आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राष्ट्रीय सहयोगी आणि आरोग्य सेवा व्यवसाय आयोगाच्या (एनसीएएचपी) सहकार्याने दहा संलग्न आणि आरोग्य सेवा व्यवसायांसाठी नवीन क्षमता-आधारित अभ्यासक्रमांचा केला शुभारंभ


रोगांचा वाढता प्रादुर्भाव आणि संलग्न सेवांच्या वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी जागतिक स्तरावर सक्षम सहयोगी आणि आरोग्य सेवा व्यावसायिक तयार करण्याच्या दृष्टीने आखला नवीन अभ्यासक्रम

Posted On: 23 APR 2025 5:12PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 23 एप्रिल 2025


केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने नॅशनल कमिशन फॉर अलाइड अँड हेल्थकेअर प्रोफेशन्स (एनसीएएचपी), अर्थात राष्ट्रीय संलग्न आणि आरोग्य सेवा व्यवसाय आयोगाच्या सहकार्याने दहा संलग्न आणि आरोग्य सेवा व्यवसायांसाठी क्षमता-आधारित अभ्यासक्रम सुरू केला. केंद्रीय आरोग्य सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी आज नवी दिल्ली येथे या कार्यक्रमाचे उद्घाटन केले. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव हेकाली झिमोमी आणि एनसीएएचपी चे अध्यक्ष डॉ. यज्ञ शुक्ला यावेळी उपस्थित होते.

नवीन अभ्यासक्रमात, फिजिओथेरपी, उपयोजित मनोविज्ञान आणि वर्तणूक आरोग्य, ऑप्टोमेट्री, पोषण आणि आहारशास्त्र, डायलिसिस थेरपी तंत्रज्ञान आणि डायलिसिस थेरपी, रेडिओथेरपी टेक्नॉलॉजी, मेडिकल रेडिओलॉजी आणि इमेजिंग टेक्नॉलॉजी, अॅनेस्थेशिया आणि ऑपरेशन थिएटर टेक्नॉलॉजी, आरोग्य माहिती व्यवस्थापन, आणि फिजिशियन असोसिएट्स यासह व्यापक व्यावसायिक अभ्यासक्रमांचा समावेश असेल. देशभरातील संलग्न आणि आरोग्य सेवा व्यावसायिकांच्या शिक्षण आणि प्रशिक्षणात एकरूपता आणि उत्कृष्टता सुनिश्चित करून, देशाच्या नवीन गरजांना अनुसरून आरोग्य सेवा वितरण प्रणाली मजबूत करणे, हे या धोरणात्मक उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.

आपल्या उद्घाटनपर भाषणात, केंद्रीय आरोग्य सचिव म्हणाल्या की, आरोग्य सेवा क्षेत्रातील सर्व क्षेत्रांमध्ये क्षमता विकासाला चालना देण्यासाठी आणि आरोग्य सेवा क्षेत्रातील सर्व क्षेत्रांमध्ये शिक्षण आणि प्रशिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. अभ्यासक्रमाचे व्यापक पुनरावलोकन आणि मानकीकरण हे शैक्षणिक सामग्री आणि वितरणात सुसंगतता प्रस्थापित करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे त्या म्हणाल्या.

  

नवीन अभ्यासक्रमाचे महत्त्व अधोरेखित करताना श्रीवास्तव म्हणाल्या की, भारत आपल्या आरोग्य सेवा व्यावसायिकांना केवळ भारतासाठीच नव्हे, तर जगासाठी कुशल बनवत आहे. आज सुरू करण्यात आलेला अभ्यासक्रम विविध विद्याशाखांमधील आरोग्य सेवा व्यावसायिकांच्या गुणवत्तेसाठी मापदंड स्थापित करेल, असे त्यांनी सांगितले.

ज्या व्यवसायांसाठी नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात आला, त्यांचे महत्त्व अधोरेखित करताना श्रीवास्तव म्हणाल्या की, हे व्यवसाय प्रतिबंधात्मक, उत्तेजनात्मक, उपचारात्मक आणि पुनर्वसन आरोग्यसेवेत महत्वाची भूमिका बजावतात. या उपक्रमामुळे कौशल्य-आधारित प्रशिक्षणाची परिणामकारकता लक्षणीयरीत्या वाढेल, शिक्षण हे उद्योगांच्या गरजेला अनुरूप होईल आणि देशभरातील संलग्न आरोग्य व्यावसायिकांच्या करिअरमधली गतिशीलता आणि व्यावसायिक मान्यता वाढेल असे त्या म्हणाल्या.

या कार्यक्रमात विविध राज्य परिषदांचे मान्यवर सदस्य, संलग्न आणि आरोग्य सेवा क्षेत्रातील ज्येष्ठ विषयतज्ञ दृकश्राव्य माध्यमातून सहभागी झाले. त्यांच्या उपस्थितीने आणि योगदानाने चर्चेत मोलाची भर घातली. यामधून संलग्न आणि आरोग्य सेवा व्यवसायांमध्ये प्रमाणित, उच्च-गुणवत्तेचे शिक्षण आणि व्यावसायिक विकास पुढे नेण्यासाठी असलेली सामायिक वचनबद्धता प्रतिबिंबित झाली.

 

* * *

S.Patil/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2123855)
Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil