वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
'विकसित भारत 2047' दृष्टिकोनाला चालना देण्यासाठी उदयोन्मुख तंत्रज्ञानात गुंतवणूक करण्याचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांचे आवाहन
पीयूष गोयल यांच्या हस्ते स्टार्टअप महाकुंभाचे उद्घाटन
Posted On:
03 APR 2025 9:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 एप्रिल 2025
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज दिल्लीत झालेल्या स्टार्टअप महाकुंभाच्या दुसऱ्या आवृत्तीच्या उद्घाटन समारंभात रोबोटिक्स, ऑटोमेशन, मशीन लर्निंग, थ्रीडी मॅन्युफॅक्चरिंग आणि पुढच्या पिढीतील कारखान्यांसारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानात गुंतवणुकीची गरज अधोरेखित केली. गोयल म्हणाले की, 'विकसित भारत 2047' चे स्वप्न साकार करण्यासाठी तसेच उद्योग आणि नवोपक्रमात भारताला जागतिक नेता म्हणून स्थापित करण्यासाठी हा नवोन्मेष आवश्यक आहे.
देशातील गतिमान उद्योजकतेची भावना आणि तंत्रज्ञानाचे पुरोगामित्व यामुळे भारत हा जगातील तिसरी स्टार्टअप परिसंस्था बनला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. भारताच्या आर्थिक आणि तांत्रिक प्रगतीला चालना देण्यात स्टार्टअप्सची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे ते म्हणाले. 3 ते 5 एप्रिल दरम्यान हा कार्यक्रम होत आहे.
भारतीय गुंतवणूकदारांना देशांतर्गत स्टार्टअप परिसंस्थेला पाठिंबा देण्यास प्रोत्साहित करत गोयल यांनी नवोन्मेष आणि उद्योजकतेला चालना देण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. त्यांनी आश्वासन दिले की सरकार त्यांच्या स्टार्टअप प्रवासात आव्हानांना तोंड देणाऱ्यांना आधार देईल, त्यांना चिकाटीने आणि पुन्हा प्रयत्न करण्यास प्रोत्साहित करेल. परदेशी भांडवलावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी तसेच दीर्घकालीन आर्थिक लवचिकता सुनिश्चित करण्यासाठी स्वदेशी गुंतवणुकीचा मजबूत पाया महत्त्वाचा आहे असे सांगून त्यांनी देशांतर्गत भांडवल गुंतवणूक वाढविण्याच्या गरजेवरही भर दिला.
भारताचा भांडवल पाया मजबूत करण्यासाठी तसेच आत्मनिर्भर होण्यासाठी देशांतर्गत गुंतवणूकदारांना अधिकाधिक आकर्षित करण्याची गरज गोयल यांनी व्यक्त केली. सामूहिक प्रयत्नांमुळे भारताची स्टार्टअप परिसंस्था वाढत राहील आणि देशाच्या समृद्धीत लक्षणीय योगदान देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांनी देशांतर्गत गुंतवणूकदारांना देशातील स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक करण्याचे आवाहन केले.
पुढील स्टार्टअप महाकुंभ आणखी मोठा करण्याची इच्छा गोयल यांनी व्यक्त केली, ज्यामध्ये भारतातील सर्व 770 जिल्ह्यांमधून सहभागाचे लक्ष्य ठेवले जाईल. महाविद्यालये आणि इनक्यूबेटरमधील तरुण नवोन्मेषकांना निवडण्यासाठी देशव्यापी स्पर्धा सुरू करण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला, ज्यामुळे भविष्यातील आवृत्त्यांमध्ये व्यापक प्रतिनिधित्व आणि सहभाग सुनिश्चित होईल.
* * *
S.Kane/N.Mathure/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2118557)
Visitor Counter : 33