संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सीमा रस्ता संघटनेने झोजिला खिंड 32 दिवसांच्या विक्रमी कालावधीत पुन्हा सुरू केली

Posted On: 01 APR 2025 6:22PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 एप्रिल 2025

 

सीमा रस्ता संघटना अर्थात बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (बीआरओ) ने हिमपातामुळे 32 दिवस वाहतुकीसाठी बंद असलेली  झोजिला ही खिंड आज 1 एप्रिल 2025 रोजी  विक्रमी वेळेत खुली केली. लेफ्टनंट जनरल रघु श्रीनिवासन यांनी लडाखकडे जाणाऱ्या पहिल्या काफिल्याला हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. झोजिला पास ही काश्मीर खोऱ्याला लडाखशी जोडणारी खिंड जगातील सर्वात कठीण आणि आव्हानात्मक उंचीवरील खिंडींपैकी एक आहे.

या वर्षी 27 फेब्रुवारी ते 16 मार्च 2025 या कालावधीत पश्चिमी विक्षोभामुळे झालेल्या अविरत हिमपातामुळे या खिंडीला असामान्यपणे कमी पण तीव्र परिसमाप्ती कालावधीला सामोरे जावे लागले. मोठ्या प्रमाणात साचलेल्या बर्फामुळे एक मोठे आव्हान निर्माण झाले. शून्यापेक्षा कमी तापमान, उच्च वेगाचे वारे आणि हिमस्खलन होण्याची शक्यता असलेल्या भूप्रदेशात आत्यंतिक परिस्थितीशी झुंज देत बीआरओच्या कर्मचाऱ्यांनी 17 मार्च ते 30 मार्च या 14 दिवसांच्या विक्रमी कालावधीत बर्फ साफ केला.

दरवर्षी या दुर्गम खिंडीत प्रचंड हिमपात होतो, ज्यामुळे कडक हिवाळ्याच्या महिन्यांमध्ये ती बंद करावी लागते. या तात्पुरत्या बंदमुळे केवळ सैन्य आणि आवश्यक वस्तूंच्या वाहतुकीवरच परिणाम होत नाही तर लडाखमधील स्थानिक लोकसंख्येच्या दैनंदिन जीवनातही व्यत्यय येतो, जे व्यापार, वैद्यकीय मदत आणि आर्थिक क्रियाकलापांसाठी या मार्गावर अवलंबून असतात. तांत्रिक प्रगती, बर्फ काढून टाकण्याच्या तंत्रांमुळे आणि बीआरओच्या अथक प्रयत्नांमुळे, काही दशकांपूर्वी सुमारे सहा महिने‌‌ असणारा हा बंद कालावधी आता काही आठवड्यांपर्यंत कमी झाला आहे.

झोजिला खिंड पुन्हा खुली होणे हे बीआरओच्या समर्पणाचे प्रतीक आहे, ज्यांच्याकडे या मोक्याच्या खिंडीवर वेळेवर संपर्क पुनर्संचयित करण्यासाठी काश्मीरमध्ये प्रोजेक्ट बीकन आणि लडाखमध्ये प्रोजेक्ट विजयक आहे.

 

* * *

S.Kane/N.Mathure/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2117418) Visitor Counter : 29