वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते स्टार्टअप महाकुंभ 2025 मध्ये 'स्टार्टअप महारथी' पुरस्कार प्रदान
महारथी हे भारताच्या नवोन्मेष प्रवासातले योद्धे आहेत: पियुष गोयल
Posted On:
05 APR 2025 9:08PM by PIB Mumbai
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज नवी दिल्ली येथे स्टार्टअप महाकुंभ 2025 च्या समारोपाच्या दिवशी 'स्टार्टअप महारथी' पुरस्कार प्रदान केले. मोठ्या संख्येने उपस्थित असलेले उद्योजक, नवोन्मेषक आणि परिसंस्था सक्षमकर्त्यांना संबोधित करताना, गोयल यांनी सर्व सहभागींचे कौतुक केले आणि सांगितले की त्यांच्यातील प्रत्येकजण एक "महारथी" - एक कुशल योद्धा आणि भारताच्या स्टार्टअप क्रांतीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणारा आहे.
त्यांनी युवा संस्थापकांना महत्त्वाकांक्षी ध्येये आखण्यासाठी आणि वर्तमानाच्या मर्यादा ओलांडून पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित केले. "तुमच्याकडे असलेल्या क्षमतेमुळे तुम्हाला या अमृत काळातील भारताच्या प्रवासात मोठे योगदान देता येईल. या स्टार्टअप महाकुंभच्या निमित्ताने सध्याच्या वास्तवाच्या पलीकडे जाणाऱ्या आकांक्षा जागृत करूया " असे ते पुढे म्हणाले.
मागील वर्षांशी या कार्यक्रमाच्या व्याप्तीची तुलना करताना, केंद्रीय मंत्र्यांनी माहिती दिली की गेल्या वर्षी सुमारे 3,000 अभ्यागत होते, तर यावर्षी महाकुंभमध्ये 2.3 लाख अभ्यागतांची विक्रमी उपस्थिती दिसून आली, जी नवोन्मेष क्षेत्रात भारताची वेगवान वाढ अधोरेखित करते.
गोयल यांनी सांगितले की महारथी ग्रँड चॅलेंजसाठी अर्ज केलेल्यांपैकी 40% अर्जदार दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीतील शहरांमधील होते आणि बरेचसे महिलांच्या नेतृत्वाखालील स्टार्टअप होते. "भारताच्या विकासात महिला पुढाकार घेत आहेत आणि मोठ्या उत्साहाने योगदान देत आहेत," असे त्यांनी नमूद केले.
सरकार व्यवसाय सुलभतेमध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा करून स्टार्टअप्ससाठी सक्षम वातावरण निर्माण करत आहे यावर गोयल यांनी भर दिला.
एका महत्त्वाच्या उपक्रमाची घोषणा करताना, गोयल यांनी सांगितले की, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयात एक समर्पित स्टार्टअप इंडिया डेस्क स्थापन केला जाईल, जो संपूर्ण भारतातील स्टार्टअप्ससाठी हेल्पलाइन म्हणून काम करेल आणि प्रादेशिक भाषांमधील साध्या 4-अंकी टोल-फ्री क्रमांकाद्वारे उपलब्ध असेल.,
ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10,000 कोटी रुपये कॉर्पससह स्टार्टअप्ससाठी दुसऱ्या फंड ऑफ फंड्सला (FFS) मंजुरी दिली आहे. या वर्षी, पहिला हप्ता म्हणून सिडबी (SIDBI) ला 2,000 कोटी रुपये दिले जातील. निधीचा एक महत्त्वाचा भाग छोट्या स्टार्टअप्सच्या सीड फंडिंगसाठी आणि डीप -टेक नवोन्मेषाच्या मदतीसाठी राखून ठेवला जाईल.
“या निधीद्वारे, आम्ही एआय, रोबोटिक्स, क्वांटम कॉम्प्युटिंग, मशीन लर्निंग, प्रिसिजन मॅन्युफॅक्चरिंग आणि बायोटेक सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या विकासाला चालना देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे ,” असे त्यांनी सांगितले.
“आपण नियमनाद्वारे नव्हे तर सुविधा पुरवून भारताची पूर्ण क्षमता खुली केली पाहिजे. सरकार तुमच्या प्रवासाला पाठिंबा देण्यासाठी आहे, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी नाही,” असे सांगून त्यांनी भाषणाचा समारोप केला.
***
N.Chitale/S.Kane/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2119410)
Visitor Counter : 28