आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लागू करणारे दिल्ली बनले 35 वे राज्य/केंद्रशासित प्रदेश


‘एबी पीएम-जेएवाय’ ही विमा योजना नाही, तर विश्वासावर आधारित 'हमी' योजना आहे: जे. पी. नड्डा

Posted On: 05 APR 2025 5:51PM by PIB Mumbai

 

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने (एनएचए) दिल्ली सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाशी सामंजस्य करार (एमओयू) केल्यानंतर, आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (एबी पीएम-जेएवाय) लागू करणारे दिल्ली हे 35 वे राज्य/केंद्रशासित प्रदेश बनले आहे.

सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्याच्या या समारंभाचे अध्यक्षपद केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी भूषवले. "देशातील 34 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सुरू असलेली जगातील सर्वात मोठी आरोग्य कवच  योजना अखेर राष्ट्रीय राजधानीतही लागू होत आहे हा अभिमानाचा क्षण आहे,” असे नड्डा यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले. ही योजना विश्वासावर आधारित आहे, म्हणूनच तिला विमा योजना नाही तर हमी  योजना म्हटले जाते, असेही ते म्हणाले.

आर्थिक जाती जनगणनेच्या आधारावर 50 कोटी लोकांना या योजनेअंतर्गत आणण्यात आले, त्यामुळे असे लाभ देणारी ही पहिलीच योजना बनली असल्याचे नड्डा यांनी नमूद केले. आशा आणि आंगणवाडी सेविकांसह 36 लाख फ्रंट लाईन आरोग्य कर्मचाऱ्यांना या आणि प्रधानमंत्री जीवन विमा योजनेअंतर्गत आणण्यात आले आहे, जेणेकरून त्यांना आरोग्य आणि जीवन विमा दोन्ही सुविधा मिळतील, अशी माहिती त्यांनी दिली. या फ्रंट लाईन कर्मचाऱ्यांना व्यापक सामाजिक सुरक्षा कवचाच्या कक्षेत आणण्यासाठी हे पाऊल उचलले गेले असल्याचे त्यांनी सांगितले.

अलीकडेच प्रकाशित LANCET अभ्यासाचा संदर्भ देत नड्डा यांनी अधोरेखित केले की आयुष्मान भारत जन आरोग्य योजनेमुळे कर्करोग रुग्णांवर वेळेत उपचार सुरू करण्यात लक्षणीय सुधारणा झाली आहे. " आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत नोंदणीकृत रुग्णांना 30 दिवसांत कर्करोग उपचार मिळण्यात 90% वाढ झाली", असे त्यांनी सांगितले.

23 सप्टेंबर 2018 रोजी सुरू झालेली आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही आरोग्यसेवेच्या क्षेत्रात, प्रामुख्याने देशभरातील लाखो गरीब आणि असुरक्षित कुटुंबांच्या जीवनात एक क्रांतिकारी बदल घडवून आणणारी योजना आहे.

***

N.Chitale/S.Mukhedkar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2119408) Visitor Counter : 41


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil