वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
कृषी आणि प्रक्रियाकृत खाद्यान्न उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाच्या वतीने (Agricultural and Processed Food Products Export Development Authority - APEDA) भारतीय डाळिंबांची व्यावसायिक सागरी खेप महाराष्ट्रातून अमेरिकेत यशस्वीरित्या पोहोचली
महाराष्ट्रातील अहिल्यानगर इथून 14 टन डाळींबाच्या फळांची अमेरिकेत न्यूयॉर्क इथे यशस्वी निर्यात
Posted On:
19 APR 2025 9:39AM by PIB Mumbai
भारतीय डाळिंबांना जगभरातील बाजारपेठेत पोहचवण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारच्या वतीने ऐतिहासिक उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमाअंतर्गतच भारतातील भगवा या उत्कृष्ट जातीच्या डाळिंबांची एक व्यावसायिक सागरी खेप यशस्वीरित्या न्यूयॉर्कमध्ये पोहोचली. ही घडामोड ताज्या फळांच्या निर्यातीच्या भारताच्या प्रयत्नांमधला एक महत्त्वाचा टप्पा ठरली आहे. आजच्या काळात उच्च प्रतीच्या ताज्या फळांची आंतरराष्ट्रीय मागणी प्रचंड वाढली आहे. अशावेळी न्यूयॉर्कमध्ये भारतीय डाळींब घेऊन पोहचलेल्या या जहाजाच्या माध्यमातून अमेरिकेच्या स्पर्धात्मक बाजारपेठेत पंसंतीचे उत्पादन बनण्याची भारतीय डाळिंबांची क्षमताही अधोरेखित झाली आहे.
डाळिंबाच्या निर्यात हंगामात, पारंपरिकरित्या प्रामुख्याने हवाई मार्गाने डाळिंबीची निर्यात वाहतूक केली जाते. मात्र आता यात हळूहळू बदल होत असून, अलीकडच्या काळात खर्चाच्या दृष्टीने किफायतशीर असलेल्या आणि शाश्वत स्वरुपाच्या सागरी वाहतूक पद्धतीचा अवलंब वाढू लागला आहे.
अमेरिकेने 2023 च्या हंगामात आपली बाजापेठ भारतीय डाळिंबांसाठी खुली केली होती. त्यानंतर, कृषी आणि प्रक्रियाकृत खाद्यान्न उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण (Agricultural and Processed Food Products Export Development Authority - APEDA) अर्थात अपेडाने अमेरिकेच्या कृषी विभागाअंतर्गत प्राणी आणि वनस्पती आरोग्य तपासणी सेवा विभाग (United States Department of Agriculture’s Animal and Plant Health Inspection Service - USDA APHIS), राष्ट्रीय वनस्पती संरक्षण संस्था (National Plant Protection Organization - NPPO - INDIA) आणि सोलापूर इथले राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र (National Research Centre for Pomegranate, Solapur - NRCP) यांच्या सहकार्याने अमेरिकेत हवाई मार्गाने डाळिंबांची निर्यात करण्याची चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली होती.
याशिवाय अपेडाने भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR)आणि राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राच्या सहकार्याने डाळिंबांच्या टिकावूपणासंबंधी आणखी एक यशस्वी चाचणी केली. यामुळे डाळिंबांचे आयुष्य अर्थात त्यांच्या आहे त्या स्थितीत टिकून राहण्याची क्षमता 60 दिवसांपर्यंत वाढवण्यातही यश मिळाले. याचमुळे भारताने फेब्रुवारी 2024 मध्ये तब्बल 4200 खोके म्हणजेच 12.6 टन डाळिंबांच्या निर्यातीची पहिली व्यावसायिक सागरी चाचणी खेप अमेरिकेला यशस्वीरित्या रवाना केली होती. ही सागरी चाचणी खेप नवी मुंबईतील वाशी इथल्या इरेडिएशन फॅसिलिटी सेंटरमधील (Irradiation Facility Center - IFC) इनी फार्म्स (InI Farms) आणि महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या (Maharashtra State Agricultural Marketing Board - MSAMB) सहकार्याने पूर्ण केली गेली होती. डाळिंबांच्या अमेरिकेतील निर्यातीसाठी, अमेरिकेच्या कृषी विभागाने (USDA) प्रत्यक्ष निर्यापूर्व प्रक्रिया म्हणून आखून दिलेल्या नियमांची पूर्तता करण्यासंबंधीचा मार्गदर्शनपर उपक्रम अपेडाने डिसेंबर 2024 मध्ये सुरु केला होता. भारतीय कृषी निर्यातदारांना व्यावसायिक मालवाहतूक (लॉजिस्टिक) विषयक तसेच नियामक विषयक समस्यांची सोडवणूक करण्यात हा उपक्रम उपयुक्त ठरला. त्यामुळे अमेरिकेच्या बाजारपेठेत आपली उत्पादने पाठवण्याच्यादृष्टीने भारतीय निर्यातदारही सक्षम होऊ शकले. अपेडाने प्रत्यक्ष निर्यातीच्या तीन महिने अगोदर अमेरिकेच्या कृषी विभागाच्या निरीक्षकांना निर्यातपूर्व तपासणीसाठी आमंत्रित करण्याचे धोरण अवलंबले, यामुळे ही व्यावयायिक खेप अमेरिकेत वेळेवर आणि सुरळीतपणे पोहोचण्यात मोठी मदत झाली.
भारतीय डाळिंबांची 4,620 खोक्यांची आणि अंदाजे 14 टन वजनाची पहिली सागरी खेप, आपल्या प्रस्थानानंतर पाच आठवड्यांच्या आत, म्हणजेच मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवर पोहोचली. न्यूयॉर्कमध्ये या निर्यातीबद्दल असाधारण उत्साह दिसून आला. प्रत्यक्ष निर्यातीच्या ठिकाणी पोहोचलेल्या डाळिंबांची गुणवत्ता उत्कृष्ट असल्याचेही प्रमाणित केले गेले. याशिवाय पाहूनच डोळ्यांना सुखाची अनुभूती देणाऱ्या आणि चवीला उत्कृष्ट असलेल्या या भगवा जातीच्या भारतीय डाळिंबाच्या फळामुळे अमेरिकेतला ग्राहकवर्गही प्रचंड प्रभावित झाला.
जागतिक बाजारपेठेत भारतीय ताज्या फळांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार कायमच आघाडीवर राहून पुढाकार घेत आले असल्याचे अपेडाचे अध्यक्ष अभिषेक देव यांनी म्हटले आहे. अमेरिकेच्या निर्यातपूर्व नियमांच्या पूर्तता प्रक्रियेसाठी आर्थिक सहाय्य देत अपेडाच्या वतीने आंबा आणि डाळिंबांसारख्या भारतीय फळांच्या अमेरिकेतील निर्यातीला पाठबळ दिले जात असल्याचेही त्यांनी सांगितले. जेव्हा भारतीय शेतकऱ्यांची फळे अमेरिकेसारख्या सर्वात महत्वाच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत निर्यात होतील तेव्हाच त्यांना चांगला भावही मिळू शकेल असे ते म्हणाले. भारतीय आंब्याची वार्षिक निर्यात सुमारे 3500 टनांपर्यंत पोहोचली असून, आगामी काळात डाळिंबाची निर्यातही अशाच प्रकारची मजबूत आकडेवारी गाठेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
अमेरिकेत निर्यात केलेली डाळिंबाची खेप, फळे आणि भाज्यांचे प्रमुख निर्यातदार असलेल्या तसेच अपेडामध्ये नोंदणीकृत असलेल्या मुंबईतील के बी एक्सपोर्ट्स (Kay Bee Exports) द्वारे पाठवली गेली होती. या खेपेतील डाळिंब ही थेट के बी एक्सपोर्ट्सच्या शेतांमधील होती. यातून या निर्यातीचा लाभ भारताच्या तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल याचीही सुनिश्चिती झाली.
आम्ही भारतीय डाळिंबांच्या अमेरिकेला झालेल्या यशस्वी निर्यातीसाठी अपेडा (एपीइडीए) चे मन:पूर्वक आभार मानतो. भारतीय डाळिंबांसाठी बाजारपेठ उघडण्यापासून ते निर्यात धोरण तयार करणे, विविध भागधारकांशी समन्वय साधणे आणि यूएसडीए सोबत प्री-क्लिअरन्स कार्यक्रमाचे आयोजन करणे यामध्ये एपीडाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. के बि एक्स्पोर्ट्स ही डाळिंबाच्या निर्यातीतील एक विशेषीकृत संस्था आहे आणि आम्ही भारतातील सर्वोत्तम डाळिंबे ग्राहकांना देण्याचा प्रयत्न करत आहोत. “आमचे ग्राहक दर्जेदार फळांची अपेक्षा ठेवतात आणि ती अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील असतो,” असे के बि एक्स्पोर्ट्सचे सीईओ कौशल खाखर यांनी या यशस्वी मालवाहतुकीनंतर सांगितले.
“भारतीय डाळिंबांना नेहमीच त्यांच्या चवीसाठी ओळखले गेले आहे, पण या मालवाहतुकीने हे सिद्ध केले आहे की योग्य दर्जा आणि सातत्य असेल तर भारतीय ताजी फळे अमेरिकन ग्राहकांच्या सूक्ष्म चवीनुसार नक्कीच फिट बसू शकतात,” असे भारतीय निर्यात संघटनेच्या प्रतिनिधीने सांगितले. “आम्हाला बाजारपेठेतील उत्तम प्रतिसादाबद्दल आनंद होत असून, ही यशस्वी पोच भारतातून डाळिंब निर्यातीच्या प्रमाणात वाढ घडवून आणेल याचा आम्हाला विश्वास आहे.”
भविष्याचा विचार केला असता उद्योग क्षेत्राला विश्वास आहे की सातत्यपूर्ण विपणन प्रयत्न आणि रणनीतिक प्रचार मोहिमा यांच्या साहाय्याने भारतीय डाळिंबे अमेरिकेच्या प्रीमियम बाजारपेठेत स्वतःसाठी एक विशेष स्थान निर्माण करू शकतात. वाढत्या यशाच्या पार्श्वभूमीवर, उद्योगातील भागधारकांनी एपीडाकडे येत्या वर्षात भारतीय डाळिंबाच्या प्रचारासाठी मोहिमा राबवण्याचे समर्थन करण्याची विनंती केली, ज्याचा उद्देश अमेरिकन ग्राहकांना या फळाच्या उत्कृष्ट खाण्याच्या गुणवत्तेबद्दल आणि त्याच्या विविध पाककला उपयोगांबद्दल जागरूक करणे हा आहे.
भारत हा बागायती पिकांचा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा उत्पादक देश आहे आणि महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, राजस्थान व आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये डाळिंबाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. एपीडाने डाळिंबाच्या निर्यातीला चालना देण्यासाठी आणि पुरवठा साखळीतील अडथळे दूर करण्यासाठी विशेष डाळिंब निर्यात प्रचार मंच ( इपीएफ) स्थापन केले आहेत. या मंचामध्ये वाणिज्य विभाग, कृषी विभाग, राज्य सरकारे, राष्ट्रीय संदर्भ प्रयोगशाळा आणि दहा आघाडीचे निर्यातदार यांचे प्रतिनिधी सहभागी आहेत, जे डाळिंबाच्या निर्यातीसाठी एकत्रितपणे काम करतात.
आर्थिक वर्ष 2023 -24 मध्ये भारताने 72011 मेट्रिक टन डाळिंबांची निर्यात केली, 69.08 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स इतकी होती. चालू वर्षात एप्रिल ते जानेवारी 2024-25 या कालावधीत डाळिंब निर्यातीमध्ये 21% वाढ झाली असून 59.76 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स मूल्याची नोंद झाली आहे. मुख्य निर्यात लक्ष्य राष्ट्रांमध्ये युनायटेड अरब एमिरेट्स , बांगलादेश, नेपाळ, नेदरलँड्स, सौदी अरेबिया, श्रीलंका, थायलंड, बहारीन, ओमान आणि अमेरिका यांचा समावेश होतो.
भारतीय डाळिंबे, विशेषतः भगवा जातीची, त्यांच्या समृद्ध चव, गडद लाल रंग आणि उच्च पोषणमूल्यामुळे प्रसिद्ध आहेत. ही डाळिंबे अँटीऑक्सिडंट्स आणि अत्यावश्यक पोषक घटकांनी भरलेली असतात, ज्यामुळे ती जगभरातील आरोग्याची काळजी घेणाऱ्या ग्राहकांमध्ये लोकप्रिय ठरली आहेत.
ताजी फळे आणि भाजीपाला यांच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्याच्या भारत सरकारच्या वचनबद्धतेचा पुरावा म्हणजे त्यांनी विकसित केलेले समुद्र मार्गदर्शक प्रोटोकॉल, जे दूरच्या बाजारपेठेत निर्यात करताना उत्पादनाच्या गुणधर्मांचे रक्षण करतात. हा उपक्रम भारताची जागतिक बाजारपेठेतील स्थिती अधिक मजबूत करत असतानाच, भारतीय शेतकऱ्यांना दीर्घकालीन निर्यातीसाठी संधी उपलब्ध करून देतो.
उत्तम प्रतीच्या फळांचा सातत्यपूर्ण पुरवठा आणि चालू असलेल्या विपणन उपक्रमांमुळे, भारतीय डाळिंबे हे अमेरिकन ग्राहकांसाठी एक पसंतीचा पर्याय ठरतील आणि आगामी काळातही अमेरिकेतील किरकोळ दुकानांमध्ये त्यांचे स्थान कायम राहील.
***
S.Tupe/T.Pawar/G.Deoda/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2122948)
Visitor Counter : 88