रेल्वे मंत्रालय
आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूतील तिरुपती-पकला-काटपाडी एकेरी रेल्वे मार्ग खंडाच्या दुपदरीकरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता. एकूण 1 हजार 332 कोटी रुपये खर्च अपेक्षित
प्रविष्टि तिथि:
09 APR 2025 6:11PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 एप्रिल 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीने आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमधील तिरुपती-पकला-काटपाडी या 104 किलोमीटरच्या एकेरी रेल्वे मार्ग खंडाच्या दुपदरीकरणाला मान्यता दिली आहे. या कामासाठी एकूण 1 हजार 332 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
वाढीव रेल्वे क्षमतामुळे वाहतूक सुलभता सुधारेल, भारतीय रेल्वेची कार्यक्षमता आणि सेवा विश्वासार्हता वाढेल. बहुपदरी प्रस्तावामुळे कामकाज सुलभ होईल आणि गर्दी कमी होईल. भारतीय रेल्वेच्या सर्वाधिक वर्दळीच्या खंडावर अत्यावश्यक पायाभूत सुविधांचा विकास होईल. हा प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या भारताच्या दृष्टिकोनाशी सुसंगत असून त्यामुळे या भागातील लोक या क्षेत्रातील व्यापक विकासाद्वारे आत्मनिर्भर होतील, त्यांच्या रोजगार-स्वयंरोजगाराच्या संधी वाढतील.
आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या दोन राज्यांमधील तीन जिल्ह्यांचा समावेश असलेल्या या प्रकल्पामुळे भारतीय रेल्वेचे सध्याचे जाळे सुमारे 113 किलोमीटरने वाढेल. या प्रकल्पामुळे तिरुमला वेंकटेश्वर मंदिरासोबत श्री कालहस्ती शिव मंदिर, कनिपकम विनायक मंदिर, चंद्रगिरी किल्ला आदी प्रमुख आणि देशभरातील यात्रेकरू आणि पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या स्थळांना रेल्वे मार्ग जोडला जाणार आहे.
या बहुपदरी प्रकल्पामुळे सुमारे 400 गावे आणि सुमारे 14 लाख लोकसंख्या रेल्वे प्रवासाशी जोडली जाणार आहे. कोळसा, कृषी उत्पादने, सिमेंट आणि इतर खनिजे इत्यादी वस्तूंच्या वाहतुकीसाठी हा एक महत्वाचा मार्ग असून, क्षमता वाढीच्या कामामुळे प्रतिवर्षी 4 दशलक्ष टन अतिरिक्त मालवाहतूक होण्यास मदत होणार आहे.
* * *
S.Patil/R.Dalekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2120506)
आगंतुक पटल : 36