संरक्षण मंत्रालय
सैनिकांना दर्जेदार आरोग्य सेवा पुरवण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अंगिकार करणे सुरू ठेवण्याचे संरक्षणमंत्र्यांचे आर्मी मेडिकल कोरला(एएमसी) आवाहन
मुंबईच्या आयएनएचएस अश्विनीने पटकावली 2024 या वर्षासाठी संरक्षण दलाच्या सर्वोत्तम वैद्यकीय रुग्णालयाची आरएम ट्रॉफी
Posted On:
03 APR 2025 8:57PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 एप्रिल 2025
“जगभरातील वैद्यकीय क्षेत्र तंत्रज्ञानाच्या परिवर्तनाच्या टप्प्यातून वाटचाल करत आहे आणि आर्मी मेडिकल कोरने(एएमसी) आपल्या सैनिकांना दर्जेदार आरोग्य सेवा पुरवण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अंगिकार केला पाहिजे”, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले आहे. ते आज 3 एप्रिल 2025 रोजी दिल्ली कॅन्टॉन्मेंटमध्ये आर्मी हॉस्पिटलमध्ये(रिसर्च अँड रेफरल) एएमसीच्या 261व्या वर्धापनदिन सोहळ्याला संबोधित करत होते. कृत्रिम बुद्धिमत्तेचा अंगिकार करण्यासाठी आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानासंदर्भात संशोधन करण्यासाठी एएमसीने केलेल्या प्रयत्नांची संरक्षणमंत्र्यांनी प्रशंसा केली आणि या क्षेत्रात नवे टप्पे सर करण्यासाठी नव्याने उदयाला येणाऱ्या पद्धतींबाबत माहिती घेऊन त्या आत्मसात करण्याच्या आवश्यकतेवर त्यांनी भर दिला.
त्यांनी सिम्युलेटर आधारित प्रशिक्षणाला प्रोत्साहन देण्याचे महत्त्व अधोरेखित केले ज्यामुळे मशीन बेस्ड लर्निंगच्या माध्यमातून वैद्यकीय कुशलता आत्मसात करता येऊ शकेल. अशा प्रकारचे कौशल्य आत्मसात करण्यासाठी अतिरिक्त संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रांचा देखील त्यांनी आग्रह धरला. राजनाथ सिंह यांनी संरक्षण आणि नागरी या दोन्ही क्षेत्रांना फायदेशीर ठरू शकणाऱ्या दुहेरी तंत्रज्ञानाची आवश्यकता देखील अधोरेखित केली. लष्करी राजनैतिक धोरणाच्या क्षेत्रात भारताची पत वाढवण्यासाठी विकसनशील आणि अल्पविकसित देशांच्या वैद्यकीय व्यावसायिकांना प्रशिक्षण देण्याच्या शक्यतेची चाचपणी करण्याचे आवाहन देखील त्यांनी एएमसीला केले.
यावेळी राजनाथ सिंह यांनी आरोग्य सेवा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सशस्त्र दलांच्या कर्मचाऱ्यांना रक्षामंत्री ट्रॉफी देऊन गौरवले. मुंबईच्या आयएनएचएस अश्विनी या रुग्णालयाने 2024 या वर्षासाठी संरक्षण दलाच्या सर्वोत्तम रुग्णालयाची ट्रॉफी पटकावली. तर हरयाणा, चंडीमंदिर येथील वेस्टर्न कमांडच्या कमांड हॉस्पिटलला दुसऱ्या क्रमांकाचा बहुमान मिळाला.
* * *
S.Kane/S.Patil/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2118548)
Visitor Counter : 23