नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या नविनीकरणीय ऊर्जा क्षमतेत आर्थिक वर्ष 2024–25 मध्ये ऐतिहासिक वाढ

Posted On: 10 APR 2025 9:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 10 एप्रिल 2025 

 

नवीन आणि नविनीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने आर्थिक वर्ष 2024–25 मध्ये भारताच्या स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती झाल्याचा अहवाल दिला आहे. या वर्षात विक्रमी 29.52 गिगावॅट क्षमतेची वाढ झाली असून, देशाची नविनीकरणीय ऊर्जा निर्मितीची एकूण क्षमता 31 मार्च 2025 पर्यंत 220.10 गिगावॅटवर पोहोचली आहे. गेल्या आर्थिक वर्षात ही क्षमता 198.75 गिगावॅट इतकी होती. वर्ष 2030 पर्यंत 500 गिगावॅट नविनीकरणीय इंधन निर्मिती क्षमतेचे लक्ष्य साध्य करण्याचे भारताचे उद्दीष्ट आहे. हे उद्दिष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या ‘पंचामृत’ संकल्पांपैकी एक आहे. यंदाची कामगिरी ही हे लक्ष्य गाठण्याच्या दिशेने सुरु असलेल्या सातत्यपूर्ण वाटचालीचे प्रतीक आहे. 

सौर ऊर्जा हा वाढीचा मुख्य आधार

आर्थिक वर्ष 2024–25 मध्ये सौर ऊर्जेने क्षमता वाढीमध्ये सर्वाधिक योगदान दिले. यंदा 23.83 गिगावॅट सौर ऊर्जा निर्मिती क्षमतेची भर पडली. ही गेल्या वर्षीच्या 15.03 गिगावॅटच्या तुलनेत लक्षणीय वाढ आहे. सौर ऊर्जा निर्मितीची एकूण क्षमता आता 105.65 गिगावॅट वर पोहोचली आहे.
यामध्ये जमिनीवरील प्रकल्प 81.01 गिगावॅट, छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प 17.02 गिगावॅट, हायब्रिड प्रकल्पातील सौर घटक 2.87 गिगावॅट आणि ऑफ-ग्रिड प्रणाली 4.74 गिगावॅटचा समावेश आहे.

ही वाढ वापराचे प्रमाण आणि वितरण प्रणाली या दोन्ही स्तरांवर सौर ऊर्जेच्या वापराला पसंती मिळत असल्याचे दर्शविते.

पवन ऊर्जा क्षमतेत स्थिर वाढ

वर्षभरात पवन ऊर्जेच्या क्षेत्रातही सातत्यपूर्ण प्रगती झाली. आर्थिक वर्ष 2024–25 मध्ये पवन ऊर्जा निर्मितीच्या क्षमतेत 4.15 गिगावॅटची भर पडली. ही गेल्या वर्षीच्या तुलनेत 3.25 गिगावॅटहून अधिक आहे. एकूण पवन ऊर्जा निर्मिती क्षमता आता 50.04 गिगावॅट झाली आहे. ही भारताच्या नविनीकरणीय ऊर्जा वापरातील पवन ऊर्जेचे महत्त्व अधोरेखित करते.

जैवइंधनाधारित ऊर्जा व लघु जलविद्युत निर्मिती क्षमतेची गती कायम

जैवइंधनाधारित ऊर्जा प्रकल्पांची एकूण क्षमता 11.58 गिगावॅट झाली आहे. यामध्ये 0.53 गिगावॅट ऑफ-ग्रिड आणि कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती प्रकल्पांचा समावेश आहे. लघु जलविद्युत प्रकल्पांची क्षमता 5.10 गिगावॅट वर पोहोचली असून 0.44 गिगावॅट क्षमतेचे प्रकल्प अंमलबजावणीच्या टप्प्यात आहेत. हे क्षेत्र सौर आणि पवन ऊर्जा प्रकल्पांना पूरक आहे. यामुळे  भारतातील ऊर्जा व्यवस्थेच्या विकेंद्रीकरणास मदत होत आहे. 

स्वच्छ ऊर्जेच्या प्रकल्पांचे वाढते प्रमाण

उपलब्ध क्षमतांखेरीज भारताकडे 169.40 गिगावॅट क्षमतेचे स्वच्छ ऊर्जा निर्मिती प्रकल्प अंमलबजावणीच्या टप्प्यात आहेत. 65.06 गिगावॅट क्षमतेचे प्रकल्प निविदा प्रक्रियेच्या टप्प्यात आहेत. यामध्ये 65.29 गिगावॅट क्षमतेच्या नव्या उपायांचा, जसे की हायब्रिड प्रणाली, राउंड-द-क्लॉक ऊर्जा, पीकिंग पॉवर, तसेच औष्णिक अधिक नविनीकरणीय ऊर्जा संयुक्त प्रकल्प समावेश आहे. हे प्रकल्प ग्रिड-स्थिरता आणि ऊर्जा पुरवठा सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने धोरणात्मक बदल दर्शवतात.

केंद्रीय नवीन आणि नविनीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालय विविध उपक्रम राबवित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2030 पर्यंत 500 गिगावॅट नविनीकरणीय ऊर्जा क्षमतेचे ठेवलेले ध्येय गाठण्याच्या दिशेने हे प्रयत्न सुरू आहेत. ही सातत्यपूर्ण वाढ भारताची हवामान बदलविषयक उद्दिष्टे आणि ऊर्जा सुरक्षेप्रती असलेल्या कटिबद्धतेचे द्योतक आहे.  नविनीकरणीय ऊर्जा प्रकल्पांची व्याप्ती वाढविण्यावर केंद्र सरकारने लक्ष केंद्रित केले असल्याची ही ग्वाही आहे.

 

* * *

M.Pange/R.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2120802) Visitor Counter : 51