अंतराळ विभाग
भारतीय अंतराळवीराचा समावेश असलेली आंतरराष्ट्रीय अंतराळ मोहीम पुढील महिन्यात नियोजित: डॉ. जितेंद्र सिंह
अंतराळ क्षेत्रातील वाटचालीत नवा अध्याय लिहिण्यासाठी भारत सज्ज
Posted On:
18 APR 2025 5:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 एप्रिल 2025
अंतराळ क्षेत्रातील वाटचालीत एक नवा अध्याय लिहिण्यासाठी भारत सज्ज झाला असून, पुढील महिन्यात भारतीय अंतराळवीराचा समावेश असलेली आंतरराष्ट्रीय अंतराळ मोहीम आयोजित होणार आहे. येत्या काही महिन्यांमध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या भावी योजनांचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या उच्च स्तरीय बैठकीनंतर केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री(स्वतंत्र प्रभार), भूविज्ञान आणि पंतप्रधान कार्यालय, अणुऊर्जा विभाग, अंतराळ विभाग, कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण आणि निवृत्तीवेतन यांचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी ही घोषणा केली. या अंतराळ मोहिमेच्या माध्यमातून पहिल्यांदाच एखादा भारतीय आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला भेट देईल आणि राकेश शर्मा यांच्या 1984 मधील सोवियत सोयुझ अंतराळयानातून झालेल्या ऐतिहासिक अंतराळ मोहिमेनंतर तब्बल चार दशकांपेक्षा जास्त काळाने पहिल्यांदाच भारतीय अंतराळवीर अंतराळात प्रवास करेल, असे डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले.

आगामी काही महिन्यांमध्ये महत्त्वाकांक्षी मोहिमांच्या एका संचासाठी सज्ज होत असलेल्या भारतीय अंतराळ क्षेत्रातील अनेक कार्यक्रमांच्या भरगच्च वेळापत्रकादरम्यान ही घोषणा करण्यात आली आहे. अंतराळ विभागाचे सचिव आणि इस्रोचे अध्यक्ष डॉ. व्ही. नारायणन् यांनी आगामी अंतराळ मोहिमांच्या स्थितीबाबत सविस्तर माहिती देणारे सादरीकरण केले. भारतीय हवाई दलातील ग्रुप कॅप्टन शुभांषू शुक्ला ऍक्झियॉम स्पेसच्या एएक्स-4 मोहिमेचा एक भाग म्हणून पुढील महिन्यात आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाण्यासाठी होणाऱ्या अंतराळ मोहिमेत सहभागी होण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहेत, अशी माहिती इस्रोच्या अध्यक्षांनी दिली.
ग्रुप कॅप्टन शुक्ला यांची मोहीम मे 2025 मध्ये पार पडणार असून भारताच्या वाढत्या आंतरराष्ट्रीय अंतराळ सहकार्यातील तो एक महत्त्वाचा टप्पा आहे . भारतीय वायुसेनेतील पदकविजेते टेस्ट पायलट असलेले ग्रुप कॅप्टन शुक्ला यांची इसरोच्या मानवी अंतराळउड्डाण (HSP)कार्यक्रमात निवड झाली होती व भारताचे पहिले स्वदेशी मानवसहित ऑर्बिटल उड्डाण असणाऱ्या गगनयान मोहिमेसाठी विशेष पसंती मिळालेल्यांमध्ये त्यांची गणना होते. या Ax-4 मोहिमेतील त्यांच्या सहभागामुळे त्यांना महत्वपूर्ण असा अंतराळ उड्डाण प्रणाली, लॉंच प्रोटोकॉल, सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाशी जुळवून घेणे तसेच आणीबाणीच्या परिस्थितीतील मानसिक तयारी, या सर्व गोष्टींचा अनुभव मिळेल, जो भारताच्या महत्वाकांक्षी अंतराळ मोहिमांसाठी उपयुक्त ठरेल.

“भारत पुढच्या अंतराळ मोहिमांचा महत्वाचा टप्पा गाठण्यास सज्ज आहे.” हे डॉ जितेंद्र सिंह यांचे विधान आगामी मानवसहित अंतराळ उड्डाण व इसरो च्या महत्वाच्या मोहिमांचे वैशिष्ट्य अधोरेखित करते. आंतरराष्ट्रीय भागीदारांशी सहकार्य व गगनयान सारख्या महत्वाच्या प्रकल्पांना मिळणारी गती यामुळे अंतराळ तंत्रज्ञानात जागतिक पातळीवर नेतृत्व करण्यातील भारताची वचनबद्धता दिसून येते. हे प्रयत्न केवळ विज्ञान क्षेत्रापुरते मर्यादित नसून विकसित व आत्मनिर्भर भारताच्या उद्दिष्टाशी निगडित आहेत असे सिंह यांनी स्पष्ट केले.
या बैठकीदरम्यान डॉ जितेंद्र सिंह यांना इसरो तील जानेवारी 2025 पासून घडत असलेल्या अनेक महत्वाच्या घटनांची माहिती देण्यात आली. आदित्य L1 सौर मोहीमेत मिळालेली माहिती प्रसिद्ध करणे, डॉकिंग व अन डॉकिंग तंत्रज्ञानाचे यशस्वी प्रात्यक्षिक, भारतात विकसित केलेल्या उच्च क्षमतेच्या लिक्विड इंजिन ची चाचणी व श्रीहरीकोटा इथून झालेल्या ऐतिहासिक 100व्या प्रक्षेपणाची (GSLV -F-15 ) माहिती यांचा त्यात समावेश होता. राष्ट्रीय स्तरावरील महत्वाचा समारंभ असलेल्या कुंभमेळा 2025 मध्ये उपग्रहावर आधारित देखरेख करण्यात इसरोची महत्वाची भूमिका व भावी काळातील लॉन्च वेहिकल रिकव्हरी मोहिमांसाठी महत्वपूर्ण असलेले विकास इंजिन पुन्हा सुरु करण्याचे यशस्वी प्रात्यक्षिक याबद्दलही माहिती देण्यात आली.
* * *
S.Kane/Shailesh/Uma/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2122708)
Visitor Counter : 43