ब्राझीलमधील ब्राझिलिया येथे 17 एप्रिल 2025 रोजी होणाऱ्या 15 व्या ब्रिक्स कृषी मंत्र्यांच्या बैठकीत, केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण तसेच ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत भारतीय प्रतिनिधीमंडळाचे नेतृत्व ते करतील. 15 व्या ब्रिक्स कृषी मंत्रीस्तरीय बैठकीची संकल्पना, 'ब्रिक्स देशांमध्ये सहकार्य, नवोन्मेष आणि समन्यायी व्यापाराद्वारे समावेशक आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन देणे' ,अशी आहे. ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका, सौदी अरेबिया, इजिप्त, संयुक्त अरब अमिराती, इथिओपिया, इंडोनेशिया आणि इराण या ब्रिक्स सदस्य देशांचे कृषी मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी या बैठकीत उपस्थित राहणार आहेत.
या दौऱ्यात केंद्रीय मंत्री चौहान, ब्राझीलचे कृषी आणि पशुधन मंत्री कार्लोस हेन्रिक बाक्वेटा फावारो तसेच कृषी विकास आणि कुटुंब शेती मंत्री लुईझ पाउलो टेक्सेरा यांच्यासोबत द्विपक्षीय बैठका घेणार आहेत. या बैठकांमध्ये भारत आणि ब्राझीलमधील कृषी, कृषी-तंत्रज्ञान, ग्रामीण विकास आणि अन्न सुरक्षा अशा विविध क्षेत्रात सहयोग वृद्धिंगत करण्यावर भर दिला जाईल.
कृषी मूल्य साखळीत भागीदारी आणि गुंतवणुकीच्या संधींचा वेध घेण्यासाठी शिवराज सिंह चौहान, साओ पाउलो येथील ब्राझीलच्या महत्त्वाच्या कृषी व्यवसाय कंपन्यांच्या प्रमुखांशी आणि ब्राझिलियन असोसिएशन ऑफ व्हेजिटेबल ऑइल इंडस्ट्रीजच्या प्रतिनिधींशी संवाद साधतील. या दौऱ्यात चौहान, पर्यावरणीय जाणीव वाढवणे आणि मातृत्वाचा सन्मान करण्याच्या, 'एक पेड माँ के नाम' या उदात्त उपक्रमांतर्गत ब्राझिलिया येथील भारतीय दूतावासात वृक्षारोपण मोहिमेतही सहभागी होतील. याशिवाय, ते साओ पाउलोमधील उत्साही भारतीय समुदायाशी संवाद साधतील.
केंद्रीय मंत्री चौहान यांचा हा ब्राझील दौरा, ब्रिक्स राष्ट्रांसोबत सहकार्य वाढवण्याच्या आणि कृषी नवोन्मेष, लवचिकता आणि शाश्वततेमध्ये सदस्य देशांमधील सहकार्य वाढवण्याच्या भारताच्या वचनबद्धतेला पुन्हा एकदा पुष्टी देईल.
***
SonalT/SonaliK/DY