गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज मुंबईत 'चित्रलेखा' या गुजराती साप्ताहिकाच्या 75 व्या वर्धापनदिन सोहळ्याला केले संबोधित
Posted On:
12 APR 2025 9:31PM by PIB Mumbai
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथे 'चित्रलेखा' या गुजराती साप्ताहिकाच्या 75 व्या वर्धापनदिन सोहळ्याला संबोधित केले. या प्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाला संबोधित करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की 'चित्रलेखा'चा 75 वर्षांचा हा प्रवास गुजराती साहित्य, समाज, जीवनशैली आणि गुजरातला तसेच देशाला भेडसावणाऱ्या समस्यांचे प्रतिबिंब आहे. ते म्हणाले की माझ्या आयुष्यात आतापर्यंत मी तीन घरे बदलली आहेत, त्या घरांमधील फर्निचर बदलले, अगदी पत्तेही बदलले, परंतु 'चित्रलेखा' तिन्ही घरांमध्ये अगदी निष्ठेने येतच राहिले.
अमित शहा म्हणाले की 'चित्रलेखा'ने वाचकांशी ज्या पद्धतीने आपले संबंध टिकवून ठेवले आहेत ते अभावानेच आढळते. हे तेव्हाच शक्य होते जेव्हा नफ्याचा विचार नसतो आणि उद्देश पवित्र असतो, साहित्याप्रती समर्पण आणि समाजाच्या समस्यांचे निराकरण करण्याची इच्छा असते. ते म्हणाले की जेव्हापासून मी वाचायला शिकलो तेव्हापासून मी 'चित्रलेखा' वाचत आहे. कधी हरकिशन मेहतांची कादंबरी तर कधी तारक मेहतांचा उल्टा चष्मा वाचताना तर कधी पहिल्या पानावर प्रकाशित झालेले कार्टून वाचताना समाजाचे प्रश्न वाचण्याचा आणि त्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करावा असे केव्हा वाटू लागले ते मला कळलेच नाही, असे ते म्हणाले.
केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की एक जागृत साप्ताहिक अनेक प्रकारे आपल्या समाजावर आणि जीवनावर प्रभाव पाडते. इंग्रजी भाषिक युगात गुजराती साहित्य जिवंत ठेवणे कठीण होते, तेव्हा वजुभाईंनी 'चित्रलेखा'ची स्थापना केली. आज समाजाच्या सर्व समस्या निर्भयपणे मांडण्याची आणि समस्येवर केवळ प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचीच नव्हे तर त्यावर उपाय शोधण्यासाठी सूचना देण्याची गरज आहे. ते म्हणाले की गुजरातमध्ये अनामत चळवळीच्या वेळी समाज विखुरला जात होता , परंतु त्यावेळी 'चित्रलेखा'ने समाजाला एकत्रित बांधून ठेवण्यासाठी मशाल हातात घेतली होती. 75 वर्षांच्या तथ्य-आधारित प्रयत्नांमुळेच 'चित्रलेखा'ची विश्वासार्हता टिकून राहिली आहे.
समाजाच्या पाठबळाशिवाय साहित्य क्षेत्राची प्रगती होऊ शकत नाही, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नमूद केले. साहित्य ही समाजाची गरज आहे. गुजराती साहित्य प्रसवणाऱ्या नियतकालिकांनी देशाच्या विकासात खूप महत्त्वाची भूमिका बजावली आहे, असे ते म्हणाले. गुजराती साहित्य परिषदेने 1855 मध्ये बुद्धिप्रकाश नावाचे मासिक सुरू केले. त्यावेळी, बुद्धिप्रकाशपासून प्रेरणा घेत प्रत्येकाने अनिष्ट रूढींविरोधात आघाडी उघडल्याचे त्यांनी सांगितले. 1876 मध्ये न्हानालाल यांनी सत्य विहार सुरू केले आणि समाजात कमालीची जागरूकता निर्माण केली. महात्मा गांधी यांनी 1919 मध्ये नवजीवन सुरू केले आणि लोकांपर्यंत कठोर सत्य पोहोचवण्याचे काम केले, या घडामोडींचा उल्लेख शहा यांनी केला. 1950 मध्ये, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, चित्रलेखा सुरू झाले आणि तेव्हापासून, या नियतकालिकाने लोकांपर्यंत अत्यंत नेमकेपणाने आणि स्पष्टपणे सामाजिक समस्या आणि साहित्यिक मूल्ये पोहचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे, असे ते म्हणाले.
चित्रलेखामध्ये प्रकाशित झालेल्या कथांच्या माध्यमातून समाजाला एकसंध ठेवण्याचा यशस्वी प्रयत्न केला गेला. चित्रलेखामुळेच गुजराती भाषा अभ्यासत असलेल्या युवा वर्गाला अभ्यास करण्याची प्रेरणा मिळाली, असे ते म्हणाले. उपस्थितांपैकी फार कमी लोकांनी तारक मेहता यांची प्रत्यक्ष भेट घेतली असेल, मात्र जगातला सर्वात दुःखी माणूसही त्यांना भेटल्यावर हसल्याशिवाय राहू शकत नाही. सहज आणि तत्काळ सुचवणारा विनोद ही त्यांना देवाने दिलेली देणगी होती. त्यांनी अनेक वर्षे त्याच चाळीतून तारक मेहता का उल्टा चष्मा चालवला, अशी माहितीही त्यांनी दिली. ही मालिका पाहणाऱ्यांना ती खूप छान असल्याचे वाटू शकेल, पण ज्यांनी तारक मेहता वाचले आहेत त्यांच्या मात्र लक्षात येईल की या लोकांनी तारक मेहता मालिकेचे काय करून ठेवले आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. ते अवघ्या चार पानांतच संपूर्ण गुजरातला आपले सगळे दुःख विसरायला लावत असत, ही बाब त्यांनी अधोरेखित केली.
चित्रलेखाने कधीही विसरता येणार नाहीत असे विशेषांक प्रकाशित केले असल्याचा उल्लेखही त्यांनी केला. त्यांच्या नर्मदा योजना विशेषांकाने संपूर्ण गुजरातला हादरवून सोडले होते. मुंबईतील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याचे चित्रलेखाने केले, तसे अचूक आणि सत्य वार्तांकन कोणीही केले नसेल असे मत त्यांनी व्यक्त केले. त्यांनी केलेल्या प्रभावी मांडणीमुळे दहशतवादाच्या समस्येबद्दल मोठ्या प्रमाणात जागरूकता निर्माण झाली असे ते म्हणाले.
चित्रलेखाने राम मंदिराच्या मुद्द्यावरही तीन विशेषांकही प्रकाशित केल्याचे स्मरण त्यांनी करून दिले. आपण स्वतः बालपणापासून राम मंदिराचे समर्थक राहिलो आहेत, त्यासाठी लढलो आहोत आणि तुरुंगातही गेलो आहोत, मात्र चित्रलेखाने त्याची जितकी सुंदर मांडणी केली तशी कोणीही करू शकले नाही असे ते म्हणाले. नागीन दास, तारक मेहता आणि गुणवंत शहा हे सगळे चित्रलेखाच्या व्यासपीठावरूनच लोकप्रिय झाले आणि या तिघांनाही भारताच्या राष्ट्रपतींनी पद्म पुरस्काराने सन्मानित केले असल्याचे त्यांनी नमूद केले. देशातील कोणत्याही नियतकालिकाने पद्म पुरस्काराने सन्मानित झालेले तीन लेखक क्वचितच घडवले असतील असे ते म्हणाले.
***
M.Pange/S.Kane/T.Pawar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2121337)