतिक आरोग्य शिखर परिषदेची (डब्ल्यूएचएस) प्रादेशिक बैठक आशिया 2025 ला संबोधित केले. गोयल यांनी कोविड-19 साथीच्या काळात भारताने करुणा भावाने दिलेल्या सक्रिय जागतिक प्रतिसादावर प्रकाश टाकला. लस मैत्री उपक्रमाद्वारे, भारताने अविकसित आणि असुरक्षित देशांना जवळजवळ 30 कोटी लस मात्रा प्रदान केल्या होत्या, कोणताही देश मागे राहू नये या उद्देशाने त्यापैकी बऱ्याच मात्रा मोफत दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले. कोविड-19 साथीच्या काळात निर्यातीवर नियंत्रणे लादणाऱ्या इतर अनेक राष्ट्रांप्रमाणे वर्तन करणे टाळून भारताने सर्वांसाठी समान उपलब्धतेला प्राधान्य दिले. भारताने नेहमीच ‘वसुधैव कुटुंबकम’ - "जग एक कुटुंब आहे" या प्राचीन तत्वाचे पालन केले आहे, यावर गोयल यांनी भर दिला.
आशियातील पहिली जागतिक आरोग्य परिषदेची प्रादेशिक बैठक "आरोग्य समानतेची खात्री करण्यासाठी उपलब्धतेचे प्रमाण वाढवणे" यावर केंद्रित होती याबद्दल गोयल यांनी या परिषदेत बोलताना बोलताना कृतज्ञता व्यक्त केली. दर्जेदार आरोग्यसेवेची उपलब्धता हा शाश्वत विकासाचा एक महत्त्वाचा भाग आहे असे त्यांनी नमूद केले. सर्वांसाठी अधिक आरोग्यसेवेची उपलब्धता मिळवून देण्याच्या भारताच्या प्रवासाची त्यांनी माहिती दिली.
मंत्र्यांनी महामारीच्या काळात जागतिक नेत्यांशी झालेल्या आपल्या वैयक्तिक संवादाची आठवण करून दिली. जागतिक आरोग्य संकटातून नफा कमावण्याची प्रवृत्ती बळावलेली असताना भारताने योग्य किमतीत महत्त्वपूर्ण औषधांचा पुरवठा कसा सुनिश्चित केला याकडेही गोयल यांनी सर्वांचे लक्ष वेधले. आरोग्य समता या विषयावर भाष्य करताना गोयल यांनी औषध कंपन्यांनी किरकोळ सुधारणा करून औषधांच्या पेटंटचा कालावधी वाढवण्याच्या प्रयत्नांवर तीव्र टीका केली. त्यांनी म्हटले की, अशा कृतीमुळे कोट्यवधी लोकांना परवडणाऱ्या औषधांपासून वंचित राहावे लागेल. त्यांनी जागतिक आरोग्य शिखर परिषदेच्या (डब्ल्यूएचएस) प्रतिनिधींना भारताच्या दुर्गम भागांतील दर्जेदार आरोग्य सेवा अनुभवण्याचे आवाहन केले.
गोयल यांनी नमूद केले की, आयुष्मान भारत योजनेअंतर्गत आता 620 दशलक्षांहून अधिक लोकांना मोफत आरोग्यसेवा मिळण्याचा हक्क आहे. ही योजना जगातील सर्वात मोठी सरकारी प्रायोजित आरोग्य विमा योजना आहे. त्यांनी अधोरेखित केले की, भारताची ही वचनबद्धता नफा कमावण्याच्या हेतूने नव्हे, तर करुणेच्या भावनेतून प्रेरित आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या संदर्भातील भूमिकेचा संदर्भ देताना, गोयल म्हणाले, "आमच्यासाठी आरोग्यसेवा म्हणजे केवळ आजारी रुग्णाचे उपचार नव्हे. आरोग्यसेवा म्हणजे प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा, आरोग्यदायी जीवनशैली, मानसिक आरोग्य, आणि समाजाला एकत्र आणून उज्ज्वल भविष्य घडविणे."
मानवी कल्याणासाठी भारताच्या सर्वसमावेशक दृष्टिकोनावर प्रकाश टाकताना त्यांनी स्वच्छ भारत अभियानाचा उल्लेख केला. यामुळे विशेषतः महिलांसाठी स्वच्छता आणि सन्मान सुनिश्चित झाला आहे, असे त्यांनी सांगितले. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 40 दशलक्षांहून अधिक घरे आधीच बांधली गेली आहेत आणि आणखी लाखो घरे बांधण्याचे काम सुरू आहे; जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामीण घरांमध्ये नळाद्वारे पाणीपुरवठा 30 दशलक्षांवरून 160 दशलक्षांपर्यंत वाढविण्यात आला आहे; उज्ज्वला योजनेद्वारे महिलांना घरगुती गॅस जोडणी मोफत देण्यात आली आहे. यामुळे घरातील वायू प्रदूषणापासून त्यांचे संरक्षण झाले आहे. कोरोना विषाणू संसर्ग काळात तसेच त्यानंतरही 800 दशलक्ष नागरिकांना मोफत अन्नधान्य वितरित करण्यात आले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य, स्वच्छ पर्यावरण, गुणवत्तापूर्ण शिक्षण, डिजिटल कनेक्टिव्हिटी आणि आर्थिक सक्षमीकरण हे सर्व घटक मिळून खऱ्या अर्थाने आरोग्यदायी समाजाची पायाभरणी करतात हे गोयल यांनी अधोरेखित केले.
समारोपामध्ये त्यांनी जागतिक आरोग्य उद्दिष्टांबाबत भारताच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आणि जगातील प्रत्येक नागरिकासाठी अधिक आरोग्यदायी आणि समतावादी भविष्य घडविण्यासाठी सर्व राष्ट्रांनी एकत्र काम करण्याचे आवाहन केले.
* * *
S.Patil/Shraddha/Nitin/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2124755)
Visitor Counter : 52