मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार आणि कुक्कुटपालन उद्योग आले एकत्र


जैवसुरक्षा उपाययोजना, मजबूत देखरेख प्रणाली आणि पोल्ट्री फार्मची अनिवार्य नोंदणी या त्रिसूत्री  रणनीतीची केली अंमलबजावणी

Posted On: 05 APR 2025 2:44PM by PIB Mumbai

 

मत्स्यपालन, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाच्या अंतर्गत पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाने  देशात अलिकडच्या काळात झालेल्या एव्हियन इन्फ्लूएंझा (बर्ड फ्लू) च्या उद्रेकावर चर्चा करण्यासाठी 4 एप्रिल 2025 रोजी नवी दिल्ली येथे एक उच्चस्तरीय बैठक आयोजित केली. पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाच्या सचिव अलका उपाध्याय यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत बर्ड फ्ल्यूच्या सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि रोगावर नियंत्रण तसेच त्याचा प्रसार रोखण्यासाठी धोरणे आखण्यासाठी वैज्ञानिक तज्ञ, कुक्कुटपालन उद्योगाचे प्रतिनिधी आणि धोरणकर्ते एकत्र आले होते.

बर्ड फ्लू रोखण्यासाठी आणि तो नियंत्रणात आणण्यासाठी पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाने  संबंधितांशी सल्लामसलत करून तीन-स्तरीय रणनीती ठरवली आहे. त्यात कठोर जैवसुरक्षा उपायांचा समावेश आहे ज्यामध्ये पोल्ट्री फार्मने योग्य स्वच्छता राखावी , फार्म प्रवेश नियंत्रित करावा आणि संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी कठोर जैवसुरक्षा नियमांचे  पालन करावे, रोगाचा मागोवा घेणे आणि नियंत्रण वाढविण्यासाठी पोल्ट्री फार्मवर देखरेख आणि त्यांची अनिवार्य नोंदणी करावी (सर्व पोल्ट्री फार्मनी एका महिन्याच्या आत राज्य पशुसंवर्धन विभागांकडे नोंदणी करावी. सरकारने पोल्ट्री उद्योगातील हितधारकांना या निर्देशाचे 100%  पालन सुनिश्चित करण्याचे आवाहन केले आहे).

बैठकीत बोलताना अलका उपाध्याय यांनी अधोरेखित केले की, "आपल्या कुक्कुटपालन क्षेत्राचे संरक्षण करणे हे अन्न सुरक्षा आणि ग्रामीण उपजीविकेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. बर्ड फ्लूविरुद्धच्या आपल्या लढाईत कठोर जैवसुरक्षा, वैज्ञानिक देखरेख आणि जबाबदार उद्योग पद्धती आवश्यक आहेत."

या बैठकीत भारतात  रोगजनक एव्हियन इन्फ्लूएंझा (HPAI) विरुद्ध लसीचा वापर करण्यास परवानगी देण्याच्या शक्यतेवरही सविस्तर चर्चा झाली.

बर्ड फ्ल्यू (एव्हियन इन्फ्लूएंझा)  आणि भारतातील सद्यस्थिती बद्दल

एव्हियन इन्फ्लूएंझा हा पक्ष्यांना होणारा एक अत्यंत संसर्गजन्य विषाणूजन्य आजार आहे, जो कधीकधी सस्तन प्राण्यांमध्ये पसरतो.  2006 मध्ये भारतात पहिल्यांदा आढळल्यापासून, दरवर्षी अनेक राज्यांमध्ये या विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याची नोंद आहे. या वर्षी, या विषाणूने विविध प्रजातींमधील  संक्रमण दर्शविले आहे, ज्यामुळे केवळ पोल्ट्रीच नाही तर काही भागात वन्य पक्षी आणि मार्जार कुळातील मोठ्या जाती देखील प्रभावित झाल्या आहेत.

एचपीएआयची सध्याची परिस्थिती (1 जानेवारी ते 4 एप्रिल 2025)

देशांतर्गत  कुक्कुटपालन

महाराष्ट्र, छत्तीसगड, झारखंड, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, बिहार अशी एकूण 8 राज्ये प्रभावित झाली आहेत. उत्पत्तीची ठिकाणे 34 आहेत.

प्रभावित बिगर-कुक्कुटपालन प्रजाती ( 1 जानेवारी ते 4 एप्रिल 2025)

महाराष्ट्रात वाघ, बिबट्या, गिधाड, कावळा, बहिरी ससाणा आणि बगळा या प्रजाती प्रभावित झाल्या आहेत.

एव्हीयन इन्फ्लूएंझा नियंत्रित करण्यासाठी व्यापक दृष्टिकोन

भारतात रोगजनक एव्हीयन इन्फ्लूएंझाचा प्रसार नियंत्रित करण्यासाठी आणि रोखण्यासाठी पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाने अनेक उपक्रम राबवले आहेत. देश कठोर "डिटेक्ट अँड कलिंग " धोरणाचे पालन करत आहे , ज्यामध्ये संक्रमित पक्ष्यांना मारणे, हालचालींवर मर्यादा घालणे आणि प्रादुर्भावाच्या 1 किमी परिघातील परिसराचे  निर्जंतुकीकरण करणे समाविष्ट आहे. राज्यांना वाढीव देखरेख आणि सज्जतेसह नियंत्रण उपायांबाबत दररोज अहवाल देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, विशेषत: हिवाळ्यात जेव्हा स्थलांतरित पक्ष्यांना जास्त धोका असतो. रोगजनक एव्हियन इन्फ्लूएंझासाठीची  देखरेख व्यवस्था बिगर-पोल्ट्री प्रजातींना  उदा.  गुरेढोरे, शेळ्या आणि डुकरांचे चाचणीचे निकाल नकारात्मक आले आहेत , त्यांना देखील लागू करण्यात आली आहे.

***

N.Chitale/S.Kane/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2119310) Visitor Counter : 42