आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
जागतिक लसीकरण सप्ताहानिमित्त केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांच्या हस्ते राष्ट्रीय गोवर-रुबेला निर्मूलन मोहिमेचा शुभारंभ
गोवर-रुबेला निर्मूलन अभियान 2025-26 बालकांना गोवर आणि रुबेला लसीचे दोन डोस देऊन 100% लसीकरण साध्य करत उच्च दर्जाची जीवनशैली प्रदान करण्याची संधी : केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांचे प्रतिपादन
Posted On:
24 APR 2025 4:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 एप्रिल 2025
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी जागतिक लसीकरण सप्ताहाच्या पहिल्या दिवशी (24-30 एप्रिल) राष्ट्रीय शून्य गोवर-रुबेला निर्मूलन अभियान 2025-26 चा दृकश्राव्य माध्यमातून शुभारंभ केला. 2026 साला पर्यंत गोवर आणि रुबेला या आजारांचे निर्मूलन करण्याच्या भारताच्या उद्दिष्टाच्या दिशेने हे एक महत्वाचे पाऊल आहे.

यावेळी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी समुदायांमध्ये जनजागृती करण्यासाठी बहुभाषिक एम-आर आयईसी साहित्य (पोस्टर्स, रेडिओ जिंगल्स, एमआर निर्मुलन आणि अधिकृत यू-विन शुभारंभ फिल्म) प्रकाशित केले. एमआर निर्मुलन कॅम्पेन 2025-26, अर्थात गोवर-रुबेला निर्मुलन अभियान 2025-26 दरम्यान प्रयोग आणि प्रसारासाठी हे आयईसी साहित्य सर्व राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांना देखील पुरवण्यात आले आहे.
यावेळी बोलताना जे. पी. नड्डा म्हणाले की, आजचा दिवस महत्वाचा आहे, कारण गोवर-रुबेला निर्मूलन अभियान 2025-26 च्या शुभारंभामुळे बालकांना गोवर आणि रुबेला लसीचे दोन डोस देऊन उच्च दर्जाची जीवनशैली प्रदान करण्याची आणि 100% लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य करण्याची संधी मिळाली आहे. या आजारांचा संसर्ग वेगाने होत असल्याने त्यामुळे केवळ मुलांचे नव्हे, तर त्यांच्या पालकांचे जीवनही विस्कळीत होते, ही गोष्ट लक्षात घेऊन लसीकरणापासून एकही मुल वंचित राहणार नाही, याची काळजी घेणे महत्वाचे असल्याचे नड्डा यांनी अधोरेखित केले.

आरोग्य मंत्रालयाने 2024 मध्ये गोवर आणि रुबेला पार्टनरशिपचा प्रतिष्ठेचा गोवर आणि रुबेला चॅम्पियन पुरस्कार मिळवल्याबद्दल केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी मंत्रालयाचे अभिनंदन केले.जानेवारी ते मार्च 2025 या कालावधीत देशातील 332 जिल्ह्यांमध्ये गोवर आजाराचे शून्य रुग्ण, तर 487 जिल्ह्यांमध्ये रुबेला चे शून्य रुग्ण आढळून आले असून, यामधून एम-आर निर्मूलनाच्या उद्दिष्ट पूर्तीमधली प्रगती दिसून येत असल्याचे त्यांनी नमूद केले.
नड्डा यांनी राज्याचे मंत्री आणि मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना सार्वजनिक आणि माध्यमांच्या बैठका घेण्याचे आवाहन केले. या माध्यमातून सक्रिय जनभागीदारीद्वारे नागरिकांना लसीकरण मोहिमेची माहिती देता येईल, असे ते म्हणाले. गोवर आणि रुबेला प्रतिबंधक लसीकरणाबाबत जनजागृती करण्यासाठी राज्यांनी सर्व आमदार, खासदार, स्थानिक आणि पंचायत प्रमुखांचा सक्रीय सहभाग मिळवावा, तसेच पहिल्या फळीतील आरोग्य सेवकांनी दुर्गम भागात, झोपडपट्ट्या, स्थलांतरित समुदायापर्यंत वारंवार पोहोचून जनजागृती करावी, असे आवाहन त्यांनी केले. ते म्हणाले की, 100% लसीकरणाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी आपल्याला शेवटच्या टोकापर्यंत पोहोचावे लागेल.

पार्श्वभूमी
गोवर आणि रुबेला हे अत्यंत संसर्गजन्य विषाणूजन्य रोग आहेत, ज्यामुळे गंभीर आजार, कायम स्वरूपी आरोग्यविषयक गुंतागुंत आणि मृत्यू देखील होऊ शकतो. या आजाराचा उच्च संसर्ग दर लक्षात घेता, भारताने 2026 सालापर्यंत या आजारांचे समूळ उच्चाटन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमांतर्गत (यूआयपी) गोवर-रुबेला (एमआर) लसीचे दोन डोस 9-12 महिने आणि 16-24 महिने वयोगटातील सर्व लाभार्थी बालकांना मोफत दिले जातात. सध्या भारतात एमआर लसीकरणाचे प्रमाण पहिल्या डोससाठी (2024-25 एचएमआयएस आकडेवारी ) 93.7% आणि दुसऱ्या डोससाठी 92.2% इतके आहे.
* * *
N.Chitale/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2124084)
Visitor Counter : 23