लोकसभा सचिवालय
प्रत्येक क्षेत्रांत वेगाने होणाऱ्या सुधारणांमुळे नव भारत संधीची भूमी बनला आहे : लोकसभा अध्यक्ष
परदेशातील भारतीय विद्यार्थी म्हणजे भारतीय मूल्य आणि संस्कृतीचे राजदूत आहेत : लोकसभा अध्यक्ष
लोकसभेच्या अध्यक्षांनी समरकंद वैद्यकीय विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी साधला संवाद
Posted On:
08 APR 2025 9:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 एप्रिल 2025
प्रत्येक क्षेत्रात झपाट्याने होणाऱ्या सुधारणांमुळे नव भारत संधीची भूमी म्हणून उदयाला आला आहे, असे लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी म्हटले आहे. आयुष्मान भारत सारख्या राष्ट्रीय उपक्रमांमुळे संपूर्ण देशात आरोग्यसेवा क्षेत्रांत अगणित संधी निर्माण झाल्या आहेत असे त्यांनी सांगितले. वैद्यकीय संशोधन आणि शिक्षण या क्षेत्रांमध्ये झालेल्या वेगवान प्रगतीमुळे शैक्षणिक आणि संशोधन संस्थांमध्ये कार्य करण्यासाठी विद्यार्थ्यांना अपरिमित संधी प्राप्त झाल्या आहेत, असे त्यांनी समरकंद वैद्यकीय विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले.
परदेशातील भारतीय विद्यार्थी म्हणजे भारतीय मूल्य आणि संस्कृतीचे राजदूत आहेत, अशा शब्दात बिर्ला यांनी त्यांचे कौतुक केले. आपल्या मायभूमीपासून कित्येक मैल दूर राहूनही हे विद्यार्थी भारतीय संस्कृतीशी घट्ट जोडलेले आहेत आणि ते ज्या देशात वास्तव्य करतात तिथे त्यांचा प्रसार करत असल्याचे ते म्हणाले. भारताचे सांस्कृतिक आणि शैक्षणिक प्रतिनिधी या नात्याने भारत आणि उझबेकिस्तान यांच्यातील मैत्री आणि सहकार्य मजबूत करण्यात ते महत्त्वाची भूमिका बजावत आहेत, असे ते म्हणाले. ओम बिर्ला, उझबेकिस्तानच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर असून ते आंतर-संसदीय संघाच्या (IPU) च्या 150 व्या सभेसाठी भारतीय संसदीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करत आहेत.
जगातील प्रत्येक कानाकोपऱ्यात राहणाऱ्या भारतीयांच्या हितासाठी भारत सरकार अतिशय काळजी घेते, असे बिर्ला यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले. परदेशात राहणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना सहाय्य करण्यासाठी आणि त्यांना आवश्यक पाठबळ पुरवण्यासाठी भारत सरकार तत्पर असल्याचे ते म्हणाले. भारतीय डॉक्टरांना जगभरात एक वेगळी ओळख असून तुम्ही देखील ही परंपरा पुढे सुरु ठेवली पाहिजे, असे त्यांनी अभिमानाने सांगितले.
विद्यार्थ्यांनी आपले ज्ञान आणि कौशल्यवृद्धी करण्याबरोबरच आपल्या जीवनात समर्पण आणि करुणा यासारख्या मूल्यांचाही स्वीकार करावा असे आवाहन बिर्ला यांनी केले.
उझबेकिस्तान मधील भारतीय समुदायाचे प्रेम आणि जिव्हाळा प्रेरणादायक आहे : लोकसभा अध्यक्ष
आपल्या उझबेकिस्तानच्या भेटीत लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सोमवारी तेथील भारतीय समुदायाशी संवाद साधला. भारत आज जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे, तसेच भारताची जागतिक प्रतिष्ठा आणि नवोन्मेष यामुळे असंख्य नवीन संधी निर्माण झाल्या आहेत, असे त्यांनी भारताच्या वाढत्या आर्थिक शक्तीबद्दल बोलताना सांगितले. अनिवासी भारतीय समुदाय गुंतवणूक आणि संशोधनाच्या रूपाने यात योगदान देऊ शकतो, असे त्यांनी सांगितले. भारताच्या विकसित भारत संकल्पाचा एक भाग होऊन उझबेकिस्तान मधील भारतीय समुदायाने या संधींचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी घेतली जॉर्जियाच्या संसदेच्या अध्यक्षांची भेट
ताश्कंद येथे झालेल्या आंतर-संसदीय संघाच्या 150 व्या सभेच्या निमित्ताने, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी जॉर्जियाच्या संसदेचे अध्यक्ष महामहिम शाल्वा पापुआश्विली यांची भेट घेतली. भारत आणि जॉर्जियामध्ये सखोल सांस्कृतिक बंध असून त्यातूनच भविष्यासाठी प्रचंड संधींची कवाडे उघडतात असे बिर्ला म्हणाले. ओम बिर्ला यांनी यावेळी युवा देवाणघेवाण कार्यक्रम, डिजिटल सहकार्य आणि लोकांमधील संबंध वाढवण्याचे आवाहन केले.
* * *
N.Chitale/B.Sontakke/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2120227)
Visitor Counter : 33