लोकसभा सचिवालय
azadi ka amrit mahotsav

लोकसभा अध्यक्षांनी भारतीय भाषा आणि संस्कृतीमधील उझबेक विद्वानांच्या स्वारस्याबाबत केले कौतुक


21 व्या शतकाच्या निर्मितीत भारताची महत्त्वाची भूमिका : लोकसभा अध्यक्ष

21 व्या शतकात जागतिक मानवी मूल्ये, शांती, स्थैर्य, प्रगती आणि स्वातंत्र्याचे स्वप्न साकार करण्यात भारत आणि उझबेकिस्तान महत्त्वाची भूमिका बजावतील: लोकसभा अध्यक्ष

लोकसभा अध्यक्षांनी उझबेकिस्तानमधील भारतशास्त्रज्ञ आणि विद्यार्थ्यांशी साधला संवाद

Posted On: 09 APR 2025 10:37PM by PIB Mumbai

Tashkent/नवी दिल्‍ली, 9 एप्रिल 2025 

 

लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी उझबेकिस्तानच्या विद्वानांना हिंदी आणि संस्कृतसह भारतीय भाषांमध्ये असलेले खोल स्वारस्य आणि समजुतीबद्दल त्यांचे कौतुक केले. उझबेकिस्तानचे विद्वान केवळ भारतीय भाषा शिकले नाहीत तर त्यांच्या साहित्यकृतींमध्येही त्यांनी ते व्यक्त केले आहे, असे त्यांनी नमूद केले. आज ताश्कंद येथील प्रतिष्ठित लाल बहादूर शास्त्री शाळेत भारतीयशास्त्रज्ञ, शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधताना बिर्ला यांनी नमूद केले की विद्वानांनी त्यांच्या अध्यापन आणि संशोधन कार्याद्वारे भारत आणि उझबेकिस्तानमधील ऐतिहासिक संबंध मजबूत केले आहेत. शाळेत 600 हून अधिक विद्यार्थी हिंदी शिकत आहेत आणि त्यांना भारतीय भाषा आणि संस्कृतीबद्दल खोलवर आदर आहे.

राजकारण, व्यापार, गुंतवणूक, संरक्षण, सुरक्षा, दहशतवादविरोध, विज्ञान आणि तंत्रज्ञान, अणुऊर्जा, अंतराळ आणि माहिती तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रांमध्ये भारत आणि उझबेकिस्तानने आपले सहकार्य बळकट केल्याबद्दल बिर्ला यांनी समाधान व्यक्त केले. ते पुढे म्हणाले की, दोन्ही देशांमध्ये मजबूत सांस्कृतिक आणि शैक्षणिक संबंध आहेत.

बिर्ला यांनी नमूद केले की अनेक भारतशास्त्रज्ञांना त्यांच्या राजनैतिक कार्यासाठी प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले आहेत, ज्यात भारत आणि इतर देशांमधील सर्वोच्च पुरस्कारांचा समावेश आहे. उझबेकिस्तानमधील शिक्षकांनी एक उझबेक-हिंदी शब्दकोशदेखील तयार केला आहे ज्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. 

150 व्या आंतर-संसदीय संघ (आय पी यु) सभेसाठी भारतीय संसदीय प्रतिनिधी मंडळाचे (आयपीडी) प्रमुख म्हणून उझबेकिस्तानच्या दौऱ्यावर असताना लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज उझबेकिस्तान प्रजासत्ताकच्या ओली मजलिसच्या विधानसभेचे अध्यक्ष महामहिम नुरदिनजोन इस्मोइलोव्ह यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. या प्रसंगी बिर्ला यांनी भारताच्या निवडणूक व्यवस्थापन प्रणालीची पारदर्शकता आणि प्रभावीपणा अधोरेखित केला. निवडणूक प्रक्रिया इतक्या मोठ्या प्रमाणावर पारदर्शकतेने यशस्वीरित्या पार पाडणे हे भारताच्या प्रभावी निवडणूक व्यवस्थापन प्रणालीचे प्रतिबिंब आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

 

 

* * *

S.Patil/N.Mathure/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2120633) Visitor Counter : 21
Read this release in: English , Urdu , Hindi