अर्थ मंत्रालय
केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाने ट्रान्सशिपमेंट आणि हवाई मालवाहतुकीशी संबंधित व्यापार सुलभ करण्यासाठी विविध उपाय लागू केले
Posted On:
25 APR 2025 5:02PM by PIB Mumbai
केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्र्यांनी 2025-26 च्या अर्थसंकल्पीय भाषणात, उच्च मूल्याच्या नाशवंत बागायती उत्पादनांसह एअर कार्गो (हवाई मालवाहतुक) साठी पायाभूत सुविधा आणि गोदामांचे अद्ययावतीकरण करायला सहाय्य करणे आणि कार्गो स्क्रीनिंग (मालाची तपासणी) आणि कस्टम प्रोटोकॉल (सीमाशुल्क शिष्टाचार) मध्ये सुसूत्रता आणून वापरकर्त्यासाठी ते अनुकूल बनवण्याबाबत, केलेल्या घोषणेच्या अनुषंगाने, केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाने (सीबीआयसी) एअर कार्गोसाठी विशेष श्रेणीत आणि ट्रान्सशिपमेंट (मालवाहतुकीच्या एका पद्धतीतून दुसऱ्या पद्धतीत अथवा दुसर्या वाहनात) वाहतुकीसाठी सर्वसाधारण श्रेणीत अनेक व्यापार सुलभ उपाय योजना लागू केल्या आहेत.
जुन्या काळापासून प्रत्येक ट्रान्सशिपमेंट परवान्यासाठी ट्रान्सशिपमेंट परवाना शुल्क आकारले जात होते. कालांतराने ट्रान्सशिप कार्गोसह इतर व्यापाराचे प्रमाण वाढल्यामुळे या प्रक्रियेसाठी विलंब होऊ लागला. व्यवसाय सुलभतेचा उपाय म्हणून सीबीआयसीने या प्रकरणाची तपासणी केली, आणि 24 एप्रिल 2025 पासून, सीबीआयसीने यापुढील सर्व ट्रान्सशिपमेंट हालचालींसाठी ट्रान्सशिपमेंट परवाना शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भात दिनांक 24 एप्रिल 2025 च्या अधिसूचना क्रमांक 30/2025-सीयूएस (एनटी) द्वारे नियमांमधील बदल जारी करण्यात आले आहेत. (https://www.cbic.gov.in/f2d0927b-945d-411c-8c34-65d272a6d047)
सीमाशुल्क प्रोटोकॉल सुव्यवस्थित करण्याच्या आणि सीमा शुल्क क्षेत्राबाहेर युनिट लोड डिव्हाइसेस (यूएलडी) च्या वाहतुकीसाठी आंतरराष्ट्रीय सर्वोत्तम पद्धतींशी सुसंगत करण्याच्या दिशेने पहिले पाऊल म्हणून, सीबीआयसीने 2005 पासून बंदरांद्वारे हाताळल्या जाणाऱ्या सागरी कंटेनरसाठी आधीच निर्धारित केलेल्या प्रक्रियेच्या धर्तीवर यूएलडीच्या तात्पुरत्या आयातीसाठी सोपी आणि सुसंगत प्रक्रिया निश्चित केली आहे.
प्रक्रिया सुलभ झाल्यामुळे, यूएलडी / एअर कंटेनर ची विशिष्ट कालावधीत परत निर्यात करण्याची जबाबदारी घेणाऱ्या हवाई माल वाहतूक/एअर कंसोल एजंट द्वारे कंटिन्युटी बाँड ची पूर्तता झाल्यावर, ते सीमा शुल्क क्षेत्राबाहेर तात्पुरते आयात करता येतील.
एअर कार्गो कॉम्प्लेक्समध्ये 'ऑल इंडिया नॅशनल ट्रान्सशिपमेंट बॉण्ड'ची सुविधा 2022 साला पासून कार्यान्वित आहे. आयात मालाच्या ट्रान्सशिपमेंटसाठी विमान कंपन्यांद्वारे अनेक सीमा शुल्क स्थानकांवर सादर केल्या जाणाऱ्या बाँड (हमी पत्र) ची वारंवारिता टाळणे, हे या सुविधेचे उद्दिष्ट आहे. याव्यतिरिक्त, आयसीईगेट (ICEGATE) मध्ये ट्रान्सशिपमेंट अर्ज ऑनलाइन दाखल करण्याची सुविधा देखील उपलब्ध करण्यात आली आहे, ज्यामुळे एअर कार्गोच्या सेवा केंद्राला भेट देण्याची गरज राहणार नाही.
अधिक माहितीसाठी मंडळाचे परिपत्रक क्र. 15/2025-सीमाशुल्क दिनांक 25 एप्रिल 2025 चा संदर्भ पाहावा.
अनुपालन सुलभ करणे आणि एअर कार्गो कॉम्प्लेक्समधील व्यापार सुलभ करणे, हे वरील उपायांचे उद्दिष्ट आहे. एअरलाइन्स, कंसोल एजंट किंवा इतर भागधारकांनी वरील सुविधांचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
***
N.Chitale/R.Agashe/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2124421)
Visitor Counter : 15