गृह मंत्रालय
यकृत आणि पित्तविषयक विज्ञान संस्थेने नवी दिल्लीत आयोजित केलेल्या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती
देशवासीय आरोग्यसंपन्न राहावेत यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 10 वर्षात समग्र दृष्टिकोन बाळगत अनेक कार्यक्रमांचा केला प्रारंभ
जागतिक यकृत दिनानिमित्त प्रत्येकाने जागरूकता, मेहनत आणि संपूर्ण माहितीच्या आधारे आपले यकृत निरोगी ठेवण्याचा संकल्प घ्यावा
Posted On:
19 APR 2025 4:39PM by PIB Mumbai
जागतिक यकृत दिनानिमित्त यकृत आणि पित्तविषयक विज्ञान संस्थेने आज नवी दिल्ली इथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह हे प्रमुख पाहुणे या नात्याने या कार्यक्रमाला उपस्थित होते.
यावेळी शाह यांनी उपस्थितांना संबोधित केले. आपले यकृत आपल्या शरीराच्या क्रिया प्रक्रिया तसेच आपले शरीर निरोगी ठेवण्यात खूप महत्त्वाची भूमिका बजावते असे शाह यांनी यावेळी सांगितले. आज जागतिक यकृत दिना'निमित्त प्रत्येकाने जागरूकता, मेहनत तसेच संपूर्ण माहितीच्या आधारे आपले यकृत निरोगी ठेवण्याचा संकल्प घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले.
यकृत आणि पित्तविषयक विज्ञान संस्थेच्या वतीने हील्ड (HEALED) ही योजना सुरू झाली असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी यावेळी दिली. यकृत निरोगी ठेवण्याविषयी देशात जागरूकता निर्माण करण्यात ही योजना उपयुक्त ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रत्येक व्यक्तीने नियमित आरोग्य तपासणीदरम्यान ई जीवनसत्वाची तपासणी देखील करून घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले. देशवासीय आरोग्यसंपन्न राहावेत यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, सरकारने गेल्या 10 वर्षात समग्र दृष्टिकोन बाळगत अनेक उपक्रमांचा प्रारंभ केल्याचे ते म्हणाले. आपण आजारीच पडू नये अशी व्यवस्था विकसित करण्यासाठी आयुष मंत्रालय काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. आज मोठ्या ॲलोपॅथिक रुग्णालयांमध्ये देखील आयुष विभाग सुरू केले जात असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने देशातील आरोग्यविषयक पायाभूत सुविधा उभारण्यासाठी 65 हजार कोटी रुपये खर्च केले आहेत, आणि या माध्यमातून प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच सामुदायिक आरोग्य केंद्रांना एक परिपूर्ण संस्थात्मक स्वरुप (युनिट) बनवण्याची व्यवस्था केली आहे असे त्यांनी सांगितले.
गेल्या 10 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील 1.3 अब्ज नागरिकांच्या आरोग्यासाठी एक व्यापक आराखडा तयार केला असल्याचे त्यांनी सांगितले. देशातल्या सर्व नागरिकांनी चांगला आहार घ्यावा, पुरेसे पाणी प्यावे, पुरेशी झोप घ्यावी आणि नियमित व्यायाम करावा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातले केंद्र सरकार तुमच्या बाकी आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी घेईल असे त्यांनी सांगितले. देशातल्या कॉर्पोरेट जगताने आपल्या सामाजिक दायित्वाअंतर्गतच्या उपक्रमांमध्ये निरोगी यकृत विषयक प्रचार प्रसारालाही महत्त्व द्यावे आणि निरोगी यकृतासाठी काम करत असलेल्या संस्थांना मदत करावी असे आवाहन अमित शाह यांनी केले. माध्यमांनीही मनोरंजनासोबतच आरोग्याविषयी देखील जनजागृती करावी असे आवाहनही त्यांनी केले. यकृताशी संबंधित आजारांनी ग्रस्त रुग्णांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि त्याबाबत जनजागृती करण्यासाठी यकृत आणि पित्तविषयक विज्ञान संस्थेने देशभरातील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अर्थात एम्ससह मोठ्या सरकारी रुग्णालयांसोबत काम करावे अशी सूचनाही अमित शाह यांनी यावेळी केली.
***
N.Chitale/T.Pawar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2122956)
Visitor Counter : 33